Donald Trump Nobel Prize Nomination : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भातील एक पोस्ट समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली. या पोस्टमध्ये ट्रम्प यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नसल्याचा दावा करण्यात आला. इतकेच नाही तर ट्रम्प यांचे नाव पुरस्काराच्या यादीतून काढून टाकण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले. २९ सप्टेंबर २०२५ रोजी व्हायरल झालेली ही पोस्ट अधिकृत बातमीसारखी दिसत असल्याने अनेकांनी त्याबाबत तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली. या पोस्टमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांमधून नाराजीचा सूर उमटला. दरम्यान, व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? ट्रम्प यांचे नाव नोबेल पुरस्काराच्या शर्यतीतून खरंच हटवण्यात आलं आहे का? त्यासंदर्भातील घेतलेला हा आढावा…

अमेरिकेच्या राष्ट्राध्यत्रपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. भारत-पाकिस्तान तसेच इस्रायल व इराणसह अनेक देशांमध्ये आपणच युद्धविराम घडवून आणल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्काराचे जणू वेधच लागल्याचे दिसून येत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात हा पुरस्कार मिळाला नसल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने ट्रम्प यांचे नाव नोबेलसाठी सुचवले होते. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनीही या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली. आता ट्रम्प यांचे नाव या पुरस्काराच्या शर्यतीतून हटवण्यात आल्याची आवई उठली आहे.

शांततेच्या नोबेलसाठी डोनाल्ड ट्रम्प अपात्र?

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक समितीने भविष्यातील पुरस्कारांसाठी कायमस्वरूपी अपात्र ठरवले असल्याचा दावा करण्यात आला. २३ सप्टेंबर २०२५ रोजीची तारीख असलेल्या या कथित प्रेस रिलीझनुसार ट्रम्प यांना अपात्र ठरवण्यामागे दोन कारणे सांगण्यात आली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत केलेले वादग्रस्त भाषण आणि अमेरिकेच्या डिफेन्स विभागाचे नाव बदलून ‘डिपार्टमेंट ऑफ वॉर’ करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच ट्रम्प यांना नोबेल पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पोस्टला ‘NPC BARRS TRUMP ACCOLADE’ असे नाट्यमय शीर्षक देण्यात आले होते. तसेच, त्यात ‘swisstimes.org’ आणि एपी या संस्थेच्या हवालाही देण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे या पोस्टमध्ये असंख्य त्रूटी असतानाही अनेकांनी ती समाजमाध्यमांवर शेअर केली आणि खरी असल्याचा समज करून घेतला.

आणखी वाचा : Iran New Sanctions : संयुक्त राष्ट्रांचे नवे निर्बंध इराणसाठी किती घातक? अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?

ट्रम्प यांच्या अपात्रतेच्या दाव्याचे सत्य काय?

डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिकासाठी कायमस्वरूपी अपात्र ठरवल्याची कथित प्रेस रिलीझ पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आले. ही पोस्ट असोसिएटेड प्रेसच्या (AP) बातमीसारखी असली तरी त्यातील तपशीलामुळे ती बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे एपीकडून बातमीत कधीही व्यक्तिनिष्ठ भाषेचा वापर केला जात नाही. तसेच swisstimes.org ही वेबसाईटही बनावट असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. नोबेल पारितोषिक समिती पुरस्काराच्या शर्यतीत असलेल्या व्यक्तींचे नाव कधीच उघड करत नाही. या पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया अधिकृत नामनिर्देशकांमार्फत केली जाते आणि विजेत्यांची निवड विशिष्ट नोबेल संस्थांद्वारे होते.

शांततेचा नोबेल पुरस्कार हा नॉर्वेजियन नोबेल कमिटीकडून दिला जातो; तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस मार्फत दिले जातात.नोबेल पुरस्काराची प्रक्रिया अत्यंत गोपनीय असते आणि अधिकृत घोषणा होईपर्यंत समित्या विशिष्ट उमेदवाराच्या नावावर क्वचितच भाष्य करतात. विशेष बाब म्हणजे यापैकी कोणत्याही समितीला एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही. त्यातच कोणत्याही विश्वासार्ह वृत्तसंस्थेने ट्रम्प यांचे नाव हटवण्यात आल्याची पुष्टी आणि नोंद केली नसल्याने व्हायरल झालेली पोस्ट पूर्णत: खोटी असल्याचे सिद्ध झाले आहे.

ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळणार का?

डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलचे वेध लागले असले तरीही त्यांना हा पुरस्कार मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. “नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प हे स्वतःला दावेदार मानतात. मात्र, त्यांना हा पुरस्कार मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे,” असे या पुरस्काराचे तज्ज्ञ अस्ले स्वीन यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले. अमेरिकेने गाझा युद्धात इस्रायलला दिलेला पाठिंबा आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबरचे ताणले गेले संबंध या गोष्टीला कारणीभूत ठरू शकतात, असेही ते म्हणाले. नोबेल पुरस्काराचे मूळ आधारस्तंभ असलेल्या अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्युपत्रानुसार, ज्या व्यक्तीने राष्ट्रांमध्ये बंधुता वाढवण्यासाठी सर्वोत्तम काम केले आहे, अशाच व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला पाहिजे. यंदाच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे १० ऑक्टोबर रोजी जाहीर केले जाणार आहेत.

नोबेल पुरस्काराबाबत तज्ज्ञांचे मत काय?

ओस्लोच्या पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालक नीना ग्रेगर यांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांचे कामकाज नोबेल पुरस्काराच्या तत्वांशी विसंगत आहे. “ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनाआणि हवामान बदलावरील पॅरिस करारातून अमेरिकेला बाहेर काढले. इतकेच नाही तर जुन्या मित्रराष्ट्रांवर अतिरिक्त आयातशुल्क लादले. शांततेला प्रोत्साहन देण्याऱ्या व्यक्तीचा खरोखरच या पुरस्कारासाठी विचार केला जातो. मात्र, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष त्या विचारांमध्ये बसत नाहीत,” असे नीना यांनी रॉयटर्सला सांगितले. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र सक्रियपणे या पुरस्कारासाठी प्रयत्न केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील अलीकडील भाषणादरम्यान त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षांसह सात युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला होता.

हेही वाचा : भारतीय वंशाच्या डॉक्टरला अमेरिकेत १४ वर्षांचा तुरुंगवास; ९/११ च्या रुग्णांवर केले होते उपचार, प्रकरण काय?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचे उलट परिणाम होणार?

“आम्ही शांततेच्या मार्गावर चालत असून युद्धे थांबवत आहोत. भारत-पाकिस्तान तसेच थायलंड-कंबोडिया यांच्यातील युद्धासह आम्ही आतापर्यंत सात युद्धविराम घडवून आणले आहेत,” असे ट्रम्प म्हणाले होते. दरम्यान, नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांकडून प्रभाव टाकण्याचे प्रयत्न अनेकदा उलटतात, असा इशारा नोबेल तज्ज्ञांनी दिला आहे. अशा प्रकारच्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणामाऐवजी नकारात्मक परिणाम जास्त होतो. कारण आम्ही समितीमध्ये याबद्दल अनेकदा चर्चा करतो. नोबेलची आस धरून बसलेल्या व्यक्तींकडे समितीकडून दुर्लक्ष केले जाते, असे नॉर्वेजियन नोबेल समितीचे उपनेते ॲस्ले तोजे यांनी स्पष्ट केले. सर्व राजकारण्यांना नोबेल शांतता पुरस्कार जिंकायचा असतो. मात्र, या पुरस्कारामागील आदर्शही त्यांनी अंगीकारले पाहिजेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळणार का? याकडे अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांचे लक्ष लागून आहे.