नोव्हेंबर महिन्यातील अखेरचा शुक्रवार हा अमेरिका, युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये ‘ब्लॅक फ्रायडे सेल’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवसापासून नाताळच्या खरेदीला सुरुवात होते आणि विक्रेते, व्यापाऱ्यांकडून विविध सवलतीही दिल्या जातात. सध्या तर ऑनलाइन खरेदीवरही मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारतातही ‘ब्लॅक फ्रायडे’ची क्रेझ आहे. ब्लॅक फ्रायडे म्हणजे नेमके काय, त्यामागचा इतिहास काय, तो का साजरा केला जातो, यासंबंधीची माहिती…

ब्लॅक फ्रायडे म्हणजे काय?

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस येणारा नाताळ हा सण साजरा करण्यास एक महिना आधापासूनच सुरुवात केली जाते. मग सणानिमित्त होणाऱ्या खरेदीला नोव्हेंबरच्या अखेरीस सुरुवात केली जाते. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी विशेषत: नाताळच्या खरेदीला सुरुवात होते. त्यामुळे अमेरिका व पाश्चात्य देशांत या दिवसाला अधिक महत्त्व आहे. ‘थँक्सगिव्हिंग’च्या नंतरच्या दिवसाचा संदर्भ देण्यासाठी अमेरिकेत सर्वात लोकप्रिय दिवस म्हणजे ‘ब्लॅक फ्रायडे’ हा आहे. कारण या दिवसापासून खरेदी हंगामाला सुरुवात होते. थँक्सगिव्हिंग नेहमी नोव्हेंबरमधील चौथ्या गुरुवारी असतो, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ब्लॅक फ्रायडे. या दिवशी किरकोळ विक्रेते, तसेच मॉलमध्ये खरेदीसाठी विशेष सवलत दिली जाते. विक्रेत्यांकडून खरेदीदाराला आकर्षक भेटवस्तूही मिळतात. त्यामुळे या दिवसापासून नाताळनिमित्त बाजार फुलू लागतो आणि बाजाराला चैतन्य येते.

हेही वाचा : इंटरनेटवर धमाल उडवून देणारं ‘Chill Guy’ मीम काय आहे? नेटिझन्समध्ये याची इतकी चर्चा का?

ब्लॅक फ्रायडे शब्द कसा बनला?

ब्लॅक फ्रायडे हे नाव पहिल्यांदा २४ सप्टेंबर १८६९ रोजी वापरले गेल्याचे मानले जाते. अमेरिकेत सोन्याच्या सट्टेबाजांनी आर्थिक दहशत निर्माण केली, त्या वेळी शुक्रवार होता. या आर्थिक दहशतीची तीव्रता दर्शवण्यासाठी त्यापुढे ब्लॅक हा शब्द जोडून ‘ब्लॅक फ्रायडे’ हा शब्द रूढ झाला. हा शब्द १९५०च्या दशकात संदिग्धपणे अमेरिकी किरकोळ बाजारात खरेदी-प्रेरित गर्दीचे वर्णन करण्यासाठी वापरला गेला. १९८० च्या दशकात नफा कमविणारा दिवस म्हणून ‘ब्लॅक फ्रायडे’ हा शब्द वापरला गेला. अमेरिकी बाजारात तोट्यासाठी लाल रंग तर नफ्यासाठी काळा रंग वापरला जातो. त्यामुळे किरकोळ विक्रेते सुट्टीच्या खरेदी कालावधीत वाढलेल्या विक्रीमुळे तोटा (लाल) भरून काढत नफा (काळा) कमवतात, म्हणून हा शब्द वापरला जातो.

बाजारात खरेदीची सवलत किती दिवस?

नोव्हेंबरच्या शेवटच्या शुक्रवारी ‘ब्लॅक फ्रायडे’ला सुरुवात झाल्यानंतर खरेदीचा हा उत्सव पाच दिवस किंवा आठवडाभर असतो. बहुतेक बाजारात ही विक्री सोमवारपर्यंत (सायबर सोमवार) किंवा आठवड्यासाठी (सायबर आठवडा) सुरू राहते, जी किरकोळ उद्योगातील वार्षिक विक्रीच्या जवळपास एकपंचमांश आहे. सध्या ऑनलाइन बाजारात विविध सवलती दिल्या जातात. त्या महिनाभर म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंतही असतात.

हेही वाचा : युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात वाढतोय ‘डार्क टुरिझम’; पर्यटकांना आकर्षित करणारा हा प्रकार नेमका काय आहे?

विक्रेत्यांना ‘ब्लॅक फ्रायडे’चा फायदा कसा?

ब्लॅक फ्रायडे विक्री हा महत्त्वाच्या सुट्टीच्या खरेदी हंगामाचा प्रारंभबिंदू म्हणून काम करतो, ज्या कालावधीत किरकोळ विक्रेते त्यांच्या वार्षिक कमाईचा महत्त्वपूर्ण भाग निर्माण करण्याची अपेक्षा करतात. किरकोळ विक्रेत्यांसाठी हा एक महत्त्वाचा कालावधी आहे, कारण त्याचा त्यांच्या वार्षिक विक्रीच्या आकडेवारीवर लक्षणीय परिणाम होतो. तंत्रज्ञान, कपडे आणि घरगुती वस्तू यांसारख्या उत्पादनांवर ग्राहक अविश्वसनीय बचतीचा लाभ घेऊ शकतात. विक्रेते भरीव सूट देऊन खरेदीसाठी ग्राहकांना प्रोत्साहित करतात. किरकोळ विक्रेते अनेकदा ब्लॅक फ्रायडेचा वापर जुना किंवा अतिरिक्त माल काढून टाकण्यासाठी करतात, ज्यामुळे सुट्टीच्या आधी नवीन मालासाठी जागा मिळते. ब्लॅक फ्रायडेचे स्पर्धात्मक स्वरूप ग्राहकांचे हित वाढवून, आकर्षक व्यवहारासह स्टोअर्सना एकमेकांना मागे टाकण्यास प्रवृत्त करते. या दिवसांत अनेक व्यापारी, विक्रेते तसेच कंपन्यांकडून माध्यमांना जाहिरती दिल्या जातात. आकर्षक सवलतींच्या जाहिरातींमुळे विक्रीमध्ये अधिक वाढ होते.

हेही वाचा : विश्लेषण : इस्रायल-हेजबोला युद्धबंदी किती काळ टिकणार? ही पश्चिम आशियातील शांततेची सुरुवात आहे का?

भारतात सुरुवात कशी?

‘थँक्सगिव्हिंग डे’नंतर, ब्लॅक फ्रायडे हा अमेरिकेमध्ये वर्षातील सर्वात व्यग्र खरेदी दिवसांपैकी एक बनला आहे. पूर्वी केवळ अमेरिकेत ब्लॅक फ्रायडे साजरा केला जायचा. मात्र नंतर ही संकल्पना अमेरिकेतील इतर देश आणि युरोपमध्ये स्वीकारली गेली. आता जगातील बहुतेक देशांमध्ये ब्लॅक फ्रायडे साजरा केला जातो. भारतातही आता हा दिवस साजरा करण्यात येतो. किरकोळ बाजारात प्रत्यक्ष ब्लॅक फ्रायडे साजरा केला जात नसला तरी काही मोठी दुकाने, शॉपिंग स्टोअर, मॉलमध्ये खरेदीदारांना सवलती दिल्या जातात. ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून दिवाळीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात आकर्षक सवलती दिल्या जातात. या दिवसांत इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह घरकामांसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होते. अमेरिकी ऑनलाइन विक्री कंपनी ईबेने ब्लॅक फ्रायडे विक्रीची प्रथा भारतात सुरू केली. २०१८ च्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी या कंपनीकडून ग्राहकांना मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी सवलती देण्यात आल्या होत्या, तेव्हापासून भारतामध्ये ‘ब्लॅक फ्रायडे सेल’ साजरा करण्याची प्रथा पडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sandeep.nalawade@expressindia.com