हृषिकेश देशपांडे
जनतेशी संवाद साधण्यासाठी तसेच पक्ष कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या संपर्क यात्रा महत्त्वाच्या ठरतात. आताही देशभर दोन-चार महत्त्वाच्या राजकीय कार्यक्रमांची चर्चा सुरू आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे विधान परिषद सदस्य खालीद अन्वर यांची भाईचारा यात्रा. तर दक्षिण तमिळनाडूत भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांचा ‘एन मन एन मक्कल’ म्हणजेच ‘माझी भूमी माझे लोक’ हा रोड शो. याखेरीज मध्य प्रदेशात काँग्रेस तसेच भाजपचे नेते यात्रांच्या माध्यमातून आपल्या पक्षासाठी वातावरण निर्मिती करत आहेत. थेट जनतेत जाण्यासाठी यात्रा हा सोपा मार्ग आहे. त्यातून जनमत ढवळून निघते.
संयुक्त जनता दलाचे लक्ष्य
बिहारमध्ये गेल्या काही वर्षांत नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाची ताकद क्षीण झाली आहे. राष्ट्रीय जनता दल किंवा भाजप यांच्याशी आघाडी केल्याखेरीज हा पक्ष सत्तेत येऊ शकत नाही. तर दुसऱ्या बाजूला जनता दलाला बरोबर घेतल्याशिवाय राज्यात बहुमत मिळत नाही अशी त्या दोन पक्षांची स्थिती आहे. थोडक्यात जनता दल जरी कमकुवत असला तरी, सत्तेच्या खेळात निर्णायक ठरतो. आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची विरोधी गटातून पंतप्रधानपदासाठी दावेदारी भक्कम करण्याच्या दृष्टीने या भाईचारा यात्रेकडे पाहिले जात आहे. मुस्लिमांची मोठी संख्या असलेल्या राज्यातील ३८ पैकी २७ जिल्ह्यामधून या यात्रेचा प्रवास राहणार आहे. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नारकटीयागंज येथून सुरुवात झाली. महिनाभर ही यात्रा चालणार असून, बिहारमधील मंत्री यामध्ये सहभागी होतील. उत्तर बिहारमधील पूर्व, पश्चिम चंपारण्य, सेहोर, सीतामढी, सिवान येथून ही यात्रा जाईल. तसेच मिथिलांचल पट्ट्यातील दरभंगा, मधुबनी तसेच सीमांचलमधील ४० टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या किशनगंज, कटिहार, अररिया तसेच पुर्णिया या जिल्ह्यांतून जाईल. राज्यातील बिहार शरीफ तसेच सासाराम येथे जातीय तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर या यात्रेला महत्त्व असून, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यात गेल्या १८ वर्षांत विविध समाजघटकांसाठी केलेले काम या निमित्ताने अधोरेखित केले जाणार असल्याचे यात्रेचे संयोजक अन्वर यांनी स्पष्ट केले.
तमिळनाडूत भाजपचे प्रयत्न…
भाजपची ताकद तमिळनाडूत दखलपात्र नाही. लोकसभेच्या ३९पैकी राज्यातील कन्याकुमारी आणि अन्य एखादी जागा सोडली तर पक्षाचे फारसे अस्तित्व नाही. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकशी आघाडी असली, तरी त्याला वैचारिक आधार नाही. दोघांची गरज म्हणून त्याकडे पाहिले जाते. राज्यात भाजपची धुरा के. अण्णामलाई या भारतीय पोलीस सेवेतून निवृत्ती घेऊन राजकारणात उतरलेल्या तरुणाकडे आहे. त्यांनी भाजपचा राज्यातील पाया व्यापक करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांची एन मन एन मक्कल ही यात्रा रामेश्वरम येथून सुरू झाली. त्याच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आले होते. त्यावरून अण्णामलाई यांचे पक्षनेतृत्वाकडे वजन लक्षात येते. अण्णामलाई विधानसभेला थोड्या मतांनी पराभूत झाले होते. राज्यातील सत्तारूढ द्रमुकविरोधात आवाज उठवणारा प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. समाजमाध्यमांवरही ते सक्रिय असतात. त्यांची यात्रा सहा महिने चालणार असून, राज्यातील सर्व ३९ लोकसभा तसेच २३४ विधानसभा मतदारसंघातून ती जाणार आहे. यात विविध दहा शहरांमध्ये मोठ्या सभा होणार आहेत. यात स्थानिकांशी संवाद साधला जाईल. जानेवारी २०२४ मध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी चेन्नईत त्याचा समारोप होईल. राज्यात भाजपचे चार आमदार आहेत. अर्थात अण्णा द्रमुकशी आघाडीचा त्यांच्या यशात वाटा आहे. अण्णामलाई यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळल्यापासून राज्यात भाजपची यंत्रणा सक्रिय करण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र मतांमध्ये त्याचे कितपत परिवर्तन होईल यात शंका आहे. राज्यात प्रमुख लढत द्रमुक विरोधात अण्णा द्रमुक या प्रादेशिक पक्षांमध्येच आहे. येथे भाजप असो की काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांच्या मदतीनेच काही जागा जिंकतात, असे पाच दशकातील निवडणूक आकडेवारीवरून दिसून येईल. एम. भक्तवत्सलम हे १९६७ मध्ये काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री. त्यानंतर राज्यात काँग्रेसला स्वबळावर मुख्यमंत्री आणता आलेला नाही. भाजपलाही राज्यात विशेष स्थान नाही. पक्षाकडून पाय रोवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अण्णामलाई यांची ही यात्रा त्याचाच एक भाग आहे.
यात्रांचा लाभ
दक्षिणेकडील राज्यांत विशेषत: आंध्र प्रदेशमध्ये अशा यात्रांच्या माध्यमातून सत्ताबदल झाला आहे. वाय.एस.आर. राजशेखर रेड्डी असो किंवा चंद्राबाबू नायडू यांच्या यात्रांमुळे तेथील राजकारण ढवळून निघाले होते. अगदी अलीकडे मध्य प्रदेशात काँग्रेसने कमलनाथ संदेश यात्रा काढली होती. पक्षाचे नेते दामोदर सिंह यादव यांच्या नेतृत्वात ही यात्रा १० जिल्ह्यातील २२ विधानसभा मतदारसंघातून गेली. भाजपने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत संत रवीदास समरसता यात्रा सुरू केली आहे. सिंगरुली जिल्ह्यातील वैधन येथून ही यात्रा सुरू झाली. शंभर कोटी रुपये खर्चून संत रवीदास यांचे मंदिर उभारले जाणार आहे. त्यासाठी ही यात्रा काढली जात आहे. राज्यातील ५२ पैकी ४६ जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. १२ ऑगस्टला सागर येथे तिचा समारोप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मध्य प्रदेशात केवळ चार महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस असा येथे चुरशीचा सामना आहे. राज्यातील १६ टक्के दलित मते मिळवण्यासाठी ही यात्रा काढली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
