पूर्व जेरुसलेममध्ये असलेले अल-अक्सा मशिदीचे ठिकाण हे एकेश्वरवादी असलेल्या ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. गेली तीन वर्षे सातत्याने इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाला इथे अधिक धार चढते आहे. निमित्त असतो तो रमझानचा पवित्र महिना आणि वाढलेले भाविक. यंदा हे संघर्षाचे सलग तिसरे वर्ष आहे. नेमके काय आहे या संघर्षाच्या मूलस्थानी?

आणखी वाचा : विश्लेषण: NASA वायूप्रदुषणाचे मोजमाप अंतराळातून कशासाठी?

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

यंदा पुन्हा संघर्ष
यंदा रमझानच्याच कालखंडात पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात झाली. ठिणगी पडली ती बुधवारी, ५ एप्रिल रोजी. इस्रायली पोलिसांनी त्या दिवशी अल-अक्सा परिसरात प्रवेश केला आणि त्याचे पडसाद पॅलेस्टाइनमध्ये आणि अरब व मुस्लीम राष्ट्रांमध्ये उमटले.

हा काही पहिलाच संघर्ष नव्हे…
गेल्या वर्षी – २०२२ साली – मार्च महिन्याच्या अखेरीस इस्रायली नागरिकांवर या परिसरात हल्ले झाले; त्यात काहींवर प्राणही गमावण्याची वेळ आली. त्यानंतर एप्रिल महिन्यात सलग दोनदा इस्रायली सैन्याने आक्रमक भूमिका घेत या परिसरात प्रवेश केला. २०२२ साली २२, २७ व २९ मार्च रोजी इस्रायली नागरिकांवर हमासकडून हल्ले करण्यात आले, त्यात काही इस्रायली नागरिकांचे प्राण गेले. त्यानंतर इस्रायली सैन्याने आक्रमक भूमिका घेतली. १५ एप्रिल २०२२ रोजी शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळेस रमझानमुळे गर्दी झाली, त्या वेळेस संघर्ष उसळला. प्रार्थनेस आलेल्यांनी मुस्लीम धर्मीयांनी इस्रायली सैन्यावर दगडफेक करत हल्ला चढवला, असा आरोप इस्रायल सरकारतर्फे करण्यात आला होता.

आणखी वाचा : विश्लेषण : बिबळ्या खरोखरच जंगलात राहतो? नव्या संशोधनातून समोर आली आश्चर्यकारक माहिती!

२०२१ मध्ये मोठा संघर्ष
अल-अक्सा मशिदीच्या परिसरात प्रार्थनेसाठी येणाऱ्यांच्या संख्येवर २०२१ साली इस्रायलने निर्बंध घातले, तिथून पुन्हा एकदा या संघर्षाला सुरुवात झाली. २०२१ साली हमास व इस्रायल यांच्यात तब्बल ११ दिवस युद्ध सुरू होते. त्यानंतर शांतता करार झाला व युद्ध थांबले.

कुठे आहे अल-अक्सा मशीद?
इस्रायलची राजधानी असलेल्या जेरुसलेम जुन्या शहरामध्ये असलेल्या एका टेकडीवर अल-अक्सा मशीद आहे. ज्यू धर्मीय त्याला हर हा-बईत किंवा टेम्पल माऊंट म्हणून ओळखतात. तर मुस्लीम जगतात हा परिसर अल्-हराम अल-शरीफ या नावाने प्रसिद्ध आहे. हा परिसर इंग्रजीमध्ये ‘नोबेल सँक्च्युअरी’ म्हणूनही ओळखला जातो.

आणखी वाचा : विश्लेषण : २० हजार वर्षांपूर्वीच्या गुहाचित्रांमधील ठिपक्यांचा अर्थ कसा उलगडला?

मुस्लीम समाजासाठी महत्त्वाचे धर्मस्थळ
मुस्लीम समाजासाठी हा परिसर मक्का आणि मदिनानंतरचे तिसरे महत्त्वाचे धर्मस्थळ म्हणून ओळखला जातो. इथे डोम ऑफ द रॉक आणि अल-अक्सा मशीद अशी मुस्लीम समाजाची दोन धर्मस्थळे आहेत. अल-अक्सा मशीद क्विब्ली मशीद म्हणूनही ओळखली जाते. तिची निर्मिती आठव्या शतकात करण्यात आली. इस्लामी धर्मग्रंथानुसार मक्केहून निघालेले प्रेषित मोहम्मद यांनी त्यांचा रात्रीचा प्रवास इथेच पूर्ण केला आणि इथेच असलेल्या डोम ऑफ द रॉक येथून त्यांनी स्वर्गाच्या दिशेने प्रयाण केले. त्यामुळेच मक्का-मदिनानंतर अल-अक्सा मशिदीचा परिसर हा मुस्लीम धर्मीयांसाठी तिसऱ्या क्रमांकाचे प्रसिद्ध व लोकप्रिय श्रद्धास्थान ठरले आहे.

ज्यू धर्मीयांसाठीही महत्त्वाचे
इथला टेम्पल माऊंट हा परिसर जगभरातील ज्यू धर्मीयांसाठी सर्वाधिक पवित्र असे धर्मस्थळ आहे. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी सॉलोमन राजाने इथे पहिले धर्मस्थळ उभारले, अशी ज्यू धर्मीयांची श्रद्धा आहे. इथले दुसरे धर्मस्थळ रोमनांनी इसवी सन ७० मध्ये उद्ध्वस्त केले. इसवी सनपूर्व कालखंडामध्ये ज्यू धर्मीयांसाठी परमश्रद्धेय असलेल्या अब्राहमने त्याचा मुलगा आयझॅक याला देवाला अर्पण करण्याची तयारी केली. अखेरीस देवानेच त्याला तसे करण्यापासून रोखले; ते हेच ठिकाण अशी ज्यू धर्मीयांची श्रद्धा आहे.

ख्रिश्चन धर्मीयांचा काय संबंध?

येशू ख्रिस्ताला ज्या ठिकाणी सुळावर चढविण्यात आले ते ठिकाण हेच असल्याची ख्रिश्चन धर्मीयांची श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीही हे ठिकाण परमश्रद्धेय असेच आहे.

या ठिकाणाच्या व्यवस्थापनाचे अधिकार कुणाकडे?
येथील ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मस्थळांच्या व्यवस्थापनाचे अधिकार जॉर्डनच्या हाशिमाइट या राजघराण्याकडे आहेत. त्यासाठी त्यांनी वक्फ संस्था स्थापन केली असून तीमार्फत सारे काम पाहिले जाते.

इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाची पार्श्वभूमी

पहिल्या महायुद्धामध्ये ओटोमन साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर पॅलेस्टाइन वसाहत ब्रिटिशांच्या ताब्यात आली. संयुक्त राष्ट्रांनी इस्रायल व पॅलेस्टाइन फाळणीचा प्रस्ताव मान्य करत २९ नोव्हेंबर १९४७ रोजी जेरुसलेमला आंतरराष्ट्रीय शहराची मान्यता दिली. ज्यू धर्मीयांनी १४ मे १९४८ रोजी इस्रायल हा स्वतंत्र देश जाहीर केला. त्यानंतर पहिले इस्रायल-अरब युद्ध १९४८ साली झाले. पश्चिम जेरुसलेमसह अतिरिक्त २३ टक्के भाग त्या वेळेस इस्रायलने काबीज केला. इस्रायलने १९६७ साली पूर्व जेरुसलेम आणि पश्चिम किनारपट्टीचा (वेस्ट बँक) परिसर जॉर्डनकडून, तर गाझा आणि सिनाई पट्टा इजिप्त आणि गोलन टेकड्यांचा परिसर सीरियाकडून ताब्यात घेतला. याच पूर्व जेरुसलेममध्ये अल-अक्सा मशिदीचा परिसर येतो.

जेरुसलेमवरून ठिणगी
इजिप्तसोबत १९७८ साली झालेल्या शांतता करारामध्ये इस्रायलने पॅलेस्टाइनच्या भागातील निर्णय घेण्यासाठी ‘स्वतंत्र प्राधिकार सरकार’ स्थापण्यास मान्यता दिली. मात्र दोनच वर्षांत म्हणजे १९८० साली इस्रायलने जेरुसलेम हे राजधानीचे ठिकाण म्हणून जाहीर केले, इथेच संघर्षाची महत्त्वाची ठिणगी पडली. कारण जेरुसलेम हेच भविष्यातील पॅलेस्टाइन राष्ट्राचे राजधानीचे ठिकाण असेल, असे समस्त पॅलेस्टाइन नागरिकांना वाटत होते.अल-अक्सा मशीद परिसरातील संघर्षाचे मूळ अशा प्रकारे या इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षामध्ये आहे. रमझानच्या पवित्र महिन्यात इथे प्रार्थनेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंनी वाढते. तेवढे निमित्त या संघर्षास पुन्हा धार चढण्यासाठी पुरेसे असते.