Jagdeep Dhankhad resignation जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे पदाचा राजीनामा सादर केला आहे. सोमवारी उशिरा रात्री आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे मुदतीपूर्वीच हे पद रिक्त झाले आहे. या रिक्त पदासाठी निवडणुका कधी होतील? उपराष्ट्रपतींचा कार्यभार आता कोण सांभाळणार? निवडणुकीची प्रक्रिया काय असेल? त्याविषयी जाणून घेऊयात.
भारताच्या इतिहासात आपला कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी राजीनामा देणारे जगदीप धनखड हे तिसरे उपराष्ट्रपती आहेत. यापूर्वी व्ही. व्ही. गिरी आणि आर. व्यंकटरमण यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका लढवण्यासाठी राजीनामा दिला होता. व्ही. व्ही. गिरी यांच्या जागी गोपाळ स्वरूप पाठक आणि आर. व्यंकटरमण यांच्या जागी शंकर दयाळ शर्मा यांची निवड झाली होती. जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम ६७ (अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा देत आहे.

उपराष्ट्रपतींची कर्तव्ये आता कोण पार पाडणार?
संविधानात कार्यवाहक उपराष्ट्रपतीची तरतूद नाही. परंतु, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांच्या उपस्थितीत राज्यसभेचे कामकाज पार पडते. आता त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती सभागृहाचे कामकाज सांभाळतील. सध्या हरिवंश नारायण सिंह हे उपसभापती आहेत.
उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक कधी होईल?
राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यास रिक्त जागा सहा महिन्यांच्या आत भरण्याची आवश्यकता असते. परंतु, उपराष्ट्रपतींच्या रिक्त जागेसाठी अशी कोणतीही निश्चित अंतिम मुदत नाही. त्यात एकमेव अट अशी आहे की, पद रिक्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर निवडणूक घेतली जावी. निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर निवडणूक घेतली जाईल. ही निवडणूक राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२ अंतर्गत घेतली जाते. त्यासाठी निवडणूक आयोग निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करतात. ते लोकसभा किंवा राज्यसभेचे महासचिव असतात.
नवीन उपराष्ट्रपती किती काळ सेवा देतील?
नवीन उपराष्ट्रपतीला केवळ धनखड यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत नव्हे तर त्यांच्या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत पदावर कार्यरत राहावे लागेल.
नवीन उपराष्ट्रपतींची निवड कशी होते?
उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील म्हणजेचे लोकसभा आणि राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असलेल्या ‘इलेक्टोरल कॉलेज’द्वारे केली जाते. राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणे, यात राज्य विधानमंडळांचा समावेश नसतो. नवीन दिल्लीतील संसद भवनात गुप्त मतदानाने, एकल संक्रमण मताद्वारे मतदान होते. हे खासदार पसंतीक्रमानुसार मतदान करतात. त्यांना मतदाराला प्राधान्य क्रमाने मतदान करावे लागते. त्यासाठी मतपत्रिकेवर पहिल्या पसंतीला एक, दुसऱ्या पसंतीसाठी दोन असा क्रमांक लिहावा लागतो. निवडून येण्यासाठी उमेदवाराला आवश्यक किमान मते मिळवावी लागतात. त्याला ‘कोटा’ म्हणतात.
हे एकूण वैध मतांना दोनने भागून एक जोडून मोजले जाते. पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराने कोटा ओलांडला नाही, तर सर्वात कमी पहिल्या पसंतीची मते असलेला उमेदवार बाद होतो आणि त्यांची मते दुसऱ्या पसंतीच्या आधारावर उर्वरित उमेदवारांना हस्तांतरित केली जातात. जोपर्यंत एक उमेदवार कोटा पार करत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते. मत मोजणीसाठी सर्वात आधी मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्या दोनने भागली जाते आणि नंतर त्यात एक जोडला जातो.
उपराष्ट्रपतिपदासाठीचे निकष खालीलप्रमाणे :
⦁ उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक लढवणारी व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
⦁ त्यांचे वय किमान ३५ वर्षांपेक्षा जास्त असावे.
⦁ राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावी.
⦁ कोणत्याही संसदीय मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणीकृत असावी.
⦁ राष्ट्रपती, राज्यपाल किंवा मंत्री यांसारखी पदे वगळता त्यांना केंद्र किंवा राज्य सरकारांच्या अंतर्गत कोणतेही पद धारण करता येणार नाही.
जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा
जगदीप धनखड यांनी एका पत्रात आरोग्यासंबंधी कारणे आणि उपचार घेण्याच्या सल्ल्याचा हवाला देत, संविधानाच्या कलम ६७(अ) अंतर्गत त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात, धनखड यांनी पुढे त्यांच्या कार्यकाळात त्यांना मिळालेला पाठिंबा आणि सौहार्दपूर्ण संबंधांसाठी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आणि त्यांचा पाठिंबा अमूल्य असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्या कार्यकाळादरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकल्याचेही धनखड यांनी म्हटले.
मार्च महिन्यात जगदीप धनखड यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयाशी संबंधित इन्फेक्शन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच धनखड यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी अधिवेशनाचा पहिला दिवस होता.