Body is starved of food sideeffects ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलने गाझावर हल्ले सुरू केले. तेव्हापासून उपासमार आणि कुपोषणामुळे अनेकांना मृत्यूने कवटाळले आहे. त्यापैकी बहुतांश मृत्यू गेल्या काही महिन्यांत नोंदवले गेले आहेत. याचे कारण म्हणजेच तेथील आधीच नाजूक असलेली परिस्थिती अधिकच ढासळली आहे. या वर्षी मार्चमध्ये इस्रायलने आपली नाकेबंदी अधिक कडक केली आणि त्यामुळे मदत कर्मचारीही मदत पुरवू शकत नव्हते. त्यामुळे जवळजवळ अन्न आणि वैद्यकीय पुरवठा पूर्णपणे थांबला. या निर्णयामुळे मदत सामग्रीने भरलेले ट्रक सीमा ओलांडून आत जाऊ शकले नाहीत आणि लोकांना तातडीची गरज असूनही त्यांच्यापर्यंत वेळेत मदत पोहोचू शकली नाही. त्याचे परिणाम भयानक झाले.
गाझाच्या २.१ दशलक्ष रहिवाशांना सतत बॉम्बवर्षाव आणि मोठ्या प्रमाणात विस्थापन समस्येला सामोरे जावे लागले आहे. अनेकांना अनेक वेळा पळून जाण्यास भाग पाडले गेले आहे, काहींना संघर्ष सुरू झाल्यापासून अनेक वेळा स्थलांतर करावे लागले आहे. या अस्थिरतेमुळे आणि मदतीत अडथळे आल्यामुळे गाझात उपासमारीची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांत समोर आलेल्या फोटोंमध्ये लहान मुले कुपोषित आणि अशक्त दिसत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामने नोंदवले आहे की, एक-तृतीयांशपेक्षा जास्त लोक अनेक दिवसांपासून उपासमारीने तडफडत आहेत.
स्थानिक डॉक्टरांनी रुग्णालयांमधील परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्यानुसार तेथील अनेक पॅलेस्टिनी इतके अशक्त आहेत की, ते रक्तदानही करू शकत नाहीत. मुख्य म्हणजे मातांना त्यांच्या बाळांसाठी स्तनपान करण्यासाठी पुरेसे दूध तयार करता येत नाहीये. केवळ जुलै महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेने गाझामध्ये कुपोषणामुळे ६३ मृत्यूंची नोंद केली. युनिसेफचा (UNICEF) अंदाज आहे की, सध्या एक लाख महिला आणि मुले गंभीर कुपोषणाने त्रस्त आहेत. इतर संयुक्त राष्ट्र संस्थांनी इशारा दिला आहे की, रोग वेगाने पसरत आहेत आणि आरोग्य सेवा जवळजवळ पूर्णपणे कोलमडल्या आहेत. परंतु, अन्न-पाण्याशिवाय मानवी शरीराचे काय होते? गाझामध्ये उपासमारीमुळे मृत्यू का होत आहेत? जाणून घेऊयात.
अन्नाशिवाय मानवी शरीराचे काय होते?
- खूप काळ अन्न न मिळाल्यास मानवी शरीरात अनेक गंभीर बदल होतात. त्यामुळे शेवटी माणसाचा मृत्यू होऊ शकतो.
- “जर तुम्ही पुरेसे खात नसाल, तरीही जिवंत राहण्याच्या दृष्टीने आपल्या शरीराने अंतर्गत काही यंत्रणा तयार केल्या आहेत,” असे अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधील कुपोषण तज्ज्ञ डॉ. केविन स्टीफन्सन यांनी नॅशनल पब्लिक रेडिओला (NPR) सांगितले.
- “आपण स्वतःच्याच शरीराला पोषणासाठी खातो,” असे ते म्हणतात. त्यांच्यानुसार शरीर बाह्य ऊर्जास्रोतांशिवाय जगण्यासाठी स्वतःला पाच टप्प्यांत तयार करते.

पहिला टप्पा
अन्न न मिळाल्यास सुरुवातीला शरीर सर्वांत सोप्या ऊर्जास्रोताचा म्हणजेच साठवलेल्या कर्बोदक (Carbohydrates)चा वापर करते, जे यकृतामध्ये असते. “आपल्या यकृतातील कर्बोदकांचे साठे प्रोटीन बारसारखे आहेत, जे आपले शरीर चालवण्यासाठी तयार झाले आहे,” असे स्टीफन्सन स्पष्ट करतात. रात्री उपाशी राहिल्यास किंवा एक वेळ जेवण न केल्यासही शरीर हे साठे वापरते. मात्र, त्यानंतरही पोटात अन्न गेले नाही, तर कर्बोदकांचे साठे २४ ते ४८ तासांत संपून जातात आणि वजन कमी होण्यास सुरुवात होते. पचनमार्गात अन्नाचे कण साफ करण्याची एक प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे भुकेची कळ आणि पोटात गडगड, असा आवाज येऊ शकतो.
दुसरा टप्पा
दुसऱ्या दिवसापासून शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी चरबीचा (Fat) वापर करू लागते. चरबीचे विघटन (Breakdown) होऊन ऊर्जा तयार होत असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar levels) कमी होते. त्यामुळे थकवा, चक्कर व डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
तिसरा टप्पा
तिसऱ्या दिवसात यकृत कीटोन्स (Ketones) तयार करू लागते. ते चरबीपासून तयार झालेले घटक आहेत, जे मेंदूसाठी पर्यायी इंधन म्हणून काम करतात. या कीटोन्समुळे शरीर रक्तातील साखरेची पातळी कमी झाली असल्यासही काम करीत राहते. या टप्प्यात, काहींना मानसिक स्फूर्तीचा अनुभव येतो आणि खाण्याची इच्छा कमी झाल्याचेही जाणवते.
चौथा टप्पा
जेव्हा उपासमार अनेक दिवस वाढते, तेव्हा शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी आपल्या चयापचय क्रियेचा (Metabolism) वेग कमी करते. मग हृदयाची गती व रक्तदाब कमी होतो आणि शरीर काही महत्त्वाच्या हार्मोन्सचे (Hormones) उत्पादन कमी करते. “जगण्यासाठी महत्त्वाचे नसलेले हार्मोन्स कमी केले जातात,” असे स्टीफन्सन सांगतात. थायरॉईड हार्मोन्स कमी होतात, त्यामुळे सुस्ती येते; प्रजनन हार्मोन्सही कमी होतात, ज्यामुळे मासिक पाळी थांबते.
पाचवा टप्पा
अखेरीस शरीरातील चरबीचे साठे संपून जातात. या स्थितीत पोहोचण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिने लागू शकतात. हा कालावधी व्यक्तीच्या सुरुवातीच्या चरबीच्या साठ्यावर अवलंबून असतो. या टप्प्यावर, शरीर स्नायूंचे प्रोटीन वापरण्यास सुरुवात करते, त्यात हृदयासारख्या जीवनावश्यक स्नायूंचाही समावेश असतो. स्टीफन्सन सांगतात, “शरीर शक्य तितके स्नायू वाचवण्याचा प्रयत्न करते. कारण- स्नायू तयार करण्यासाठी खूप ऊर्जा लागते; पण शेवटी स्नायूदेखील हार मानतात.” या टप्प्यामुळे उपासमारीची सर्वांत स्पष्ट चिन्हे दिसतात. त्यात स्नायूंचा नाश, अशक्तपणा, सुजलेले पाय आणि पोट, ठिसूळ केस, पातळ कोरडी त्वचा व खोल गेलेले डोळे, अशी चिन्हे दिसू लागतात.
जर उपासमार चालूच राहिली, तर अवयव प्रणाली (Organ systems) निकामी होते. रोगप्रतिकार शक्ती (Immune system) पूर्णपणे कमी होते, त्यामुळे शरीर अशा संक्रमणांना बळी पडते, ज्यांच्याशी ते आता लढू शकत नाही. हृदयाचे स्नायू कमकुवत झाल्यास हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि त्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ज्यांना पाणी उपलब्ध आहे असे प्रौढ लोक अन्नाशिवाय दोन महिन्यांपर्यंत जगू शकतात. पण अखेरीस, या पाचव्या टप्प्यात योग्य प्रकारे अन्न मिळाले नाही, तर उपासमार प्राणघातक ठरते.
गाझात उपासमार कशी प्राणघातक ठरतेय?
गंभीर कुपोषण यावर उपचार करणे शक्य आहे. तरीही परिस्थितीकडे लक्ष दिले नाही, तर ते सर्वांत प्राणघातक ठरू शकते. “जगात अशा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत, ज्या आपण ठीक करू शकत नाही; पण गंभीर कुपोषण त्यापैकी नाही,” असे स्टीफन्सन म्हणतात. अमेरिका आणि इस्रायलच्या पाठिंब्याने गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशनने (GHF) मे महिन्यात मदतवाटपाची केंद्रे सुरू केली; पण ही केंद्रे जीव वाचवणारे साधन नसून, अनेक मानवाधिकार संस्थांच्या मते ते जीवघेणे सापळे ठरत आहेत. गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशनच्या वितरण केंद्रांवर किंवा त्यांच्या जवळ एक हजारहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. मदत केंद्रांचे व्यवस्थापन करणाऱ्या सुरक्षा दलांनी गर्दीवर थेट गोळीबार केल्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी अश्रुधुराचा (Tear gas) वापर केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.