रसिका मुळय़े
नव्या शिक्षण धोरणाने भारतीय शिक्षण व्यवस्थेतील बदलांची नांदी केली. अभ्यासक्रम, विद्याशाखा, मूल्यमापन या सर्वच घटकांत आमूलाग्र बदल नव्या धोरणानुसार होण्याची शक्यता आहे. सध्या या बदलांची अंमलबजावणी कूर्मगतीने सुरू असली तरी मूलभूत धोरण आराखडय़ाच्या अनुषंगाने रोज वेगवेगळय़ा विषयांतील बदलांचे आराखडे हे शिक्षणाची बदलती दिशा स्पष्ट करणारे आहेत. ही दिशा भली-बुरी हे कालौघात स्पष्ट होईलच. मात्र हे बदल नेमके काय आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. नव्या शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नुकताच राष्ट्रीय ‘श्रेयांक धोरण आराखडा’ जाहीर केला. पूर्वप्राथमिक वर्गापासून ते पीएचडीपर्यंतच्या शिक्षण प्रवासातील सध्या अमलात असलेली मूल्यमापन पद्धत या नव्या धोरणानुसार पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. सध्या उच्चशिक्षणाच्या पातळीवर लागू असलेली श्रेयांक मूल्यमापन पद्धत ही आता शालेय स्तरापासून लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या अनुषंगाने नवे धोरण, परिणाम यांचा आढावा..
श्रेयांक मूल्यमापन पद्धती काय आहे?
ठरावीक विषय, अभ्यासक्रम आणि मूल्यमापनासाठी परीक्षा असा सध्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या साच्याला श्रेयांक मूल्यमापन पद्धती ही काहीशी छेद देणारी आहे. लवचीकता हे या प्रणालीचे मूलभूत तत्त्व आहे. विद्यार्थ्यांला आवडणारे विषय त्याला शिकता यावेत आणि ते त्याच्या प्रगतिपुस्तकात गणले जावेत म्हणजेच मूल्यमापनात ग्राह्य धरले जावेत या दृष्टीने श्रेयांक पद्धती अवलंबण्यात आली आहे. वर्गातील अध्यापन, प्रत्यक्ष काम, शिकलेल्या कौशल्यांची अंमलबजावणी याची सांगड घालून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येते. परीक्षेच्या दोन-तीन तासांत लिहिलेल्या उत्तरांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांने आत्मसात केलेल्या कौशल्यांचा अदमास घेऊन त्याच्या प्रगतीचा स्तर निश्चित केला जातो. या सर्वाचा विचार करून श्रेयांक प्रणालीचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे मोजमाप हे टक्केवारी किंवा गुणांच्या (मार्काच्या) आकडेवारीनुसार न करता मिळालेल्या श्रेयांकानुसार विद्यार्थ्यांना श्रेणी दिली जाते.
शालेय स्तरापासून श्रेयांक मूल्यमापन?
सध्या उच्च शिक्षणात श्रेयांक मूल्यमापन पद्धती अमलात आहे. मात्र, त्यापूर्वी शालेय स्तरावर अपवादानेच श्रेणीनुसार मूल्यांकन होते. विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यात येत असली तरी ती परीक्षेतील गुणांवर आधारित वर्गीकरणानुसार दिली जाते. शालेय स्तरावरील म्हणजेच बारावीच्या वर्गापर्यंतचे मूल्यांकन हे प्राधान्याने लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांनुसार केले जाते. मात्र केंद्राने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय श्रेयांक आराखडय़ानुसार आता महाविद्यालयाप्रमाणे शालेय स्तरापासून श्रेयांक मूल्यमापन प्रणाली लागू करण्याचे योजले आहे. त्यासाठी जाहीर केलेल्या आराखडय़ानुसार अगदी पूर्वप्राथिमक वर्गापासून ही नवी मूल्यमापन प्रणाली लागू होईल.
शालेय स्तरावर श्रेयांक प्रणाली कशी असेल?
राष्ट्रीय शिक्षण आराखडय़ानुसार शालेय शिक्षणाची रचना पूर्वप्राथमिक ते दुसरी अशी पाच वर्षे, तिसरी ते पाचवी अशी तीन वर्षे, सहावी ते आठवी अशी तीन वर्षे आणि नववी ते बारावी अशी चार वर्षे (५+३+३+४) अशी करण्यात आली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात प्रत्येक वर्षी ८०० तास अध्यापन आणि त्यासाठी २७ श्रेयांक अशी रचना असेल. दुसऱ्या टप्प्यात अध्यापनाचे तास एक हजार असतील आणि प्रत्येक वर्षी एकूण श्रेयांक ३ असतील. तिसऱ्या टप्प्यापासून म्हणजेच सहावीपासून अध्यापनाचे तास १२०० होतील. या टप्प्यापासून वर्गातील अध्यापनाबरोबरच प्रात्यक्षिक, प्रकल्प, स्वयंअध्ययन करणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी एक हजार तास वर्गातील अध्यापन आणि २०० तास स्वयंअध्ययन असे मूल्यमापन असेल. त्यापुढील म्हणजेच नववी ते बारावीच्या टप्प्यात १२०० तासांपैकी १०८० तास वर्गातील अध्यापन तर १२० तास स्वयंअध्ययन असे वर्गीकरण असेल. सहावीपासून पुढे प्रत्येक वर्षी ४० श्रेयांक असतील आणि किमान पाच विषय अभ्यासावे लागतील. त्यानुसार प्रत्येक विषय हा ८ श्रेयांकांचा असेल. विद्यार्थ्यांचे वर्गातील अध्ययन, स्वयंअध्ययन यांबरोबरच ऑलिम्पियाडसारख्या स्पर्धा, खेळ, कला स्पर्धामधील यशही ग्राह्य धरले जाईल. मूल्यमापन प्रणाली निश्चित करताना विविध उपक्रम, स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद करण्याची शिफारस आराखडय़ात करण्यात आली आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास अभ्यासक्रम केल्यासही विद्यार्थ्यांना त्याचे श्रेयांक मिळणार आहेत.
परिणाम काय?
नव्या शिक्षण धोरणानुसार शालेय स्तरापासून अपेक्षित असलेली लवचीकता नव्या मूल्यमापन प्रणालीनुसार मिळू शकेल. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना अधिकाधिक विषयांचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत आणि त्यातील त्यांच्या आवडीचे विषय शिकण्याची मुभा द्यावी अशी सूचना देण्यात आली होती. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रत्येक स्तरानुसार त्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्याचे श्रेय त्यांना मिळेल. त्यानुसार कोणत्याही टप्प्यांवर अभ्यासक्रम बदलण्याची, शिक्षण सोडण्याची किंवा पुन्हा प्रवेश घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळेल. हा बदल आता शालेय स्तरापासून लागू करण्याची तरतूद श्रेयांक आराखडय़ात करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, एखाद्या पाचवीतील विद्यार्थ्यांने पाचवीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करून आवश्यक श्रेयांक मिळवल्यानंतर शाळा सोडली आणि त्यानंतर कौशल्य विकास अभ्यासक्रमातून पुन्हा आठवीत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक श्रेयांक मिळवले, तर असा विद्यार्थी आठवीच्या वर्गात प्रवेश घेण्यास पात्र ठरू शकेल. देशभरात सर्वच शिक्षण मंडळे, राज्ये यांच्या मूल्यमापनात समानता येऊ शकेल.
आव्हाने काय?
भारतीय शिक्षण व्यवस्थेसमोर कायमच गुणवत्तावाढीबरोबरच शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट राहिले आहे. नवी मूल्यांकन प्रणाली लागू करताना या आव्हानांचा विचार करावा लागेल. मुळातच परीक्षा, मूल्यमापन यावरून अनेक संभ्रम, वाद शालेय शिक्षणाच्या स्तरावर आहेत. उच्च शिक्षणात श्रेयांक पद्धती लागू करून जवळपास एक दशक लोटले. मात्र, त्याच्या अंमलबजावणीत अद्यापही अडचणी आहेत. अनेक विद्यापीठांनी ही पद्धत पूर्णपणे अद्यापही लागू केलेली नाही.