काही आठवडे जास्त थकवा आणि उर्जेचा अभाव तुम्हाला जाणवत आहे का? तर तुम्हाला क्रॉनिक फटिग सिंड्रोम (CFS) असू शकतो. याला मायल्जिक एन्सेफॅलोमायलिटिस (ME) असेही म्हणतात.
सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकणारा तीव्र थकवा याबाबत भारतात फारशी जागरूकता नाही. या सिंड्रोममुळे लहान, मोठ्या, वृद्ध कोणलाही त्रास होऊ शकतो. मात्र, महिलांमध्ये याचे निदान अधिक प्रमाणात होते.

क्रॉनिक फटिग सिंड्रोम म्हणजे काय?

क्रॉनिक फटिग सिंड्रोम म्हणजे दीर्घकाळापर्यंत तीव्र थकवा जाणवणे. हा एक अतिशय गुंतागुंतीचा आजार आहे. यामध्ये व्यक्तीला खूप जास्त थकवा जाणवतो आणि तो कमीतकमी सहा महिने कायम असतो. हा थकवा विश्रांतीनेही कमी होत नाही. या आजारात थकवा तर येतोच, पण प्रामुख्याने शारीरिक व्यायामानंतरचा थकवा, शारीरिक किंवा मानसिक आघात, स्नायू किंवा सांधेदुखी तसंच झोप न येणे अशी लक्षणे दिसतात.
डॉक्टरांच्या मते, या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये शारीरिक किंवा मानसिक हालचालींमुळे थकवा वाढतो. मात्र, हा थकवा विश्रांतीने दूर होत नाही. क्रॉनिक फटिग सिंड्रोम आजार ओळखणे कठीण आहे, त्यामुळे त्यावर काय उपचार करावेत याबाबत लोकांमध्ये जागरूकता नाही.

डॉक्टरांच्या मते, बहुतेक प्रकारच्या थकव्याची कारणे ओळखता येतात. मधुमेह, हृदयरोग, कर्करोग तसंच अगदी अँटीबायोटिक्ससारख्या औषधांचे दुष्परिणामही ओळखता येतात. महत्त्वाचे म्हणजे सीएफएसचे निदान करण्यासाठी कुठलीही चाचणी अस्तित्वात नाही. इतर आरोग्य समस्यांमध्ये विविध वैद्यकीय चाचण्या करून उपचार करता येतात. मात्र, सीएफएसमध्ये चाचण्यांअभावी डॉक्टरांना अनेकदा या आजाराचे वर्णन करणे कठीण जाते.

याचा परिणाम कोणावर होतो?

काही अभ्यासांनुसार, या अति थकव्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये दुप्पट ते चार पट असते. ज्या व्यक्तींमध्ये थायरॉईड, हृदयरोग किंवा मधुमेहाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत त्यांना याचा त्रास होतो. काही तज्ज्ञांच्या मते, विषाणूजन्य संसर्गही याला कारणीभूत असल्याचे दिसते. हिंदू वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, एपस्टाईन-बार विषाणू, सायटोमेगॅल व्हायरस, इतर हर्पिस ग्रुप इन्फेक्शन आणि कोविडसारखे विषाणू हे या आजाराचे ट्रिगर पॉइंट म्हणून काम करतात. असं असताना २५ ते ४५ वर्षे वयोगटातील महिलांना प्रभावित करणाऱ्या या अज्ञात स्थितीचे कारण अद्याप सापडलेले नाही. याचा परिणाम किशोरवयीन मुलांवरही होऊ शकतो असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.
रोग नियंत्रण केंद्राच्या अंदाजानुसार, आठ लाख ३६ हजार ते २.५ दशलक्ष अमेरिकन नागरिक सीएफएसमुळे ग्रस्त आहेत. शिवाय काहींचे निदान तर झालेलेच नाही. या अहवालानुसार, सीएफएसमुळे अमरिकेचा दरवर्षी ९ ते २५ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च कमी उत्पादकता आणि वैद्यकीय खर्चावर होतो. दुसरीकडे भारतातील या स्थितीची आकडेवारी मर्यादित आहे. मात्र, भारतातल्या सध्याच्या जीवनशैलीमुळे या आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

WHO काय सांगते?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, सीएफएस हा प्रामुख्याने एक न्यूरोलॉजिकल आजार मानला जातो, कारण यामध्ये मेंदूच्या कार्यात आणि मज्जासंस्थेमध्ये असामान्यता असते. विशेषतः ऊर्जा, वेदना सहनशीलता आणि मूडवर परिणाम करणाऱ्या न्यूरोकेमिकल्सच्या नियमनात विशिष्ट बदल जाणवतात.


भारतात याबाबत व्यापक जागरूकता नसल्यामुळे आणि मर्यादित समर्पित कार्यक्रम किंवा धोरणांमुळे, जीवनशैलीतील घटक, व्हिटॅमिन बी-१२ किंवा लोहसारख्या पौष्टिक कमतरता किंवा अगदी मानसिक समस्यांमुळे या आजाराचे निदान अनेकदा कमी होते किंवा चुकीचे होते. ही एक महत्त्वाची समस्या असूनही सीएसएफला अद्याप भारतात सार्वजनिक आरोग्य प्राधान्य नाही. जरी कोविड-१९ नंतर प्रामुख्याने शहरी भागात थोडीफार जागरूकता वाढली आहे.

या आजाराची लक्षणे काय आहेत?

या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना अगदी मूलभूत शारीरिक क्रिया करण्यासही त्रास होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, क्रॉनिक फटिग सिंड्रोममध्ये थकवा येणे हे सर्वात सामान्य लक्षण असते. जेव्हा एखादी व्यक्ती सीएफएसग्रस्त असते तेव्हा त्यांना खूप थकवा जाणवतो आणि थकवा येण्याची लक्षणे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहतात. या आजारात स्मरणशक्तीच्या समस्या आणि मेंदूला मिरगी, डोकेदुखी, घसा खवखवणे, मान आणि काखेत वाढलेले लिम्फ नोड्स आणि स्नायू, सांधेदुखी यांसारखी लक्षणेदेखील आहेत. झोपून किंवा बसून उठताना लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात आणि चक्करदेखील येते. फायब्रोमायल्जिया, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, नैराश्य आणि झोपेचे विकार यासारखे काही आजार सीएफएससोबतच असू शकतात.

सीएफएसमुळे झोपेचे विकार होऊ शकतात, जिथे एखाद्या व्यक्तीला सतत झोप येते किंवा झोप येत नाही आणि झोपल्यानंतर ताजेतवाने वाटत नाही. त्याला तीव्र आणि स्पष्ट स्वप्ने पडणे, अस्वस्थता, रात्रीच्या वेळी स्नायूंचा आकुंचन आणि स्लीप एपनिया (झोपेत श्वसनक्रिया बंद पडणे)चा अनुभव येऊ शकतो. या आजाराने ग्रस्त व्यक्तींना जठरांच्या समस्या, रात्री घाम येणे, स्नायू कमकुवत होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चिंता किंवा पॅनिक अटॅक आणि तापदेखील येऊ शकतो.

निदान आणि उपचार

सीएफएसचे निदान करण्यासाठी विशिष्ट चाचण्यांचा अभाव आहे, त्यामुळे रुग्णांना उपचार न घेता आणि वर्षानुवर्षे या त्रासासह जगावे लागत आहे. भारतात एका दशकात डॉक्टरांनी सीएफएसचे फक्त चार-पाच रुग्ण आढळल्याची माहिती आहे. डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सीएफएससाठी कोणताही विशिष्ट उपचार नाही. द फायनान्शियल एक्स्प्रेसच्या एका अहवालात म्हटले आहे की, सीएफएसचे निदान करण्यासाठी दीर्घकालीन थकव्याची लक्षणे महत्त्वाची आहेत, म्हणूनच मानसिक समुपदेशन, व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन डी युक्त पुरेशा पूरक आहारामुळे कधीकधी कमकुवतपणा दूर होण्यास आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते. चांगला, निरोगी आहार आणि नियमित शारीरिक व्यायाम, योग आणि ध्यान यामुळे रुग्णाला क्रॉनिक फटिग सिंड्रोममधून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. सीएफएसची कारणे अद्याप अज्ञात असल्याने तो रोखणे काहीसे अवघडच आहे.