Russia nuclear powered missile रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राचे नाव आहे बुरेवेस्टनिक. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वतः याची पुष्टी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे क्षेपणास्त्र आज अस्तित्वात असलेल्या किंवा भविष्यातील कोणत्याही संरक्षण प्रणालीवर मात करू शकते. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या दबावाने रशिया विचलित झालेला नाही, हे पश्चिमी राष्ट्रांना दर्शविण्याच्या उद्देशाने रविवारी ही घोषणा करण्यात आली. या चाचणीबरोबर मोठ्या प्रमाणावर अणु-दलांचा सरावदेखील करण्यात आला. रशिया आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढत असल्याचे चित्र आहे, अशातच ही चाचणी करण्यात आली आहे. काय आहे बुरेवेस्टनिक क्षेपणास्त्र? त्याची वैशिष्ट्ये काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

पुतिन यांनी बुरेवेस्टनिक क्षेपणास्त्राविषयी काय म्हटले?

  • वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना लष्करी गणवेशात असलेल्या पुतिन यांनी घोषित केले की, बुरेवेस्टनिकने प्रमुख चाचणीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. “हे एक अनोखे शस्त्र आहे, जे जगात इतर कोणाकडेही नाही,” असे ते म्हणाले.
  • ते पुढे म्हणाले की, या चाचणीमुळे महत्त्वाच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि पुढील चरणांमध्ये या प्रणालीचे वर्गीकरण कसे करायचे आणि त्याच्या तैनातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा कशा उभारायच्या हे निश्चित केले जाईल.
  • रशियाच्या सशस्त्र दलाचे चीफ ऑफ द जनरल स्टाफ जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांनी पुतिन यांना माहिती दिली की, या क्षेपणास्त्राने सुमारे १५ तास उड्डाण केले आणि सुमारे १४,००० किलोमीटर (८,७०० मैल) अंतर पार केले.
रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

गेरासिमोव्ह यांच्या मते, या प्रणालीने क्षेपणास्त्र-विरोधी (Anti-missile) आणि विमान-विरोधी (Anti-aircraft) आपली उच्च क्षमता यशस्वीरित्या प्रदर्शित केली आहे, तसेच याची रचना कोणत्याही क्षेपणास्त्र विरोधी संरक्षणाला निष्क्रिय करण्याकरिता केली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले. पुतिन म्हणाले की, रशियन तज्ज्ञांनी त्यांना एकदा सांगितले होते की असे शस्त्र तयार करणे कदाचित कधीही शक्य होणार नाही, परंतु अनेक वर्षांच्या विकास आणि चाचणीनंतर त्यांचे दावे चुकीचे ठरले आहेत. या क्षेपणास्त्रामुळे रशियाच्या शस्त्रागारात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.

बुरेवेस्टनिकची वैशिष्ट्ये काय?

बुरेवेस्टनिक क्षेपणास्त्राचे अधिकृत नाव ९ एम ७३० बुरेवेस्टनिक आहे. हे पारंपरिक इंधनाऐवजी अणुउर्जेवर चालणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. अनेक वर्षांपासून या क्षेपणास्त्राला विकसित केले जात आहे. याची घोषणा पुतिन यांनी मार्च २०१८ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिकरित्या केली होती. नाटो (Nato) याला एसएससी-एक्स-९ स्कायफॉल (SSC-X-9 Skyfall) म्हणून संबोधते. हे शस्त्र अणुउर्जेवर चालणारे आणि अण्वस्त्रांनी सुसज्ज आहे, त्यामुळे त्याला पारंपरिक क्रूझ क्षेपणास्त्रांपेक्षा वेगळ्या क्षमता मिळतात.

पारंपरिक इंधनावर अवलंबून असलेले क्षेपणास्त्र मर्यादित पल्ला गाठू शकतात, मात्र बुरेवेस्टनिक लहान अणु-रिॲक्टरने सुसज्ज आहे, त्यामुळे ते दीर्घ कालावधीसाठी – सैद्धांतिकरित्या अनेक दिवसांपर्यंत हवेत राहू शकते आणि इंधन न भरता आंतरखंडीय अंतर पार करू शकते. यूएस-आधारित ना-नफा संस्था न्यूक्लियर थ्रेट इनिशिएटिव्ह (एनआयटी) ने २०१९ च्या मूल्यांकनात स्पष्ट केले की, “हे क्षेपणास्त्र अनेक अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते, कमी उंचीवर जगभर फिरू शकते, भूभागातून (terrain) मार्ग काढू शकते आणि अनिश्चित ठिकाणी अण्वस्त्र सोडू शकते.”

रशियाने हे स्पष्ट केले की, बुरेवेस्टनिक अत्यंत कमी उंचीवर जमिनीपासून अंदाजे ५० ते १०० मीटर (१६४ ते ३२८ फूट) उड्डाण करू शकते, हे अंतर पारंपरिक क्रूझ क्षेपणास्त्रांपेक्षा खूपच कमी आहे. इतक्या कमी उंचीवर उड्डाण केल्याने क्षेपणास्त्राला भूभागाचा वापर करून रडारपासून वाचता येते. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज (आयआयएसएस) नुसार, या क्षेपणास्त्राचा सैद्धांतिक पल्ला २०,००० किलोमीटर (१२,४०० मैल) पर्यंत असू शकतो, ज्यामुळे हे क्षेपणास्त्र रशियन हद्दीतून पृथ्वीवरील कोणत्याही लक्ष्यावर हल्ला करू शकते.

रशिया बुरेवेस्टनिकचा वापर कसा करणार?

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन लष्करी तज्ज्ञ अलेक्सी लिओनकोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, प्रारंभिक अणु-हल्ल्यांच्या देवाणघेवाणीनंतर शत्रूचे उरलेले कमांड सेंटर्स, ऊर्जा सुविधा आणि औद्योगिक पायाभूत सुविधा नष्ट करणे ही बुरेवेस्टनिकची नियोजित भूमिका असेल. ते म्हणाले की, रशियाच्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी (ICBMs) प्रतिस्पर्ध्याच्या मुख्य संरक्षण प्रणाली नष्ट केल्यानंतर, बुरेवेस्टनिक उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी पाठवले जातील. ते म्हणाले की, ही क्षेपणास्त्रे आक्रमण करणाऱ्या देशांना पाषाण युगात (Stone Age) नेऊन सोडतील.

पाश्चात्य गुप्तचर स्रोत आणि संरक्षण विश्लेषकांनी २०१७ पासून याच्या अनेक अयशस्वी चाचण्यांची नोंद केली आहे. २०१९ मध्ये व्हाईट सीजवळ शस्त्र चाचणीदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली, ज्यात कमीतकमी पाच रशियन अणु-तज्ज्ञांचा मृत्यू झाला. स्फोटामुळे आसपासच्या परिसरात किरणोत्सर्ग पसरला, ज्यामुळे तात्पुरते स्थलांतरण करावे लागले. यूएस गुप्तचर संस्थांनी नंतर मूल्यांकन केले की, ही चाचणी बुरेवेस्टनिक कार्यक्रमाशी संबंधित होती. रशियाने या दाव्यांची पुष्टी केली नसली तरी पुतिन यांनी मृत्यू झालेल्या वैज्ञानिकांना शासकीय पुरस्कार प्रदान केले. पुतिन यांनी नंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली. २०२४ पर्यंत अमेरिकन संशोधकांनी क्षेपणास्त्राचे संभाव्य तैनाती स्थळ ओळखले.

चाचणीची वेळ महत्त्वाची का?

या क्षेपणास्त्राने त्याच्या अणु-रिॲक्टरद्वारे पूर्णपणे शक्तीवर चालणाऱ्या १५ तासांच्या उड्डाणादरम्यान १४,००० किलोमीटर अंतर कापल्याचे वृत्त आहे. पुतिन यांनी लष्करी कमांडर्सच्या बैठकीदरम्यान पाच दिवसांनंतर चाचणीच्या निकालांची घोषणा केली. अमेरिकेने युक्रेनला पुरवलेल्या काही लांब पल्ल्याच्या पाश्चात्य क्षेपणास्त्रांचा वापर करण्यावरील निर्बंध उठवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर ही घोषणा करण्यात आल्याने त्याची वेळ महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

रशियन तेल कंपन्यांवर अमेरिका नवीन निर्बंध लादत असल्याने दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. रशियाने याचे थेट आव्हान म्हणून वर्णन केले आहे. पुतिन यांचे विशेष दूत किरिल दिमित्रीव्ह यांनी त्यांच्या अलीकडील अमेरिका भेटीदरम्यान ट्रम्प प्रशासनाला चाचणीचे तपशील सांगितले. क्षेपणास्त्र चाचणी ही लष्करी प्रदर्शनाइतकीच एक राजकीय घोषणा मानली जात आहे. पुतिन यांचे लष्करी गणवेशात दिसणे आणि युद्धकालीन ऑपरेशन पोस्टवर त्यांची घोषणा ही परिस्थिती आणखी चिघळण्याचे संकेत असल्याचे दिसून येत आहे.