गौरव मुठे

शुक्रवारी भांडवली बाजारात अदानी समूहातील बहुतांश कंपन्यांच्या समभागांना मोठ्या घसरणीने पुन्हा वेढले. निर्देशांक सेवा प्रदात्या ‘एमएससीआय’ने पुनरावलोकनानंतर अदानी समूहातील चार कंपन्यांचे भारांक (वेटेज) कमी करण्याच्या दिलेल्या संकेतांचे गंभीर पडसाद समभागांच्या विक्रीत उमटले. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’चा संशोधन अहवाल आणि त्यातील हेराफेरी आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे समूहातील कंपन्यांच्या बाजार भांडवलाला, २४ जानेवारीपासून जवळपास १२,००० कोटी डॉलरचे नुकसान सोसावे लागले आहे. ‘एमएससीआय’च्या ताज्या पवित्र्याचे औचित्य काय, अदानी समूहासंबंधाने त्याचे परिणाम काय आणि सामान्य गुंतवणूकदारांनी त्यातून कोणता बोध घ्यावा, याचे हे विश्लेषण…

‘एमएससीआय’ म्हणजे काय?

जागतिक मान्यतेची गुंतवणूक व्यवस्थापन आणि वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅन्ले यांच्या मालकीची मॉर्गन स्टॅन्ले कॅपिटल इंटरनॅशनल अर्थात ‘एमएससीआय’ ही एक कंपनी आहे. जागतिक पातळीवर गुंतवणूक समुदायासाठी समभागांवर आधारित निर्देशांक आणि संलग्न सेवा प्रदान करणारी ही प्रतिष्ठित कंपनी आहे. ठरावीक कालावधीत बाजारभाव किंवा अन्य मापनीय चलांत होणाऱ्या बदलांची सर्वसाधारण पातळी आजमावण्याचे गमक म्हणजे निर्देशांक होय. अशा जगभरात वापरात येणाऱ्या निर्देशांकांची बांधणी, त्याचबरोबर या निर्देशांकांचे देखभाल, निगराणीचे कार्यदेखील ‘एमएससीआय’कडून पार पाडले जाते. आजच्या घडीला तिच्या सेवा गुलदस्त्यात, जगभरातील विविध बाजारात वापरात असलेले १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त निर्देशांक आहेत. शिवाय जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांकडून त्या आधारित आधुनिक गुंतवणूक रणनीती निश्चित केली जाते. एक्सचेंज-ट्रेडेड फंड आणि एक्सचेंज-लिस्टेड फ्युचर्स आणि ऑप्शन (वायदे व्यवहार) निर्देशांकांना परवाना देण्याचे काम देखील ती करते.

‘एमएससीआय निर्देशांक’ काय आहे? त्याला इतके महत्त्व का?

‘एमएससीआय इंडिया निर्देशांका’तील अदानी समूहातील चार कंपन्यांच्या भारांकात बदल सूचित केला आहे. भारताच्या भांडवली बाजाराला व्यापणाऱ्या ११३ कंपन्यांना ‘एमएससीआय इंडिया निर्देशांका’त स्थान आहे. त्यापैकी अदानी समूहातील चार कंपन्या म्हणजे अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि एसीसी यांच्या भारांकात बदल होत आहे. उल्लेखनीय म्हणजे या निर्देशांकात रिलायन्स इंडस्ट्रीजला ९.८९ टक्के असे सर्वोच्च भारांक असून, ताज्या निर्णयाने भारांक कमी केलेल्या अदानी समूहातील चार कंपन्या भाराकांनुसार पहिल्या दहांच्या पंक्तीतही नाहीत. मुख्यत: विदेशी गुंतवणूकदारांकडून ‘एमएससीआय निर्देशांका’ची कामगिरी लक्षात घेऊन गुंतवणूकविषयक निर्णय घेतला जात असल्याने, त्याला देशाच्या भांडवली बाजारातही महत्त्व आहे. नियतकालिक (तिमाही स्वरूपात) फेरआढावा घेतला जाणाऱ्या ‘एमएससीआय इंडिया निर्देशांका’तील अलिकडे झालेल्या फेरनिर्धारणानंतर, बँक ऑफ बडोदा आणि सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स यांना जागा देण्यात आली आहे, तर बायोकॉनला निर्देशांकातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

‘फ्री फ्लोट’ म्हणजे काय आणि अदानींच्या कंपन्यांबाबत ‘एमएससीआय’ने टाकलेले पाऊल काय?

अमेरिकी संस्था ‘हिंडेनबर्ग’च्या संशोधन अहवालातील विविध प्रकारच्या अनियमितता आणि लबाड्यांच्या आरोपांच्या परिणामी अदानी समूहातील सर्वच कंपन्यांच्या समभागांत मोठी वाताहत सुरू आहे. बँका व वित्तसंस्थांकडे समभाग गहाण/ तारण ठेऊन त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात कर्ज अदानी समूहातील कंपन्यांनी घेतले आहे. जागतिक आघाडीच्या निर्देशांक प्रदात्या ‘एमएससीआय’साठी तिच्या निर्देशांकात सामील कंपन्यांचे ‘फ्री फ्लोट’ समभागांचे अर्थात तरलतेचे प्रमाण किती हा महत्त्वाचा निकष आहे. ‘फ्री फ्लोट’ म्हणजे भांडवली बाजारात कोणत्याही निर्बंधांशिवाय व्यापारास खुल्या असलेल्या समभागांचे प्रमाण होय. प्रवर्तकांव्यतिरिक्त सार्वजनिकरित्या छोट्या व व्यक्तिगत गुंतवणूकदारांकडील समभागांचे प्रमाण अर्थात ‘फ्री फ्लोट’ ज्यांचे अधिक आहे अशा कंपन्यांचे निर्देशांकातील वजनही अधिक, असे सूत्र ‘एमएससीआय’कडून अनुसरले जाते. कर्जासाठी गहाण/ तारण समभागांचे उच्च प्रमाण आणि समभागांतील ताजी मोठी पडझड पाहता, अदानी समूहातील कंपन्यांतील प्रवर्तकांव्यतिरिक्त, सार्वजनिकरित्या उपलब्ध भागहिस्सा हा सर्वच्या सर्व ‘फ्री फ्लोट’ मानता येणार नाही, अशी भूमिका ताज्या अवलोकनातून ‘एमएससीआय’ने घेतली. यातून ‘फ्री फ्लोट’मधील कपातीसह संबंधित कंपनीचा निर्देशांकातील आनुषंगिक भारांकही कमी केला जाईल, असे तिने स्पष्ट केले. अदानी समूहातील चार कंपन्यांचा सध्याचा निर्देशांकातील एकत्रित भारांक ०.४ टक्के आहे. त्यात संभाव्य कपात ही येत्या १ मार्चपासून लागू होईल.

अदानी समूहातील कंपन्यांवर याचे परिणाम काय?

आधी म्हटल्याप्रमाणे, सहजपणे व्यवहार होणाऱ्या, उच्च तरलता आणि ‘फ्री फ्लोट’ मोठे असलेल्या कंपन्यांचा ‘एमएससीआय’ निर्देशांकातील वजनही जास्त असते. निर्देशांकात कंपन्यांना दिलेल्या भारांकानुसार गुंतवणुकीचे निर्णय जागतिक गुंतवणूकदारांकडून घेतले जात असतात. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार, हेज फंड आणि वेल्थ फंडांद्वारे ‘एमएससीआय’ निर्देशांकांचा मोठ्या प्रमाणावर मागोवा घेतला जातो, जे या निर्देशांकांद्वारे दिल्या गेलेल्या भारांकानुसार भारतासह इतर उदयोन्मुख भांडवली बाजारपेठांमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतात. मुख्यत: ‘एमएससीआय’ निर्देशांकावर बेतलेल्या पॅसिव्ह अर्थात निष्क्रिय व्यवस्थापित ग्लोबल फंडांची रचनाच अशी असते की, निर्देशांकातील नवीन रचनेप्रमाणे त्यांना त्यांच्या अदानी समूहातील कंपन्यांतील गुंतवणुकीला कात्री लावणे क्रमप्राप्तच ठरेल. एकूणात निर्देशांकातील भारांकात जितकी कपात, तितकी या समभागातील परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूकही घटत जाण्याचा परिणामही स्पष्टपणे दिसून येतो. वस्तुत: मागील दोन दिवसांत ही निर्गुंतवणूक प्रत्यक्षात सुरू झाल्याचे अदानींच्या समभागातील मोठ्या घसरणीतून दिसत आहे.

रुपयाच्या मूल्यावर ताणही अपरिहार्य काय?

अदानी समूहावरील ताजे संकट उत्तरोत्तर गहिरे रूप धारण करीत असून, विशेषत: परदेशी गुंतवणूकदारांची या समूहाकडे पाठ करून गुंतवणूक काढून घेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एकूणात भारतीय बाजारातून गुंतवणूक डॉलर, पौंडाच्या रूपात माघारी जाण्याचे परिणाम हे थेट भारतीय चलन अर्थात रूपयाच्या मूल्यावर ताण आणतील. ‘एंजल वन’ या दलाली पेढीच्या चलनविषयक विश्लेषक हिना नाईक यांच्या मते, अदानी समभागांतील आपटीच्या परिणामी रुपया-डॉलर विनिमय दर येत्या काही दिवसांत ८४ च्या वेशीवर जाईल. त्यांच्या मते फेब्रुवारीअखेरीस ते ८३.८०ची पातळी गाठण्याची शक्यता आहे.

gaurav.muthe@expressindia.com