राखी चव्हाण
नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या २० चित्त्यांपैकी तीन प्रौढ चित्त्यांचा व भारतात जन्मलेल्या चित्त्यांच्या चार बछड्यांपैकी तीन बछड्यांचा अवघ्या दोन महिन्यात मृत्यू झाल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले. कुनोतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी नामिबियात पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्याआधीसुद्धा अधिकाऱ्यांना प्रशिक्षणसाठी नामिबियात पाठवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.




शास्त्रज्ञांच्या मते चित्ता प्रकल्पात कोणत्या त्रुटी राहिल्या?
कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांसाठी राखीव क्षेत्रात क्षमतेपेक्षा अधिक चित्ते ठेवणे हे चिंताजनक असल्याचे जर्मनीतील बर्लिन येथील लाईबनिझ इन्स्टिट्यूट फॉर झू अँड वाईल्डलाईफ रिसर्चच्या तीन शास्त्रज्ञांनी सांगितले होते. कुंपण नसलेल्या भागात आफ्रिकन चित्त्यांनी इतकी मोठी संख्या पाहण्यात आलेली नाही. कुंपण नसलेल्या प्रदेशात चित्ते प्रति शंभर चौरस किलोमीटरवर एक अशा घनतेने राहतात. तर कुनोत प्रति शंभर चौरस किलोमीटरवर तीन चित्ते आहेत. प्रौढ नर चित्ता २०-२३ किलोमीटर अंतरावर असलेले क्षेत्र तयार करतात. नामिबियातील तीन नर चित्ते नि:संशयपणे संपूर्ण राष्ट्रीय उद्यानाचा ताबा घेतील. अशा वेळी दक्षिण आफ्रिकेतील अधिक नरांसाठी जागा राहणार नाही, अशीही भीती या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.
चित्ता पुनर्वसन योजनेची चिंता का वाढली?
कुनो राष्ट्रीय उद्यानात आधी मोठ्या चित्त्यांचा मृत्यू आणि आता चित्त्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याने चित्ता पुनर्वसन योजनेवर प्रश्नचिन्ह उभे झाले. अतिउष्णता, थकवा आणि उपासमार ही मृत्यूची कारणे म्हणून ओळखली गेली आहेत. इतर मोठ्या मार्जारांच्या तुलनेत, जंगलात चित्ताच्या बछड्यांचा मृत्यू दर जास्त असतो. चित्त्यांना लागणाऱ्या शिकारीची कमतरता हेदेखील चित्त्यांच्या मृत्यूचे कारण आहे.
याआधी पाठवलेल्या प्रशिक्षणाचे काय?
भारतातील चित्ता प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वी कुनोतील वनखात्याच्या अधिकाऱ्यांना नामिबिया येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. या प्रशिक्षण सत्रांमध्ये चित्त्यांना पकडण्याच्या पद्धती, चित्त्यांसाठी सापळे लावणे, चित्त्याचा संपूर्ण गट पकडणे, चित्ता पकडल्यानंतर त्यांना हाताळणे, मानवी सुरक्षा, ट्रँक्विलायझिंग बंदुकीच्या माध्यमातून त्यांना बेशुद्ध करणे, बेशुद्धीकरणाची प्रक्रिया, त्या बंदुकीत बेशुद्धीकरणासाठी टाकण्यात येणारे औषध, त्याचे प्रमाण, बेशुद्धीकरणानंतर त्यांचे व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण या अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा या अधिकाऱ्यांना नामिबियात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येत असेल तर आधीच्या प्रशिक्षणाचे काय, असा प्रश्न निर्माण होतो.
प्रकल्पातील अनुभवी शास्त्रज्ञांना डावलणे प्रकल्पाच्या मुळावर?
चित्ता प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हाच या प्रकल्पासाठी भारतीय वन्यजीव संस्थेतील माजी तज्ज्ञ शास्त्रज्ञ डॉ. यजुवेंद्रदेव झाला यांची निवड करण्यात आली. प्रकल्पाच्या आखणीपासून तो पूर्णत्वास नेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. प्रकल्प पूर्णत्वास जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी चित्त्यांच्या निवडीवर, अधिवास क्षेत्राच्या कमतरतेवर, कुनोत इतक्या मोठ्या संख्येत चित्ते सोडण्यावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, मध्य प्रदेशला चित्ता राज्य बनवताना राज्य आणि केंद्र सरकारला या शास्त्रज्ञांनी दाखवलेल्या त्रुटी पटल्या नाहीत. हे शास्त्रज्ञ या प्रकल्पाच्या आड येत असल्याचा समज करून घेत त्यांनाच जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. डॉ. यजुवेंद्रदेव झाला यांनी दाखवलेल्या त्रुटी आज प्रत्यक्षात उतरत आहेत. त्यांचे म्हणणे ऐकले असले तर कदाचित हा प्रकल्प योग्य दिशेने मार्गी लागला असता अशीही आता चर्चा आहे.
कुनोतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ताण आहे का?
कुनोत चित्ता प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर ग्वाल्हेर वन्यजीव विभागाची जबाबदारी आहे, याशिवाय माधव राष्ट्रीय उद्यानाचा कारभारदेखील त्यांच्याकडे आहे. ज्या अधिकाऱ्यांवर इतकी कामे सोपवण्यात आली, तो अधिकारीच जर १८० किलोमीटर दूर असेल तर चित्त्यांचा बंदोबस्त कसा होणार. प्रभारी कर्मचारी हा भार पेलवू शकत नाही आणि या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ताण आहे. यातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना नामिबियात प्रशिक्षणासाठी पाठवले होते, पण ते अपेक्षित कामगिरी पार पाडू शकत नसतील तर हे प्रकल्पाचे अपयश आहे.
वन्यजीव तज्ज्ञांनी काय इशारा दिला होता?
भारतातील चित्ते आशियाई होते. आता इराणमध्ये फक्त १२ आशियाई चित्ते उरले आहेत. त्यामुळे भारताला आफ्रिकन चित्ते आणावे लागले. भारतीय माळरानांमध्ये आफ्रिकन चित्ता ही परदेशी प्रजाती आणणे चुकीचे आहे. हे चित्ते येथे तग धरणार नाहीत, असे वन्यजीवतज्ज्ञ केंद्र सरकारला सांगत होते. तरीही चित्ता प्रकल्प प्रत्यक्षात आणला गेला.
rakhi.chavhan@expressindia.com