अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि त्यांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप असलेला लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी एके काळी घनिष्ठ मैत्री केल्याचे प्रकरण डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शेकू लागले आहे. ट्रम्प यांना अडचणीचे ठरू शकतील, असे तपशील बाहेर येऊ नयेत यासाठी ट्रम्प प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाल्याची टीका सुरू आहे.
जेफ्री एपस्टीन कोण होता?
जेफ्री एपस्टीन हे अमेरिकेच्या वलयांकित वर्तुळात या शतकाच्या सुरुवातीस वावरलेले अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. प्रथम एक गणिताचा शिक्षक, पुढे गुंतवणूक आणि संपत्ती सल्लागार अशा अनेक भूमिकांमधून प्रवास करत एपस्टीनची ऊठबस न्यूयॉर्क-वॉशिंग्टनमधील प्रभावशाली व्यक्तींबरोबर होऊ लागली. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन अशा दोन्ही पक्षांतील मंडळींशी त्याचा दोस्ताना होता. डोनाल्ड ट्रम्प त्याचे अनेक वर्षे मित्र होते. त्याचबरोबर माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, ब्रिटनचे राजपुत्र अँड्र्यू यांच्याबरोबरही त्याची ऊठबस होती. पुढे तो इतका धनाढ्य बनला, की त्याने कॅरेबियन राष्ट्रमूहात स्वतःचे बेट खरीदले आणि तेथे स्वतःच्या खासगी विमानातून तो मित्रमंडळींना घेऊन जाई.
एपस्टीन वादग्रस्त का नि कसा ठरला?
एपस्टीनवर अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा, तसेच असा मुलींची तस्करी केल्याचा गंभीर आरोप होता. त्याची वादग्रस्त पार्श्वभूमी ज्ञात असूनही अनेकांनी त्याची मैत्री सोडली नाही, हे विशेष. २००८मध्ये फ्लोरिडा राज्यात त्याच्यावर शरीरविक्रय व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला, मात्र तस्करीच्या अधिक गंभीर गुन्ह्यातून तो बचावला. एपस्टीनच्या राजकीय प्रभावामुळेच हे शक्य झाल्याचे त्यावेळी माध्यमे आणि विश्लेषकांनी नमूद केले होते. पुढे जुलै २०१९मध्ये अल्पवयीन मुलींना फशी पाडणे, त्यांची तस्करी करणे अशा गंभीर कलमांखाली अखेर त्याच्यावर अमेरिकेच्या न्याय खात्याने आरोपपत्र ठेवले. २००२ ते २००५ या काळात हे गुन्हे केल्याचे आरोपपत्रात नमूद होते. पण हे आरोप सिद्ध होण्याआधीच १० ऑगस्ट २०१९ रोजी एपस्टीनने वयाच्या ६६व्या वर्षी न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथील कोठडीत गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या होती की हत्या, याविषयी तर्कवितर्क आजही लढवले जातात. एपस्टीन याच्या कॅरेबियनमधील आलिशान घरांमध्ये कोणकोण जाऊन आले याविषयी माहिती उजेडात येऊ नये, यासाठी त्याला संपवण्यात आले असेही त्यावेळी लिहिले-बोलले गेले होते.
ट्रम्प यांची एपस्टीनशी मैत्री होती का?
१९९०च्या दशकात आणि २०००मध्ये सुरुवातीला ट्रम्प आणि एपस्टीन यांची घनिष्ठ मैत्री होती. ट्रम्प एपस्टीनच्या खासगी विमानातून अनेकदा प्रवास करायचे, अशी माहितीही पुढे आली आहे. २००२मधील एका मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी एपस्टीनचा उल्लेख ‘उत्तम माणूस’ असा केला होता. आम्हा दोघांना सुंदर स्त्रिया आवडतात आणि त्यांतील बऱ्याच वयाने लहान असतात, असे ट्रम्प बोलून गेले होते. २००४मध्ये फ्लोरिडामधील एका मालमत्ता खरेदीच्या निमित्ताने दोहोंमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांची मैत्री संपुष्टात आली. या मतभेदानंतर फ्लोरिडा पोलिसांचे शुक्लकाष्ठ एपस्टीनच्या मागे लागले, हेही लक्षणीय आहे.
‘एपस्टीन फाइल’ काय आहे?
जेफ्री एपस्टीन याची अमेरिकेत द्विपक्षीय मैत्री असल्यामुळे, त्याची वादग्रस्त पार्श्वभूमी प्रकाशात आल्यानंतर दोन्ही पक्षांनी या मैत्रीचा राजकीय वापर केला. पण ट्रम्प याबाबतीत आक्रमक आणि आघाडीवर होते. अनेक प्रकरणांच्या गोपनीय फायली (उदा. जॉन एफ. केनेडी हत्या) सार्वजनिक करणार असे ट्रम्प यांनी गेल्या वर्षी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात जाहीर केले होते. एपस्टीनबाबतही अशीच घोषणा त्यांनी केली. एपस्टीनची आत्महत्या किंवा संशयास्पद मृत्यू ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्ष कार्यकाळात झाली होती. त्याबद्दल संशयाच्या सुई आपल्याकडे वळू नये यासाठी ट्रम्प ही फाइल सार्वजनिक करण्यास उक्सुक असल्याचे दाखवत होते.
एपस्टीन फाईलवरून वाद कोणता?
उद्योगपती इलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यात एपस्टीन फाईलचा उल्लेख करताना, त्यात ट्रम्प यांचे नावही समाविष्ट असल्याचे ट्वीट केले होते. पण ही फाईल सार्वजनिक न करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आणि वादाला तोंड फुटले. ट्रम्प यांचे अनेक समर्थकही या निर्णयावर नाराज आहेत. खरोखरच ट्रम्प यांना काही दडवायचे आहे, अशी भावना या समर्थकांमध्ये बळ धरू लागली आहे. आता एपस्टीन प्रकरणाकडे दुर्लक्ष करावे. कारण फायलीतील तपशील ‘कंटाळवाणे’ आहेत, असे सांगून ट्रम्प यांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांचे हे घुमजाव संशय वाढवणारे ठरले.
siddharth.khandekar@expressindia.com