आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता प्रभाव कंपन्यांतील मनुष्यबळासाठी बाधक नसल्याचे दावे किती फोल ठरत आहेत, हे गेल्या चार महिन्यांत आयटी क्षेत्रातच झालेल्या नोकरकपातीने उघड करून दाखवले आहे. मेटा, मायक्रोसॉफ्ट, इंटेल, गूगल, ॲमेझॉनसारख्या कंपन्यांमधून गेल्या सहा महिन्यांत ६१ हजारांहून अधिक जणांना नारळ देण्यात आला. आता टीसीएससारख्या भारतातील कंपनीने १२ हजार जणांना कामावरून कमी केल्याचे जाहीर केले आहे. ‘एआय टूल्स’च्या वापरामुळे आयटी कंपन्यांतील काही विभागांत मनुष्यबळाची फारशी गरज उरली नसल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे दिसून येते. त्याच वेळी आयटी कंपन्यांमध्ये यापुढे नवोदितांपेक्षा विशेषज्ञांना नोकऱ्यांत प्राधान्य मिळण्याचे संकेतही मिळू लागले आहेत. याचा मोठा परिणाम भारतातील आयटी विद्यार्थ्यांवर होण्याची भीती आहे.
आयटी क्षेत्रात किती नोकऱ्यांवर गंडांतर?
आयटी क्षेत्रातील रोजगारसंधींवर लक्ष ठेवून असलेल्या ‘layoffs.fyi’ या संकेतस्थळाच्या अहवालानुसार, २०२५ या वर्षात आतापर्यंत १३० कंपन्यांमधील ६१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यापैकी १५ हजार नोकऱ्या केवळ मायक्रोसॉफ्टने कमी केल्या. गूगल, ॲमेझॉनकडूनही गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शे-दोनशे कर्मचाऱ्यांना हटवण्यात आले आहे. भारतात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) १२ हजार जणांना डच्चू दिल्याचे रविवारी जाहीर केले. या कंपनीच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक मोठी नोकरकपात आहे. इंटेलनेही यावर्षी आपल्या एकूण मनुष्यबळापैकी २५ टक्के अर्थात २४ हजार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नारळ देण्याचे जाहीर केले आहे. मेटानेही अलीकडेच नोकरकपात केल्याचे जाहीर केले तर पॅनासॉनिक या जपानी आयटी कंपनीने दहा हजार नोकऱ्या रद्द करण्याची घोषणा केली आहे.
नोकरकपातीमागची कारणे काय?
कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा करताना फेररचना, खराब कामगिरी, कौशल्य कमतरता अशी कारणे सगळ्याच कंपन्यांनी दिली आहेत. टीसीएसने कंपनी अधिक भक्कम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. भारतातील सर्वात मोठी आयटी निर्यातदार कंपनी असलेल्या टीसीएसची बीएसएनएलसह देशांतर्गत कंत्राटे कमी झाल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा आहे. पण मायक्रोसॉफ्ट कंपनीने तर यंदा बक्कळ नफा कमावला असून कंपनीचे समभागही उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत कंपन्यांकडून होणाऱ्या कपातीमागे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचेच कारण असल्याचे बोलले जात आहे.
‘एआय’मुळे मनुष्यबळ निरुपयोगी?
तीन-चार वर्षांपूर्वी ‘एआय’ प्रचलित होऊ लागल्यापासून हे तंत्रज्ञान अनेकांना बेरोजगार करेल, अशी भीती व्यक्त होत होती. या तंत्रज्ञानाचे समर्थन करणाऱ्यांनी ही भीती निरर्थक ठरवून ‘एआय हे मनुष्यबळाला पूरक तंत्रज्ञान ठरेल’ असा दावा केला होता. तो आता खोटा ठरू पाहात आहे. या तंत्रज्ञानाचा सामान्य व्यवहारांमध्ये वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. पण आयटी कंपन्यांमध्ये होणारी असंख्य कामे आता ‘एआय’च्या मदतीने सहजपणे पार पाडली जात आहेत. विशेषत: ग्राहकसेवा, तांत्रिक साहाय्य, शंका निरसन, दोष शोधणे अशी कामे ‘एआय’मार्फत केली जात आहेत. एवढेच नव्हे तर, यामुळे कंपन्यांची उत्पादकता २० टक्क्यांनी वाढल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे निरीक्षण आहे. त्यामुळे आयटी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे त्यांच्या ग्राहक कंपन्यांकडून ‘एआय’साठी आग्रह धरला जात आहे. परिणामी आयटी सेवा कंपन्या ‘एआय’साठीच्या सुविधा आणि क्षमता वाढवण्यावर भर देत आहेत. त्याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्यासाठी विद्यमान मनुष्यबळाचा आढावा घेऊन अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना निरोप दिला जात आहे.
नवोदितांपेक्षा अनुभवाला प्राधान्य?
यापुढच्या काळात कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा सर्वच उद्योगांत अधिकाधिक अवलंब होणे निश्चित आहे. या तंत्रज्ञानाच्या कौशल्यक्षमता जितक्या आजमावल्या जात आहेत, तितकेच ते अधिक सक्षम होत आहे. नेमकी हीच बाब आता मनुष्यबळालाही लागू होत आहे. सध्या ‘एआय’चा सर्वाधिक वापर हा आयटी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘सपोर्ट’ सुविधांसाठी केला जात आहे. साधारण तांत्रिक समस्या, शंका किंवा त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम पूर्वी कर्मचारी करत असत. हे कर्मचारी मुख्यत्वे नवोदित किंवा प्रशिक्षणार्थी असतात. अतिशय यांत्रिक पद्धतीने चालणारे त्यांचे काम आता खऱ्या अर्थाने पूर्णपणे ‘यांत्रिक’ झाले आहे. परिणामी त्या ठिकाणी काम करणाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. त्याच वेळी आयटी कंपन्यांमध्ये ‘एआय’ला हाताळू शकतील, त्यात सुधारणा घडवू शकतील अशा मनुष्यबळाची गरज निर्माण होणारच आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नवोदित कर्मचाऱ्यांच्या भरतीची आकडेवारी पाहता कंपन्यांचा कल आता विशेषज्ञांकडे अधिक असल्याचे सिद्ध होते. टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो आदी कंपन्यांनी या तिमाहीत केवळ पाच हजार नवीन भरती केली आहे. २०२१मध्ये हा आकडा जवळपास ५३ हजार इतका होता. यावरून कंपन्या आता अननुभवी उमेदवारांपेक्षा त्या त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.
asif.bagwan@expressindia.com