What is Black Friday Sale: २९ नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून जगभरात ब्लॅक फ्रायडे सेल सुरू होत आहे. या दिवशी वेगवेगळ्या आस्थापनांकडून खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलत मिळते. अनेक जण वर्षभर या दिवसाची वाट पाहतात. किंबहुना ऑनलाईन वस्तू विक्री करणारे प्लॅटफॉर्म या दिवसाच्या निमित्ताने मिळणाऱ्या सवलतीची विशेष जाहिरात करतात. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातही या दिवसाची विशेष क्रेझ दिसून येत आहे. त्याच निमित्ताने ब्लॅक फ्रायडे म्हणेज काय? हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

ब्लॅक फ्रायडेचे मूळ काय? What is Black Friday?

मूलतः ब्लॅक फ्रायडे हा दिवस पाश्चिमात्य संस्कृतीतून जगभरात पसरलेला आहे. विशेषतः अमेरिकेकडे या दिवसाचे श्रेय जाते. डिसेंबर महिन्यातील नाताळच्या आधी ‘थँक्स गिव्हिंग’ जेवणानंतर येणाऱ्या शुक्रवारी ब्लॅक फ्रायडे येतो. या दिवशी सर्वात जास्त खरेदी केली जाते. या दिवशी होणाऱ्या खरेदीवर ग्राहकांना सर्वात जास्त सवलत मिळते, असा एक समज आहे. म्हणूनच पाश्चिमात्य देशांमध्ये या दिवसाचे वर्णन ‘हॉलिडे शॉपिंग सीझन’ म्हणूनही केले जाते.

ब्लॅक फ्रायडे म्हणजे काय आणि तो कधी साजरा केला जातो?

ब्लॅक फ्रायडे हे नाव दोन असंबंधित प्रसंगांचा संदर्भ दर्शविण्यासाठी वापरलेले आहे. ब्लॅक म्हणजे काळा आणि फ्रायडे म्हणजे शुक्रवार, म्हणजेच काळा शुक्रवार. थँक्सगिव्हिंगच्या नंतरच्या दिवसाचा संदर्भ देण्यासाठी अमेरिकेत सर्वात लोकप्रिय दिवस म्हणजे ‘ब्लॅक फ्रायडे’ हा आहे. हा दिवस बहुतेक वेळा सुट्टीच्या खरेदी हंगामाचा पहिला दिवस मानला जातो, तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून सवलत मिळविण्याचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो.
ब्लॅक फ्रायडे हा नेहमीच थँक्सगिव्हिंग नंतरचा शुक्रवार असतो, थँक्सगिव्हिंग नेहमी नोव्हेंबरमधील चौथ्या गुरुवारी येतो तर ब्लॅक फ्रायडे शुक्रवारी. २०२३ मध्ये, ब्लॅक फ्रायडे हा २४ नोव्हेंबरला म्हणजे आज आहे. तर २०२४ मध्ये, ब्लॅक फ्रायडे हा २९ नोव्हेंबरला असणार आहे.

अधिक वाचा: Indira Gandhi : एक अधुरी प्रेम कथा… इंदिरा आणि फिरोज

ब्लॅक फ्रायडे हा शब्द कुठून आला? What’s the story behind Black Friday?

ब्लॅक फ्रायडे हे नाव प्रथम २४ सप्टेंबर १८६९ रोजी वापरले गेल्याचे मानले जाते, या दिवशी सोन्याच्या सट्टेबाजांनी अमेरिकेत आर्थिक दहशत निर्माण केली होती आणि हा दिवस शुक्रवार होता. या दहशतीची तीव्रता दर्शवण्यासाठी ब्लॅक हा शब्द वापरला गेला. त्यामुळेच ब्लॅक फ्रायडे हा शब्द रूढ झाल्याचे मानले जाते. किंबहुना नंतरच्या काळातही काही नकारात्मक बाबी दर्शविण्यासाठीही ब्लॅक फ्रायडे हा वाक्प्रचार रूढ झाल्याचे दिसते. अनेकांच्या मते ब्लॅक हा शब्द नफा दर्शविण्यासाठी वापरला जातो, अशी धारणा आहे. परंतु प्रत्यक्षात काळा रंग हा अमेरिकेच्या व्यावसायिक भरभराटीच्या दिवसातील तणावाशी संबंधित आहे. १८६९ मध्ये सावकारीमधील बडे प्रस्थ जे. गोल्ड आणि रेल्वे व्यावसायिक जेम्स फिस्क यांनी सोन्याच्या बाजाराला वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यानंतर पहिल्यांदा ब्लॅक फ्रायडे ही संज्ञा रूढ झाल्याचे काही इतिहासकार मानतात, ज्यामुळे शेवटी आर्थिक घबराट निर्माण झाली आणि बाजारही कोसळला होता. त्यानंतर ६० वर्षांनी, २९ ऑक्टोबर १९२९ रोजी, ब्लॅक मंगळवार म्हणून ओळखल्या जाणार्‍या शेअर बाजारातील आणखी एका क्रॅशने महामंदीची सुरुवात झाल्याने काळा किंवा ब्लॅक हा शब्द मंदी किंवा व्यावसायिक तणावासाठी वापरला गेल्याचे दिसते. म्हणजेच थँक्सगिव्हिंगनंतरच्या ब्लॅक फ्रायडेचा खरा अर्थ “आपत्ती किंवा दुर्दैव’ हे दर्शविण्यासाठी आहे. दुसऱ्या एका संदर्भानुसार १९५० च्या दशकात, कारखाना व्यवस्थापकांनी प्रथम थँक्सगिव्हिंग नंतरच्या शुक्रवारचा ब्लॅक फ्रायडे म्हणून उल्लेख करण्यास सुरुवात केली कारण त्यांच्या अनेक कामगारांनी आजारी असल्याचे खोटे सांगून थँक्सगिव्हिंग नंतरच्या शुक्रवारी सुट्टी घेतली, त्यामुळे त्यांची सुट्टी शनिवार व रविवार पर्यंत वाढली आणि आर्थिक नुकसान झाले. म्हणूनच कारखाना व्यवस्थापकांनी या दिवसाचा उल्लेख ब्लॅक फ्रायडे म्हणून केला असाही संदर्भ सापडतो.

High discounts at a store in Catalonia during Black Friday
विकिपीडिया

ब्लॅक फ्रायडे हा शब्द फिलाडेल्फिया पोलिसांकडून वापरला गेल्याचा दावाही केला जातो. ६० च्या दशकात, ब्लॅक फ्रायडेचा वापर फिलाडेल्फिया ट्रॅफिक पोलिसांद्वारे थँक्सगिव्हिंगच्या दिवसाचे वर्णन करण्यासाठी केला गेला असे मानले जाते, कारण थँक्सगिव्हिंग नंतर त्यांना वाढलेल्या रहदारीमुळे १२ तास शिफ्टमध्ये काम करावे लागले होते. ग्राहक त्यांच्या सुट्टीची खरेदी सुरू करण्यासाठी शहरात येत होते आणि त्याच वेळी या शहरातील लोकप्रिय खेळ वार्षिक आर्मी- नेव्ही फुटबॉल सामना होता. त्यामुळे त्रासलेल्या पोलिसांनी या शुक्रवारची तुलना काळ्या दिवसाशी केली. तेव्हापासून फिलाडेल्फियामधील खरेदीदार आणि व्यापार्‍यांमध्ये हा शब्द प्रचलित झाला आणि तेथून तो अमेरिकेत प्रसारित झाला असे मानले जाते.

अधिक वाचा: तुळशी विवाहामागच्या प्रथा- परंपरा काय आहेत?

ब्लॅक फ्रायडेची दंतकथा

१९८० च्या दशकात ब्लॅक फ्रायडेशी संबंधित एक दंतकथा अस्तित्त्वात आली. काळ्या आणि लाल रंगातील वाक्ये व्यावसायिक जगामध्ये नफा आणि तोटा वर्णन करण्यासाठी वापरली जातात, १९८० मध्ये नफा काळ्या शाईत लिहिला गेला तर वर्षभर तसेच होते अशी धारणा निर्माण झाली…

Interior of a Target store on Black Friday
विकिपीडिया

सुट्टीचा खरेदी हंगाम कधी असतो?

ब्लॅक फ्रायडे हा अनौपचारिक सुट्टीच्या मालिकेचा भाग आहे, या दिवसाला सुट्टीच्या हंगामाची सुरुवात मानली जाते. त्या दिवशी खरेदीच्या संधींवर लक्ष केंद्रित केले जाते . हा कालावधी ब्लॅक फ्रायडेपासून सुरू होतो, या दिवसाला किमान दोन शतकांचा इतिहास आहे. स्मॉल बिझनेस शनिवार (लहान व्यवसायिकांकडून खरेदी करण्याचा दिवस), सायबर सोमवार, अशा दिवसांची जोड ही या दिवसाला देण्यात आली आहे. गिव्हिंग मंगळवार म्हणून ओळखली जाणारी वार्षिक धर्मादाय मोहीम थँक्सगिव्हिंगनंतरच्या मंगळवारी येत असल्याने या खरेदीला विशेष महत्त्व देण्यात येते. Giving Tuesday हा एक वार्षिक कार्यक्रम आहे जो लोकांना धर्मादाय कार्य करण्यासाठी किंवा स्वयंसेवकांना देणगी देण्यास प्रोत्साहित वा प्रवृत्त करतो.

Story img Loader