-विनायक परब
दक्षिण तुर्कस्तानमधील शानलुर्फा शहरापासून तासभराच्या अंतरावर असलेल्या काराहान टेपे या गावाबाहेरच्या टेकाडावर नवाश्म युगातील पुरावे सापडले. एवढेच नव्हे तर जगात अस्तित्वात आलेल्या पहिल्या धर्मस्थळाचेही पुरावे सापडले. आजवर काही पुराविद आणि इतिहासतज्ज्ञांना असे वाटत होते की, नवाश्म युगात माणूस स्थिरावल्यानंतरच्या शतकांमध्ये धर्म अस्तित्वात आला असावा. मात्र काराहान टेपे आणि गोबेक्ली टेपेमधील पुराव्यांनी या गृहितकास यशस्वी छेद दिला. त्यामुळे माणूस नवाश्म युगात प्रवेश करत असताना, एका बाजूस शिकार करून गुजराण करत असतानाच जगातील पहिला धर्म अस्तित्वात आला, असे नवे गृहितक पुढे आले आहे, त्या संबंधातील अनेक मुद्द्याचे हे स्पष्टीकरण.

नवाश्म युग म्हणजे काय?

Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
vladimir putin
“इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून मॉस्कोत दहशतवादी हल्ला”, पुतिन यांचं वक्तव्य; युक्रेनचा उल्लेख करत म्हणाले…
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..

मानवी इतिहासामध्ये अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग असे तीन महत्त्वाचे टप्पे मानले जातात. त्यात अश्मयुगाच्या अखेरच्या कालखंडात नवाश्म युग अस्तित्वात आले. या कालखंडात दगडी हत्यारांचे आकार सूक्ष्म व अधिक धारदार झाले. याच कालखंडात माणसाला शेती व प्राण्यांना पाळीव करता येऊ शकते या दोन बाबींचा महत्त्वाचा शोध लागला. या शोधांमुळे तोपर्यंत भटके जीवन जगणारा माणूस एकाच जागी स्थिरावला आणि त्याच्या संस्कृतीत मोठा बदल झाला. म्हणून नवाश्म युगाला मानवी इतिहासातील पहिले क्रांतीयुग असेही म्हणतात.

या युगाचा आणि मानवी इतिहासातील धर्म या संकल्पनेचा संबंध काय?

भटके जीवन जगणाऱ्या माणसासमोर दर दिवशी काय खायचे हा मूलभूत प्रश्न होता. शिकार किंवा कंदमुळे खाऊन राहणे हेच त्याचे जीवन होते. मात्र शेतीच्या शोधामुळे आणि पशुपालनामुळे त्याचा अन्नाचा दररोजचा शोध संपला. त्याच्या जिवाला मिळालेल्या स्वस्थतेमुळे तो इतर विषयांवर विचार करू लागला आणि त्याचप्रमाणे त्याला पडलेल्या प्रश्नांचाही शोध घेऊ लागला. याच शोधातून विविध नवीन संकल्पनांचा जन्म झाला, असे इतिहासतज्ज्ञ मानतात. याच अनेक संकल्पनांमध्ये धर्माचाही समावेश आहे. 

गोबेक्ली टेपे आणि काराहान टेपे येथील संशोधनाने वेगळे काय मांडले?

नवाश्म युगात माणूस स्थिरावल्याच्या काही शतकांनंतर धर्म अस्तित्वात आला, असे सध्या मानले जात होते. नवाश्म युग जगभरात अनेक ठिकाणी इसवीसन पूर्व १२००० या कालखंडात आले, असे मानले जाते. जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ते वेगवेगळ्या कालखंडात आल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून लक्षात येते. 

भारतातील नवाश्म युगाचे पुरावे कुठे सापडतात आणि ते कोणत्या कालखंडातील आहेत?

भारतातील नवाश्म युगाचे पुरावे हे इसवी सन पूर्व ७००० या कालखंडातील असून ते सध्या पाकिस्तानात असलेल्या मेहेरगढ येथील आहेत. 

तुर्कस्तानातील शोध वेगळा कसा?

गोबेक्ली टेपे आणि काराहान टेपे या दोन्ही ठिकाणी धर्मस्थळ सदृश्य दगडी उभारणी केलेली रचना सापडली आहे. १९९० पासून क्लाऊस श्मिट या जर्मन पुरातत्त्वज्ञाने गोबेक्ली टेपे (हे ठिकाण पॉटबेली हिल म्हणूनही ओळखले जाते) येथील टेकाडावर उत्खननास सुरुवात केली. मात्र काराहान टेपेकडे दुर्लक्ष झाले. बायझन्टाइन थडगी असलेले ठिकाण असा त्याचा परिचय होता. मात्र तिथे प्राण्यांची उठाव चित्र- शिल्पे सापडली. शिवाय टी आकाराचे मोठे स्तंभही सापडले ज्यांची रचना गोलाकारात करण्यात आली होती. गोलाकारातील या स्तंभाकृती रचना कदाचित माणसाच्याच स्मृतीसाठी किंवा माणसांसारख्याच दिसणाऱ्या देवांचे अस्तित्व म्हणून रचण्यात आल्या असाव्यात, असा पुरातत्वज्ञांचा कयास होता. हे ठिकाण बायझन्टाइन साम्राज्याच्याही तब्बल सुमारे १० हजार वर्षे जुने आहे, तर स्टोनहेंजपेक्षा सहा हजार वर्षे आधीचे आहे. जगातील सर्वांत प्राचीन मंदिर म्हणून ते जगजाहीरही झाले आणि लोकप्रियताही पावले. त्याचवेळेस इस्माइल कान या तुर्की धनगराने काराहान टेपे हेदेखील असेच ठिकाण आहे हे पुराविदांच्या लक्षात आणून दिले. २०१९ साली इथे उत्खनन सुरू झाले आणि २०२२ च्या सुरुवातीस हे स्थळ पर्यटकांसाठी खुले झाले.

काराहान टेपे येथे असे काय सापडले की, ज्यामुळे इतिहासास कलाटणी मिळाली?

काराहान टेपेने पूर्व नवाश्म युगावर एक वेगळा प्रकाशझोत टाकला आहे. धनगर असलेल्या कानला मातीतून डोके वर काढणारी टी आकारातील जी स्तंभाकार रचना दिसत होती तो गोलाकारातील स्तंभरचनेचा वरचा भाग होता. ही दोन्ही ठिकाणे साधारणपणे इसवी सनपूर्व १० हजार वर्षांपूर्वीची आणि समकालीन आहेत. यातील काराहान टेपे काही शतके नंतरचे आहे इतकेच. या दोन्ही ठिकाणांतील साधर्म्य लक्षवेधी आहे. गोबेक्ली टेकाडावर प्राण्यांचे चित्रण अधिक आहे. त्यात दगडी कोल्हा, विंचू बिबळ्या यांचे चित्रण आहे. ते एकाच सलग दगडात कोरलेले आहेत. तर काराहान येथे लहानशा खोलीमध्ये ११ मानवी लिंगे कोरलेली आहेत. तिथूनच एक लहानशी मार्गिका पुढच्या छोटेखानी खोलीमध्ये जाते, ज्या मार्गिकेतून शुक्राणू किंवा रक्त प्रवाहित झाल्याचे चित्रण आहे. हे सारे एक नाग पाहातो आहे, ज्याचे डोके माणसाचे आहे. एखाद्या पंथाचा दीक्षा सोहळा असावा तशीच येथील कलाकृतींची रचना पाहायला मिळते. हे विशिष्ट प्रकारच्या कर्मकांडाचे ठिकाण असावे, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. 

कर्मकांडाच्या ठिकाणाचा धर्माशी काय संबंध ?

शेतीच्या शोधानंतर मानवी वस्ती स्थिरावणे हा पाया होता, त्याच पायाच्या बळावर नंतर जगभरात धर्म अस्तित्वात येण्यास सुरुवात झाली, असे इतिहासतज्ज्ञांना वाटते. गोबेक्ली येथील या रचनांवरून त्याचा पुरावा मिळतो. मात्र या परिसरात कुठेही शेती किंवा पशुपालनाचे पुरावे पुरातत्त्वज्ञांना मिळालेले नाहीत. त्यामुळेच शिकारीसाठी हिंडणाऱ्या माणसाने शेतीच्या शोधापूर्वीच धर्म या संकल्पनेची निर्मिती केली असावी, असे आता संशोधकांचे मत झाले आहे. नंतर मात्र शेतीच्या शोधानंतर यांची जागा नव्या देवांनी घेतली असावी आणि म्हणून नंतरच्या पिढ्यांनी हे ठिकाण सोडून इतरत्र जाणे पसंत केले असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

गोबेक्ली व काराहान येथे सापडलेल्या पुरावस्तूंमधील साम्य- भेद काय आहेत?

काराहान टेकाडामध्ये मानवाच्या या स्थित्यंतराचे सापडलेले पुरावे अधिक महत्त्वाचे आहेत, असे तज्ज्ञांना वाटते आहे. गोबेक्ली टेकाडावरच्या लोकांनी स्वतःला प्राणीसृष्टीचा भाग मानले. तर काराहान टेकाडावरील लोक मात्र नंतरच्या पिढीतील असावेत. इथे माणसाच्या इतिहासातील अस्तित्वाला कलाटणी मिळाली असे इस्तन्बूल विद्यापीठातील नेक्मी कारूल यांना वाटते. या परिसरामध्ये आता एकूण १६ इतिहासपूर्व कालखंडातील ठिकाणांचे अस्तित्व आढळले आहे. त्याती सहा ठिकाणी आता उत्खननाला सुरुवात झाली आहे. 

याशिवाय इतरही काही निष्कर्ष आहेत का?

टी आकारातील स्तंभरचनेमधून लक्षात येते की, इथे जमणारे सर्व लोक हे एक विशिष्ट धर्म आचरण करणारे होते. गोबेल्की टेकडी हे त्यांचे धर्मस्थळ असावे. आता काराहान टेकाड लक्षात आल्यानंतर या आधीच्या निष्कर्षाचा पुनर्विचार केला जात आहे. लिंगाच्या आकारातील रचनांवरून ही संस्कृती पुरुषसत्ताक होती हेही लक्षात येते. एकूणात माणसाने स्थिरावण्यापूर्वीच जगात धर्म अस्तित्वात आला, यावर आता शिक्कामोर्तब होते आहे.