scorecardresearch

विश्लेषण : खड्डे खोदून विनाकारण होणारे नुकसान टळणार; जाणून घ्या, ‘Call Before u Dig’ ॲपची वैशिष्टे

विकासकामांसाठी खोदण्यात येणारे खड्डे, इतर कारणांसाठीचे उत्खनन आणि संबंधित यंत्रणेशी असलेला समन्वयाचा अभाव यामुळे दरवर्षी सरकारचे तीन हजार कोटीं रुपयांचे नुकसान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँच केलेले नवे मोबाईल ॲप हे नुकसान टाळू शकेल?

Call Before u Dig app launch
रस्ते खोदल्यामुळे जमिनीखाली असलेल्या केबल, पाईपलाईनचे नुकसान होते. (Photo – IndianExpress)

मुंबईत सध्या सर्वत्र खोदकाम केलेले दिसत आहे. मेट्रो, काँक्रिट रस्ते यासाठी ठिकठिकाणी रस्ते उखडलेले दिसतात. अनकेदा नव्या रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर पुन्हा काही ना काही कामासाठी तिथे खोदकाम केले जाते. सततचे खोदकाम आणि त्याखाली असलेल्या केबल, पाईपलाईनला क्षती पोहोचून देशाचे प्रत्येक वर्षी तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील कार्यक्रमात काल (दि. २२ मार्च) ‘Call Before u Dig’ (CBuD) या मोबाईल ॲपचे अनावरण केले. या ॲपमुळे रस्ते खोदत असताना त्याठिकाणीच्या जमिनीखाली असणाऱ्या विजेच्या केबल, दूरसंचार विभागाच्या फायबर केबल किंवा पाणी आणि गॅसची पाईपलाईन असल्यास त्याची माहिती रस्ते खोदणाऱ्या यंत्रणेला दिली जाईल. त्यामुळे रस्ते खोदताना या केबल आणि पाईपलाईनचे नुकसान टाळता येणार आहे.

या ॲपची गरज का भासली?

केंद्रीय दूरसंचार विभागाच्या पुढाकारातून कॉल बिफोर यू डीग ‘Call Before u Dig’ (CBuD) या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. सरकारच्या विविध यंत्रणेतील समन्वयाचा अभाव आणि कमजोर नियोजनामुळे जमिनीखालील पाईपलाईन, केबल यांचे होणारे नुकसान टाळणे, हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे. पीआयबी या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार दरवर्षी अशाप्रकारच्या खोदकामामुळे सरकारचे तीन हजार कोटींचे नुकसान होते. या ॲपमुळे सरकारचे नुकसान तर कमी होईलच, त्याशिवाय टेलिकॉम केबल्स, पाणी आणि गॅसची पाईपलाईन, विजेच्या केबल्स यांच्या नुकसानामुळे त्या भागातील नागरिकांना आणि स्थानिक व्यापाराला जो नाहक त्रास होतो, तो देखील टाळता येणार आहे.

ॲप कसे काम करते?

खोदकाम करणारी यंत्रणा आणि जमिनीखाली असलेल्या केबल किंवा पाईपलाईनची मालकी असलेल्या यंत्रणे मधील दुवा म्हणून CBuD ॲप काम करेल. ज्याठिकाणचा रस्ता खोदायचा आहे, त्या रस्त्याखालून कोणत्या यंत्रणेची किंवा कंपनीची केबल, पाईपलाईन गेली आहे, याची माहिती या ॲपवर मिळेल. त्या कंपनीशी संपर्क साधण्यासाठी फोन क्रमांक आणि ईमेल दिलेले असून क्लिक टू कॉलचा पर्याय दिलेला आहे. खोदकाम करणाऱ्या यंत्रणेला अनेकदा जमिनीखाली असलेल्या केबल, पाईपलाईनची माहिती नसते. ही माहिती मिळण्याचे आणि संबंधित यंत्रणेशी बोलून त्याबद्दल खबरदारी घेण्याचे महत्त्वाचे काम या ॲपद्वारे होईल.

क्लिक टू कॉलचा पर्यायामुळे दोन्ही यंत्रणांना समन्वय साधून खोदकाम करण्याआधी खबरदारी घेता येणे शक्य होईल.

पंतप्रधान मोदी यांनी ६जी व्हिजन डॉक्युमेंटचे केले अनावरण

CBuD ॲपसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवन येथे भारत ६जी व्हिजन डॉक्यूमेंट आणि ६जी टेस्टबेडचे अनावरण करण्यात आले. तसेच नव्या आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) प्रादेशिक कार्यालय आणि इनोव्हेशन केंद्राचे उदघाटनही झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ५जी सूरू होऊन सहा महिने झाल्यानंतर आपण आता ६जी तंत्रज्ञानाची चर्चा करत आहोत. टेस्टबेडच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाची चाचणी केली जाते. ६जी व्हिजन डॉक्युमेंट आणि ६जी टेस्टबेडमुळे नवे शोध घेणे, तसेच नव्या तंत्रज्ञानाची उभारणी आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी एक मंच तायर होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 10:56 IST

संबंधित बातम्या