भारतीय शेअर बाजार हा अधिकाधिक पारदर्शक व्हावा यासाठी भारतीय भांडवली बाजार नियामक म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सतत प्रयत्नशील असतो. सध्या भांडवली बाजारातील व्यवहाराची गती वाढावी यासाठी सेबी लवकरच मोठा निर्णय घेणर आहे. या निर्णयांतर्गत हिशेबपूर्तीची (सेटलमेंट) गती वाढावी यासाठी वन आवर ट्रेड सेटलमेंट ( One-Hour Trade Settlement) व्यवस्थेची अंमलबजावणी केली जाणार आहे. आगामी वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत या व्यवस्थेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा सेबीचा प्रयत्न असणार आहे. याच पार्श्वभूमीवर वन आवर ट्रेड सेटलमेंट काय आहे? भांडवली बाजारात भागधारकांच्या हिशोबपूर्तीसाठी सध्या कोणती व्यवस्था अस्तित्त्वात आहे? हे जाणून घेऊ या….
हिशेबपूर्ती (सेटलमेंट) म्हणजे काय?
हिशेबपूर्ती ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये रक्कम आणि समभागाचे वितरण होते. एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे समभाग खरेदी केल्यानंतर ते समभाग संबंधित व्यक्तीच्या डीमॅट खात्यात जाणे तसेच एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे समभाग विकल्यानंतर त्याच्या खात्यात पैसे जमा होणे याला सेटलमेंट म्हणजेच हिशेबपूर्ती म्हणतात.
सध्याची टी+१ पद्धत काय आहे?
सध्या भांडवली बाजारात हिशेबपूर्तीसाठी टी+१ पद्धत अस्तित्वात आहे. या प्रद्धतीअंतर्गत एका दिवसामध्ये हिशेबपूर्ती होते. या वर्षाच्या जानेवारी महिन्यात ही टी+१ सुरू झाली. जगात चीननंतर टी+१ पद्धत स्वीकारणारा भारत हा दुसरा देश ठरलेला आहे. भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे व्यवहार जलद गतीने, अचूक, कार्यक्षम व्हावेत यासाठी ही कार्यप्रणाली स्वीकाण्यात आलेली आहे.
सेबीचे म्हणणे काय आहे?
या वर्षाच्या जुलै महिन्यात सेबीने आम्ही रियल टाईम सेटलमेंटववर (तत्काळ हिशोबपूर्ती) काम करत आहोत, असे सांगितले होते. मात्र त्याआधी आता सेबी ‘वन आवर ट्रेड सेटलमेंट’ प्रणाली लागू करणार आहे. सेबी पुढील वर्षाच्या मार्च महिन्यात ही प्रणाली प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी तशी माहिती दिली. “तत्काळ हिशेबपूर्तीसाठी (सेटलमेंट) सध्या वन आवर ट्रेट सेटलमेंट ही अधिक गतिमान व्यवस्था आहे, असे आम्हाला वाटते. तत्काळ (Instantaneous) हिशेबपूर्ती प्रणालीसाठी सध्या बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे त्याआधी आम्ही एका तासाच्या आत हिशेबपूर्ती (सेटलमेंट) होईल अशी कार्यप्रणाली लागू करणार आहोत,” असे बुच यांनी सांगितले. एका तासाच्या आत व्यवहारपूर्ती करण्यासाठीचे तंत्रज्ञान सध्या आपल्याकडे आहे. मात्र तत्काळ व्यवहारपूर्ती प्रणालीसाठी आणखी अद्ययावत तंत्रज्ञान हवे आहे. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानासाठी आणखी वेळ आहे. २०२४ सालाच्या शेवटपर्यंत तत्काळ व्यवहारपूर्तीसाठीचे तंत्रज्ञान येऊ शकते.
वन आवर ट्रेड सेटलमेंट म्हणजे काय?
सध्या अस्तित्वात असलेल्या टी+१ प्रणालीअंतर्गत एखाद्या व्यक्तीने भांडवली बाजारात समभागांची विक्री केल्यास साधारण एका दिवसानंतर त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होतात. म्हणजेच व्यवहार होण्यास एक दिवस लागतो. मात्र वन आवर ट्रेड सेटलमेंट प्रणालीमध्ये एखाद्या व्यक्तीने समभाग विकल्यास त्याच्या खात्यात एका तासाने पैसे जमा होतील. तसेच समभाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला आपल्या डीमॅट खात्यात त्याने खरेदी केलेले समभाग एका तासाच्या आत दिसतील.