Thailand-Combodia border dispute: लढाऊ विमाने, भूसुरुंग, हद्दपारी आणि गोळीबार… थायलंड आणि कंबोडियामधील सीमावाद आता शिगेला पोहोचला आहे. कंबोडिया आणि थायलंडने एकमेकांवर हल्ले केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही सरकार एकमेकांवर सार्वभौमत्वाचे उल्लंघन आणि शांतता धोक्यात आणल्याचा आरोप करत असताना हे संकट मोठ्या संघर्षात रूपांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. २८ मे रोजी थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील वादग्रस्त सीमारेषेवर संघर्ष निर्माण झाला. या संघर्षात एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी यापूर्वी ठरवलेल्या ठिकाणी सैन्य मागे घेण्याचे मान्य केले होते. मात्र हा वाद आता पुन्हा उफाळला आहे.
थायलंड आणि कंबोडियामधील सीमावाद नेमका काय आहे?
थायलंड आणि कंबोडियामध्ये ८१७ किलोमीटर लांबीची सीमा आहे. १८६३ ते १९५३ या काळात फ्रेंच वसाहतवादी अधिकाऱ्यांनी कंबोडियावर ताबा मिळविताना त्याच्या बर्याचशा भागांवर ऐतिहासिकदृष्ट्या नियंत्रण प्रस्थापित केले होते. आधी या दोन्ही देशांमधील संबंध चांगले होते; परंतु काही दिवसांपासून ता मोआन थॉम आणि ता मुएन थॉम हा भाग वादाचा विषय ठरला आहे.
१९०७ मध्ये काढलेला हा नकाशा थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील नैसर्गिक पाणलोट रेषेचे अनुसरण करण्याच्या करारावर आधारित होता. मात्र, नंतर थायलंडने ११ व्या शतकातील प्रीह विहियर मंदिर आपल्या नकाशात डांगरेक पर्वतरांगांमध्ये दर्शविल्यामुळे कंबोडियाने तीव्र निषेध व्यक्त केला. युनेस्कोच्या मते, शंकराला अर्पण केलेले हे मंदिर कंबोडियन मैदानावर वर्चस्व असणाऱ्या पठाराच्या कडेला वसलेले आहे.
२००८ मध्ये कंबोडियाने प्रीह विहियर मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा देण्याची मागणी केली तेव्हा तणाव निर्माण झाला होता, असे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे. जुलै २००८ मध्ये मंदिराला मान्यता दिल्यानंतर, सीमावर्ती भागात कंबोडियन आणि थाई सैन्यात लष्करी संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष वर्षानुवर्षे सुरू राहिला आणि एप्रिल २०११ मध्ये तो शिगेला पोहोचला. त्यामुळे ३६,००० लोक विस्थापित झाले. त्याच वेळी १९६२ च्या निर्णयाला मान्यता मिळावी यासाठी कंबोडिया पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला. न्यायालयाने दोन वर्षांनंतर आपल्या आधीच्या निर्णयाचे समर्थन केले. हा निर्णय थायलंड आजही मनापासून स्वीकारू शकलेला नाही.
पुन्हा संघर्ष का होतोय?
सध्याच्या सुरू असलेल्या संघर्षाचं कारण म्हणजे या वादग्रस्त भागात झालेल्या भूसुरुंग स्फोटांची मालिका. २३ जुलै रोजी थायलंडच्या उबोन रत्वाथानी प्रांतात एका भूसुरुंग स्फोटात तीन थाई सैनिक जखमी झाले आणि एका सैनिकाला पाय गमवावा लागला. या प्रांतातील गस्ती मार्गांवर नव्याने टाकलेले रशियन बनावटीचे भूसुरूंग होते. त्यानंतर थाई सैन्याने कंबोडियावर ओटावा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. या करारानुसार भूसुरुंगाच्या वापर व उत्पादनावर बंदी आहे. प्रत्युत्तर म्हणून कंबोडियन संरक्षण मंत्रालयाने नवीन भूसुरूंग टाकण्यास नकार दिला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, थायलंडने गस्तीसाठी मान्य केलेल्या मार्गांच्या वापराबाबत असलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल माली सोचेता यांनी म्हटले, “भूसुरुंगाचा स्फोट कंबोडियन भूभागावर झाला. हा प्रदेश भूतकाळातील युद्धे आणि दशकांच्या अशांततेतील न फुटलेल्या शस्त्रांनी भरलेला आहे.”
हिंसाचार का झाला?
थाई सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:३५ च्या सुमारास सुरू घडली. थायलंडच्या सुरिन प्रांताजवळील ता मोआन मंदिराचे रक्षण करणाऱ्या थाई सैनिकांच्या तुकडीने कंबोडियन ड्रोनचा आवाज ऐकला. लष्कराने सांगितले की, सहा सशस्त्र कंबोडियन सैनिक होते, त्यात एक रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड घेऊन आला होता. नंतर थाई चौकीसमोरील काटेरी तारांच्या कुंपणाजवळ ते पोहोचले. थाई सैनिकांनी त्यांना इशारा दिला. मात्र, सकाळी ८:२० च्या सुमारास कंबोडियन सैन्याने मंदिराच्या पूर्वेकडील बाजूने थाई तळापासून सुमारे २०० मीटर अंतरावर गोळीबार केला.
भूसुरुंगात थाई लष्कराच्या गस्तीवरील पाच सदस्य जखमी झाल्यानंतर थायलंडने कंबोडियन राजदूताला हद्दपार केले आणि त्यांच्या राजदूताला परत बोलावल्यानंतर काही तासांतच ही चकमक झाली. थायलंडचे कार्यवाह पंतप्रधान वेचायचाई म्हणाले की, थायलंडच्या लष्करी तपासणीत कंबोडियाने वादग्रस्त सीमावर्ती भागात नवीन भूसुरुंग बसवल्याचे पुरावे सापडले आहेत. कंबोडियाने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.
कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, “थायलंडने कंबोडियाच्या ओड्डार मीन्चे प्रांतातील दोन मंदिर स्थळांवर, तसेच प्रीह विहियर (कंबोडिया) आणि उबोन रत्थाथानी (थायलंड) या सीमावर्ती भागांतील कंबोडियन सैन्यावर हल्ला केला. कंबोडियाची भूमिका नेहमीच शांततापूर्ण समाधानाची राहिली आहे; परंतु या प्रकरणात सशस्त्र आक्रमणास सशस्त्र प्रत्युत्तर देणे आवश्यक ठरले आहे.”
थायलंड-कंबोडिया सीमावाद पुन्हा उफाळल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील मुद्दे:
- प्रीह विहियर मंदिराजवळील भागात तणाव
- दोन्ही देशांमध्ये लष्करी हालचाली वाढल्या
- दोन्ही देशांनी एकमेकांवर आपल्या सैन्याने सीमा ओलांडल्याचा आरोप केला
- सीमारेषेवर राहणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्ये संरक्षण आणि मालकी हक्कांबाबत असंतोष वाढलेला आहे
- दोन्ही देशांतर्गत राजकारणात राष्ट्रवादाचा मुद्दा उचलण्यासाठी सीमावाद पुन्हा चर्चेत आणला जात असल्याची शक्यता
सुरिन सीमावर्ती प्रांतातील थाई रहिवाशांना वाळूच्या पिशव्या आणि टायरने बांधलेल्या तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये पळून जावे लागले. आतापर्यंत दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि अधिकाऱ्यांनी ४०,००० रहिवाशांना सुरक्षितस्थळी आहे. थायलंडने नोम पेन्ह येथील आपल्या राजदूताला परत बोलावले आणि बँकॉकमधील कंबोडियाच्या राजदूताला हाकलून लावले. प्रत्युत्तरादाखल कंबोडियाने संबंध ‘सर्वांत खालच्या पातळीवर’ आणले आणि सर्व राजनैतिक कर्मचाऱ्यांना घरी परतण्याचे आदेश दिले. थायलंडने ईशान्य सीमेवरील मार्ग बंद केल्यामुळे प्रवास आणि व्यापारी देवाणघेवाण ठप्प झाली आहे. या कृतीला उत्तर देताना कंबोडियाने थाई चित्रपट व टीव्ही कार्यक्रमांवर बंदी घातली आणि फळे, भाज्या व इंधन यांच्या आयातीवर निर्बंध घालून, थायलंडची आर्थिक नाकेबंदी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या संघर्षाचे पडसाद थायलंडच्या देशांतर्गत राजकारणातही उमटले आहेत.
मोठं युद्ध होण्याची शक्यता कमी असली तरी परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. या संवेदनशील वादात हवाई हल्ले, नागरिकांचे स्थलांतर, राजदूतांची हकालपट्टी यांमुळे तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूंना सैन्य तैनात असल्याने आणि औपचारिक चर्चेची घोषणा न झाल्यामुळे, दीर्घकाळ चालणाऱ्या चकमकी किंवा चुकीच्या अंदाजांमुळे व्यापक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरच राजनैतिक संबंध कमकुवत झाले आहेत. तसेच सीमापार व्यापार विस्कळित झाल्यामुळे आर्थिक घसरण होऊन, सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आगामी काळात आंतरराष्ट्रीय मध्यस्थीची मागणी केली जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.