How Much Damage Did US Strikes on Iran Cause : इस्रायल व इराण यांच्यातील युद्ध भडकलेलं असताना अमेरिकेनेही त्यात उडी घेत ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’अंतर्गत तेहरानवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात इराणचे फोर्डो, इस्फहान आणि नतान्झ हे आण्विक तळ उद्ध्वस्त झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र, इराणने त्यांच्या या दाव्याचं खंडन केलं असून तिन्ही आण्विक तळ सुरक्षित असल्याचं म्हटलंय. त्यामुळे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे अणुकार्यक्रम खरंच उद्ध्वस्त झाले आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, या संदर्भात पेंटागॉनने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊ…
डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केलाय की, अमेरिकन लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या तिन्ही आण्विक तळांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या या दाव्याचं अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनीही समर्थन केलं आहे. याशिवाय अमेरिकेतील केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या (CIA) प्रमुखांनीही इराणचे अणुकार्यक्रम गंभीर नुकसानग्रस्त झाल्याचं सांगितलं आहे. मात्र, पेंटागॉनच्या प्राथमिक अहवालातून वेगळंच चित्र समोर येत आहे.
डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या एका लीक झालेल्या दस्तऐवजानुसार, इराणवरील आण्विक तळावरील हल्ल्यांपैकी एका ठिकाणचं नुकसान अतिशय कमी असू शकतं. युरोपियन गुप्तचर संस्थेच्या प्राथमिक अहवालातही अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा समृद्ध युरेनियमचा साठा बहुतांश सुरक्षित राहिल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) प्रमुखांनी सांगितलं की, इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमधील अनेक आण्विक तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. इस्रायलनेही असा दावा केलाय की, त्यांच्या लष्करी कारवाईमुळे इराणचा अणुकार्यक्रम अनेक वर्षांनी मागे फेकला गेला आहे.
आणखी वाचा : जॉर्ज फर्नांडिस : रेल्वे संपाचा नायक आणि हुकूमशाहीविरोधातील लढणारा नेता
अमेरिकेने इराणवर हल्ला कसा केला?
- अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्स या अत्याधुनिक लढाऊ विमानांनी इराणच्या रडारला चकवून त्यांच्या सीमेत प्रवेश केला.
- ‘बंकर बस्टर’ बॉम्ब आणि टोमहॉक क्षेपणास्त्रे वापरून फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान आण्विक तळावर हल्ले केले.
- या कारवाईनंतर ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन लष्कराने इराणच्या तीन महत्त्वाच्या अणुउद्योगस्थळांवर अचूक आणि प्रचंड हल्ले केले.
- मी जगाला सांगू इच्छितो की, आमचे हल्ले अत्यंत यशस्वी ठरले आहेत. इराणमधील आण्विक तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, असं ते म्हणाले.
- अमेरिकेची लढाऊ विमाने इराणमधून माघारी फिरल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या ‘Truth’ या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली.
- अमेरिकन लष्कराने केलेले हवाई हल्ले अचूक आणि जोरदार होते, मी त्यांचे कौतुक करतो, असं ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.
व्हाईट हाऊसचा अहवालावर आक्षेप
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचं कोणतंही नुकसान झालेलं नाही, असा अहवाल प्रसिद्ध होताच व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेव्हिट यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. “अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या आण्विक तळाचं कोणतंही नुकसान झालेलं नाही असा दावा करणारा हा कथित मूल्यमापन अहवाल पूर्णतः चुकीचा आहे. या माहितीला टॉप सिक्रेटमध्ये ठेवण्यात आले होते, मात्र तरीही एका कनिष्ठ पदावर असलेल्या गुप्तचर अधिकाऱ्याने ती माहिती लीक केली, जो खरं तर एक अपयशी व्यक्ती आहे,” असं कॅरोलिन म्हणाल्या.
कॅरोलिन आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहितात, “ही कथित माहिती लीक होणं म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना बदनाम करण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे, तसेच इराणच्या अणुकार्यक्रमावर अचूकपणे हल्ला करून तो उद्ध्वस्त करणाऱ्या धाडसी वैमानिकांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे. सर्वांनाच माहिती आहे की, जेव्हा चौदा ३०,००० पाउंडचे बॉम्ब एखाद्या लक्ष्यावर अचूकपणे टाकले जातात तेव्हा त्याचा संपूर्ण नाशच होतो.”
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात मतभेद?
दरम्यान, कॅरोलिन यांच्या या विधानामुळे अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात मतभेद होत असल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी या हल्ल्यांचं प्रचंड यश असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे गुप्तचर यंत्रणांकडून लीक होत असलेल्या माहितीमुळे या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ट्रम्प यांचे खास दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी ‘Fox News’ला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणची शस्त्रनिर्मितीची क्षमता कमी झाल्याचा दावा केला. तसेच त्यांनी लीक झालेल्या अहवालावरही संताप व्यक्त केला. “ही माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचवणं हे देशद्रोही कृत्य आहे आणि याची चौकशी झालीच पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

इराणच्या अणुस्थळांवर झालेल्या नुकसानीच्या प्रमाणावर मतभेद असूनही ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी आक्रमक भूमिका घेतली आणि हल्ला पूर्ण यशस्वी असल्याचा ठाम दावा केला. तसेच अमेरिकेच्या कारवाईवर शंका व्यक्त करणाऱ्या पत्रकारांवर टीका करण्यात आली. संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी पत्रकार परिषदेत ‘बंकर-बस्टर’ बॉम्बच्या चाचणीचे व्हिडीओ प्रदर्शित करून हल्ल्यांच्या तीव्रतेचे उदाहरण दिले. त्यांनी पत्रकारांवर आरोप केला की, लीक झालेल्या अहवालाचा अपप्रचार केला जात आहे. तुमच्या रक्तात ट्रम्पविरोधी भावना आहेत, त्यामुळे तुम्ही अमेरिकेच्या या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहात, असा संताप हेगसेथ यांनी व्यक्त केला.
युरोपियन अहवालात काय म्हटलंय?
अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणु स्थळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर युरोपियन सरकारांना प्राप्त झालेल्या प्राथमिक गुप्तचर अहवालानुसार, इराणचा उच्च-शुद्धीकरण युरेनियमचा साठा अजूनही सुरक्षित आहे. इराणने हल्ल्यापूर्वी सुमारे ४०८ किलो युरेनियम इतर ठिकाणी सुरक्षित हलवले होते, ज्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांच्या आण्विक अणुकार्यक्रमांचं जास्त नुकसान झालेलं नाही. या अहवालामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचे वातावरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
हेही वाचा : संजय गांधींच्या मैत्रीण रुख्साना सुलताना कोण होत्या? आणीबाणीत १३ हजार पुरुषांची नसबंदी कुणी केली?
पेंटागॉनच्या अहवालात कोणकोणते खुलासे?
पेंटागॉनच्या लीक झालेल्या अहवालात असं म्हटलंय की, अमेरिकेच्या हल्ल्यात इराणची तिन्ही आण्विक तळं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली नाहीत. या हल्ल्यामुळे इराणचा अणु कार्यक्रम फक्त काही महिन्यांनी मागे ढकलला आहे. हल्ल्यांपूर्वी इराणने जर अणुशस्त्र तयार करण्याचा तात्काळ प्रयत्न केला असता तर त्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागला असता; पण हल्ल्यानंतर हा कालावधी ६ महिन्यांपर्यंत वाढला आहे. अहवालानुसार, इराणचा युरेनियमचा साठा हल्ल्यांपूर्वीच हलवण्यात आला होता, ज्यामुळे तो अजूनही सुरक्षित आहे.
इराण म्हणतोय – आमची तिन्ही आण्विक तळ सुरक्षित
दरम्यान, युरोपियन आणि पेंटागॉनच्या अहवालामुळे अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या आण्विक तळांचं किती नुकसान झालं? खरंच अमेरिकेच्या हल्ल्यात आण्विक तळ नष्ट झाले का? डोनाल्ड ट्रम्प यांनी आण्विक तळ नष्ट झाल्याचा केलेला दावा खरा आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुसरीकडे, इराणने अमेरिकेच्या हल्ल्यात जास्त नुकसान झालं नसून तिन्ही आण्विक तळ सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बागाई यांनी ‘अल जझीरा’ला (आंतरराष्ट्रीय बातम्यांचं नेटवर्क) सांगितलं की, या इराणच्या अणुस्थळांना काही प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, किती नुकसान झालं याबाबत त्यांनी अधिक विस्तारानं महिती देण्यास नकार दिला आहे.