ज्ञानेश भुरे
‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र असलेल्या फ्रान्सच्या फुटबॉल महासंघाने मुस्लीम धर्मीयांसाठी पवित्र अशा रमजानच्या महिन्यात राष्ट्रीय संघातील खेळाडूंवर मर्यादा आणल्या आहेत. त्यांना एकार्थी उपवास करण्यास मनाईच करण्यात आली आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. फ्रान्सच्या घटनेनुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत फ्रान्स फुटबॉल महासंघ आपल्या निर्णयावर ठाम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फुटबॉल महासंघाचा निर्णय काय?

रमजानच्या महिन्यात मुस्लीम धर्मीय पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कठोर उपवास पाळतात. ते पाणी किंवा अन्नाचे सवेन करत नाहीत. मात्र, फ्रान्स फुटबॉल महासंघाने आपल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना रमजान पाळण्यास मर्यादा घातल्या आहेत. वरिष्ठ आणि युवा संघातील खेळाडूंना रमजानच्या (११ मार्च ते १० एप्रिल) कालावधीत कोणतीही विशेष सवलत दिली जात नाही. त्यांच्यासाठी सांघिक बैठक, सामूहिक जेवण, प्रशिक्षणाची वेळ यात बदल केला जाणार नाही. या कालावधीत शिबिरात दाखल एकाही मुस्लीम खेळाडूस रमजान पाळता येणार नाही, असे फ्रान्स फुटबॉल महासंघाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

खेळाडूंमध्ये पडसाद कसे?

फ्रान्स फुटबॉल महासंघाच्या निर्णयावर अर्थातच खेळाडू नाराज आहेत. पण, खेळाडूंनी विरोधही केला नाही. वाद नको म्हणून हे खेळाडू गप्प आहेत. फ्रान्सच्या १९ वर्षांखालील संघातील युवा मध्यरक्षक महामाडौ दियावाराने वादात न पडता संघातून बाहेर पडणे पसंत केले. खेळाडू बोलून दाखवत नसले, तरी फ्रान्समध्ये आपल्या धर्माचा आणि आपला आदर केला जात नाही अशी भावना खेळाडूंमध्ये निर्माण होऊ लागली आहे.

फ्रान्स फुटबॉल महासंघाची भूमिका काय?

निर्णयावरून होणाऱ्या टीकेकडे फ्रान्स फुटबॉल महासंघाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. या निर्णयाने कुणाला दुखवायचा आमचा उद्देश नाही. आम्हाला प्रत्येकाबद्दल आदर आहे. मात्र, जेव्हा फ्रान्समध्ये राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या कायदा आणि चौकटीचा सन्मान करायलाच हवा असे मत मांडून महासंघाने आपल्या निर्णयाची एकप्रकारे पाठराखण केली आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?

अन्य देशांमध्ये काय नियम?

फ्रान्स फुटबॉल महासंघाने हा निर्णय घेताना महासंघाच्या घटनेतील अनुच्छेद १ चा संदर्भ दिला आहे. यानुसार राजकीय, वैचारिक, धार्मिक स्वरूपाच्या कुठल्याही कृतीला मैदानावर स्थान नाही. याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाते. खेळाचे मैदान हे तटस्थतेचे ठिकाण असून, तेथे समानता, बंधुता आणि निःपक्षपातीपणा, स्वतःबद्दल आणि पंचांबद्दल आदर करणे आवश्यक आहे. त्यामुळेच रमजानच्या महिन्यात एखादा सामना किंवा सराव सुरू असताना उपवास सोडण्याच्या वेळेस पंचांना खेळ किंवा प्रशिक्षकांना सराव थांबविण्यासही निर्बंध आहेत. मात्र, जर्मनीतील बुंडेसलिगा, इंग्लंडमधील प्रीमियर लीग, नेदरलँड्समधील ‘डच एरेडिव्हिसी’ या स्पर्धांमध्ये रमजानच्या कालावधीत सुरू असलेल्या एखाद्या सामन्यात मुस्लीम खेळाडू असेल, तर त्याला किंवा तिला उपवास सोडण्याच्या काळात सामन्यात जलपानाची मुभा आहे.

फ्रान्समध्ये मुस्लीमविरोध वाढीस?

धर्माच्या मुद्द्यावरून वाद ओढवून घेण्याची फ्रान्स फुटबॉल महासंघाची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी हिजाब परिधान केलेल्या महिला खेळाडूंवर बंदी घातली होती. विशेष म्हणजे न्यायालयाने फ्रान्स फुटबॉल महासंघाच्या निर्णयास मान्यता देताना स्पर्धेदरम्यान पोशाखांच्या तटस्थतेचे बंधन योग्य आहे, असे म्हटले होते. यामुळे सहाजिकच फ्रान्सवर मुस्लीमविरोधी टीका होऊ लागली आहे.

क्रीडा जगतात काय पडसाद उमटले?

एकूणच क्रीडा जगतात फ्रान्सच्या या निर्णयाचा निषेध केला जात आहे. रमजान आणि हिजाब संदर्भातील निर्णय मागे घेतले जात नाहीत तोवर मुस्लीम खेळाडूंनी फ्रान्ससाठी खेळू नये, असे मत व्यक्त केले जात आहे. अनेक स्थलांतरित असलेल्या फ्रान्सला परदेशी खेळाडूंशिवाय एक चांगला राष्ट्रीय संघ उभा करता येऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर तरी फ्रान्स महासंघ आपला मार्ग बदलेल असे मानले जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the controversy over the ban fast in ramadan on footballers in france print exp amy
First published on: 05-04-2024 at 07:10 IST