आपल्या हक्कांकरिता लढण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी नोव्हाक जोकोविचने पुढाकार घेऊन व्यावसायिक टेनिसपटू संघटनेची (पीटीपीए) स्थापना केली. या संघटनेने खेळाडूंच्या मानधनातील समानता, स्पर्धांचे वेळापत्रक, वैयक्तिक करारातील जाचक अटी अशा विविध मागण्यांसाठी टेनिस स्पर्धा आयोजित करणाऱ्या संस्थांना न्यायालयात खेचले आहे. खेळाडूंची नेमकी भूमिका काय आणि यातून काय साधले जाणार, याचा आढावा.

‘पीटीपीए’ नेमके काय आहे?

व्यावसायिक टेनिसपटू संघटना (पीटीपीए) ही विक्रमी २४ ग्रॅंडस्लॅम विजेत्या जोकोविच आणि टेनिसपटू वासेक पॉस्पिसिल यांची कल्पना. खेळाच्या सामूहिक नव्हे, तर केवळ वैयक्तिक प्रश्नांवर खेळाडूंची भूमिका मांडणे या उद्देशाने या संघटनेची स्थापन झाली. आतापर्यंत संघटनेशी अडीचशेहून अधिक टेनिसपटू जोडले गेले आहेत.

स्पर्धा आयोजकांवरच खटले का?

‘डब्ल्यूटीए, एटीपी, आयटीएफ असे स्पर्धा संचालक आणि भ्रष्टाचार विरोधी प्रयत्नांवर देखरेख ठेवणारे संचालक या आता संस्था राहिल्या नसून, त्यांनी टेनिसची कारखानदारी सुरू केली आहे. टेनिसपटूंना राबविण्याकडे त्यांचा कल आहे,’ असा आरोप ‘पीटीपीए’ने केला आहे. खेळाडूंच्या समस्या गांभीर्याने घेण्यासाठी आणि टेनिसमध्ये संतुलन, समानता आणि निष्पक्षता आणण्याच्या उद्देशावर ‘पीटीपीए’चा भर आहे. खेळाडूंना उत्पन्नाचा कमी वाटा देणे, प्रत्येक स्पर्धेतून मिळणारी पारितोषिक रक्कम मर्यादित राखणे, वैयक्तिक करारासंदर्भात जाचक अटी घालणे, विविध स्पर्धा सहभागांपासून रोखणे आणि अतिव्यग्र कार्यक्रम तयार करणे, प्रत्येकी १२ दिवस चालणाऱ्या स्पर्धांची वाढलेली संख्या, अनेक स्पर्धांमधून रात्री उशिरापर्यंत खेळावे लागणे, खेळाडूंच्या सहभागावर मर्यादित असलेली मानांकन पद्धती या सगळ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा ‘पीटीपीए’चा आरोप आहे.

ग्रँडस्लॅम स्पर्धांनाही लक्ष्य?

‘पीटीपीए’ने या प्रकरणात चार ग्रँडस्लॅम स्पर्धा संचालकांना सह-आरोपी म्हटले आहे. या चारही स्पर्धांतून अब्जावधी डॉलरचे उत्पादन मिळते. मात्र, यातील खेळाडूंचा वाटा फक्त १० ते २० टक्केच असतो. तसेच या स्पर्धांचे वेळापत्रक हे पूर्णपणे एकतर्फी असते. उत्तेजक विरोधी कायद्यात ते ठामपणा आणू शकत नाहीत, असे ‘पीटीपीए’चे म्हणणे आहे.

खेळाडूंवर विविध बंधने…

खेळण्याच्या आणि वार्षिक मालिकांच्या पलीकडे जाऊन खेळाडू कमाई करण्याच्या संधी शोधत असतात, तेव्हा खेळाडूंवर जाचक अटी लादून या संधी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे मालिकेच्या बाहेरील स्पर्धेत खेळण्यास खेळाडूंवर बंधने आहेत. त्याचबरोबर प्रदर्शनीय सामन्यांत सहभागी होणे किंवा रॅकेट, बॅग आणि पोशाखासाठी टेनिस चालविणाऱ्या संस्थांनी सुचवलेल्या मर्यादित कंपन्यांशी प्रायोजकत्व करार करणे, प्रायोजक कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा लोगो क्रीडा साहित्यांवर वापरण्यास बंधने घालणे यांसारख्या जाचक अटी ‘पीटीपीए’ला मान्य नाहीत.

वेळापत्रकाची काय अडचण?

एटीपी, डब्ल्यूटीए यांच्या वार्षिक मालिकांमध्ये ५० हून अधिक स्पर्धा होतात. त्याच वेळी दुसऱ्या क्रमांकाच्या चॅलेंजर आणि आयटीएफ स्तरावरही मोठ्या संख्येने स्पर्धा होत असतात. त्यामुळेच वर्षभर खेळाडू खेळण्यातच व्यग्र राहतो. अव्वल खेळाडूंना अनिवार्य कार्यक्रमांसाठी उपस्थित राहावे लागते, तर कमी क्रमांकाच्या खेळाडूंना उपजीविका चालवण्यासाठी कुठे ना कुठे खेळावे लागते. त्यामुळे सहाजिकच खेळाडू आवश्यक विश्रांतीपासून दूर राहतो. यासाठी वेळापत्रकाचे अचूक व्यवस्थापन होण्याची खेळाडूंची मागणी आहे.

खेळाडूंच्या मूलभूत हक्कांचा संबंध कसा?

सततच्या खेळामुळे अनेकदा खेळाडूंना चौकटीबाहेर जाऊन एखाद्या स्पर्धेतून माघारीचा निर्णय घ्यावा लागतो. मात्र, या माघारीच्या संख्येवरही आणलेल्या मर्यादा ‘पीटीपीए’ला मान्य नाही. हंगामातून दोन वेळाच खेळाडूंना स्पर्धेतून माघार घेता येते. यापेक्षा अधिक वेळा माघार घेतल्यास खेळाडूस दंड केला जातो. त्याच वेळी खेळाडूंच्या मानांकनाच्या गुणांकन पद्धतीलाही ‘पीटीपीए’ने विरोध केला आहे. खेळाडूच्या कोर्टवरील कामगिरीच्या बरोबरीने तो किती स्पर्धात खेळतो यालाही गुणांकनात महत्त्व दिले जाते. यामुळे यशस्वी खेळाडूंच्या गुणांकनावर फरक पडतो अशी ‘पीटीपीए’ची भावना आहे.

उत्तेजक सेवनाविषयीची पक्षपाती भूमिका?

मॅच फिक्सिंग असो किंवा उत्तेजक सेवन प्रकरणात दोषी आढळणे, यामध्ये प्रत्येक टेनिसपटूला समान पातळीवर शिक्षा व्हायला हवी. एखादा अव्वल खेळाडू अशा प्रकरणात सापडला, तर मागल्या दरवाजातून बाहेर पडता येईल अशा पद्धतीने त्याला शिक्षेत सूट देणे याला ‘पीटीपीए’ने विरोध केला आहे. या वेळी त्यांचा सगळा रोख दोन वेळा उत्तेजक चाचणीत दोषी आढळूनही दीर्घ बंदीच्या शिक्षेतून सुटलेल्या यानिक सिन्नेरच्या प्रकरणाकडे होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डब्ल्यूटीए आणि एटीपीची भूमिका काय?

‘पीटीपीए’च्या या कृत्याला डब्ल्यूटीएने खेदजनक आणि दिशाभूल करणारे म्हटले आहे, तर एटीपीने अर्धवट माहितीवर आधारित लढाई असे संबोधले आहे. ‘पीटीपीए’ अशा संघर्षाद्वारे विभाजन आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. संघर्ष करण्यापेक्षा ‘पीटीपीए’ने न्यायालयाची पायरी चढण्याची भूमिका घेतली याचे शल्य या संघटनांना वाटत आहे.