‘वनतारा’ला हत्तीच का हवे आहेत ?
‘वनतारा’ची सुरुवातच हत्तीपासून झाली आणि हत्तींमुळेच ‘वनतारा’ अधिक चर्चेत आले. मिळेल त्या ठिकाणाहून ‘वनतारा’त हत्ती आणले जात आहेत. त्रिपुरातून १२ पेक्षा अधिक हत्ती ‘वनतारा’त आणले गेले. गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील हत्तीदेखील आणले गेले. त्यानंतर महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूरचे सर्व हत्ती या ठिकाणी आणण्याचा घाट घातला गेला. मात्र, गावकऱ्यांचा विरोध एवढा प्रखर होता की, या कॅम्पमधील हत्ती नेण्याची योजना गुंडाळावी लागली.
आताही केरळ, कर्नाटक राज्यांनी याच पद्धतीने विरोध केल्यामुळे त्या ठिकाणच्या देवस्थानातील हत्ती सुरक्षित आहेत आणि म्हणूनच ‘पेटा’ला हाताशी धरून महाराष्ट्रातील हत्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. ‘वनतारा’ सुरू झाले तेव्हा एका ज्योतिष्याने अमुक इतके हत्ती आणले तर भरभराट होईल, असे सांगितले आणि त्यानंतरच हत्ती आणण्याच्या मोहिमेला वेग आला अशीही चर्चा होती.
बचाव केंद्रातील प्राणी प्रदर्शनावर सारेच गप्प का?
मागील वर्षी गोरेवाड्यातून ‘वनतारा’त रवाना करण्यात आलेल्या ‘ओरांग-उटान’ला पाहण्याचा मोह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आवरला नाही. त्यांनी या ठिकाणी ‘ओरांग-उटान’ला पाहिले, पण त्याचवेळी वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत अनुसूची एकमध्ये येणारे प्राणीदेखील हाताळले. वाघ, सिंहाच्या बछड्यावरून त्यांनी हात फिरवला. एवढेच नाही तर हत्ती, चित्ता, झेब्रा यांच्यासोबत त्यांची छायाचित्रे आणि चित्रफितीदेखील प्रसारमाध्यमांसह समाजमाध्यमांवर सामाईक झाल्या. वरिष्ठ राजकीय नेतृत्व, देशी-विदेशी पाहुण्यांना ‘वनतारा’ या बचाव केंद्रात प्राणी हाताळण्याची सहज मुभा दिली जाते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयातील प्राणी पाहता येतात. बचाव केंद्रात प्राणी हाताळणे तर दूरच, पण पशुवैद्याकांशिवाय इतरांना या ठिकाणी भेटदेखील देता येत नाही. बचाव केंद्रातील प्राणी प्रदर्शितदेखील करता येत नाही. मात्र, ‘वनतारा’ येथे हे सहज चालते.
स्वयंसेवी संस्थांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे का?
अलीकडच्या काही वर्षांत स्वयंसेवी संस्थांना आणि विशेष करून पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या ‘हाय प्रोफाइल’ संस्थांना विदेशातून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. अर्थातच त्यासाठी त्यांना त्यांचे कामही दाखवावे लागते. मात्र, हा निधी मिळवण्यासाठी अनेकदा या संस्था कोणत्याही थराला जात असल्याचे दिसून येते. ‘पेटा’ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि भारतातही ती काम करते. प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या या संस्थेचा रोख वाघ, बिबट, अस्वल यासारख्या प्राण्यांकडे नाही, तर या संस्थेने त्यांचे सर्व लक्ष हत्तींवर केंद्रित केले आहे. गुडगावस्थित एक संस्थाही याच पद्धतीने काम करत आहे. दरम्यानच्या काळात पुण्यातील एका संस्थेने महाराष्ट्रातील सर्व ‘रेस्क्यू’ची कामे आपल्या संस्थेला मिळावीत याचा घाट घातला होता. त्यासाठी वनखात्यातीलच काही अधिकाऱ्यांनी पुढाकारही घेतला. मात्र, प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या आणि हा बेत फसला. मुंबईस्थित एका संस्थेनेदेखील नामशेष होण्याच्या मार्गावरील पक्ष्यांचा अभ्यास करण्याच्या नावाखाली निधी मिळवला. प्रत्यक्षात त्या पक्ष्याच्या संरक्षण आणि संवर्धनाची गरज होती.
वनखात्यावर ‘वनतारा’चा दबाव आहे का?
मुंबईजवळ डोंबिवली येथील एका फ्लॅटमधून धाड टाकून जप्त करण्यात आलेल्या ‘ओरांग उटान’ला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय व बचाव केंद्रात आणण्यात आले. ‘वनतारा’ला तो हवा असल्याने सर्वोच्च न्यालयाच्या एका दुसऱ्या प्रकरणातील निर्णयाचा आधार घेऊन तो ‘वनतारा’ला पाठवण्याचा बेत झाला. वनखात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नियमावर बोट ठेवत याला नकार दिला. मात्र, त्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करून त्याला ‘साइड पोस्टिंग’ देण्यात आली. मर्जीतील अधिकारी या ठिकाणी आणला गेला आणि अवघ्या महिनाभरात हा ‘ओरांग-उटान’ वनताराला रवाना करण्यात आला. याच गोरेवाडा बचाव केंद्रातून वर्षभरापूर्वी १५ वाघ ‘वनतारा’त पाठवण्यात आले. तर आताही काही वाघ त्या ठिकाणी पाठवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळेच राज्यात गेल्या वर्षभरात संघर्ष न होताही वाघ पकडण्याची मोहीम तीव्र झाली आहे.
स्वयंसेवी संस्था, वनखात्याची भिस्त ‘वनतारा’वरच का?
कोल्हापुरातील ‘महादेवी’ हत्तिणीची ‘वनतारा’तं किती चांगली काळजी घेतली जात आहे, याची जाहिरातच आता ‘पेटा’ ही संस्था करत आहे. वनखाते वन्यप्राण्यांची काळजी घेण्यास सक्षम नाही, असा संदेश त्यांच्या कृतीतून दिला जात आहे. तर दुसरीकडे राज्याचे वनखातेही बंदिस्त प्राणी ‘वनतारा’कडे सोपवण्यावर अधिक भर देत आहे. नागपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय आणि बचाव केंद्र वनखात्यानेच उभारले आहे. त्याच ठिकाणी संशोधन केंद्रदेखील आहे. मात्र, ज्या पद्धतीने या केंद्रातून वाघ ‘वनतारा’त पाठवण्यात आले, ते पाहता वनखात्याला त्यांच्याच या केंद्रावर भरवसा नाही का, असा प्रश्न वन्यजीवप्रेमी उपस्थित करत आहेत.