Indigenous vs migrant Muslims Assam आसाममधील मुस्लीम लोकसंख्या अंदाजे १.१८ कोटीपेक्षा जास्त आहे. राज्यात एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३४ टक्के मुस्लीम समुदाय आहे. मात्र, हा मुस्लीम समुदाय दोन श्रेणींमध्ये विभागला गेला आहे. मूळ निवासी मुस्लीम शतकानुशतके या प्रदेशात राहत आहेत आणि या भागात राहणारे मिया मुस्लीम मूळ बंगाली स्थलांतरितांमध्ये येतात. ते वसाहत काळात आणि त्यानंतर राज्यात स्थायिक झाले आहेत. या दोन्ही समुदायांचा धर्म एक असला तरी त्यांचा इतिहास, भाषा आणि राजकीय महत्त्व वेगळे आहेत. काही वर्षांपासून आसाम सरकारने हा फरक अधोरेखित करण्यासाठी काही औपचारिक पावले उचलली आहेत. या प्रक्रियेत कोण स्थानिक आहे आणि कोण नाही याचा शोध घेतला जात आहे. त्यावरून या प्रदेशात नवा वादही निर्माण झाला आहे. नेमकं प्रकरण काय? कोण आहेत मूळ निवासी मुस्लीम आणि मिया मुस्लीम? त्यांच्यात अंतर काय? यावरून वाद निर्माण होण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

मूळ निवासी मुस्लीम कोण आहेत?

  • आसाममधील मूळ निवासी मुस्लीम या प्रदेशात ब्रिटिश वसाहतकरणाच्या खूप आधीपासून वास्तव्यास आहेत. काही लोक तर अगदी १३ व्या शतकातील अहोम राज्यापासूनचे आहेत.
  • जुलै २०२२ मध्ये आसाम मंत्रिमंडळाने सरकारने नियुक्त केलेल्या उपसमितीच्या शिफारशींच्या आधारावर अशा पाच उपगटांना औपचारिकपणे मान्यता दिली. त्यात गोरिया, मोरिया, देशी, सय्यद व जुल्हा या उपगटांचा समावेश आहे. या सर्व गटांचा वेगळा इतिहास आहे.
  • गोरिया आणि मोरिया यांच्यामध्ये युद्धकैदी, स्थानिक धर्मांतरित आणि कारागीर यांचा समावेश होता, जे अहोम काळात आसामी समाजात समाविष्ट झाले.
  • अली मेच १२०५ मधील बख्तियार खिलजीच्या आक्रमणादरम्यान इस्लाममध्ये धर्मांतरित झाले होते. ते एक आदिवासी प्रमुख होते. ते देशी समुदायाचे पूर्वज आहेत.
  • सय्यद हे सुफी संतांचे वंशज आहेत. जुल्हा हे विणकर होते. त्यांना अहोम आणि ब्रिटिश अशा दोन्ही काळांत बिहार, ओडिशा व बंगालसारख्या प्रदेशातून आणले गेले होते.
मूळ निवासी मुस्लीम शतकानुशतके या प्रदेशात राहत आहेत आणि या भागात राहणारे मिया मुस्लीम मूळ बंगाली स्थलांतरितांमध्ये येतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

या समुदायांचा इतिहास जरी वेगळा असला तरी त्यांची भाषा एक आहे. हे सर्व समुदाय स्थानिक बहुतेक स्थानिक चालीरीती पाळतात. आसामी सण साजरे करतात. सरकारने नियुक्त केलेल्या उपसमितीने असा अंदाज लावला की, या पाच गटांमध्ये आसामच्या मुस्लीम लोकसंख्येपैकी ४२ लाख मुस्लिमांचा समावेश आहे; परंतु राजकीयदृष्ट्या त्यांचा प्रभाव मर्यादित आहे. त्यांच्या विखुरलेल्या वस्तीमुळे ते कोणत्याही एका मतदारसंघात बहुसंख्येने एकवटलेले नाहीत.

मिया मुस्लीम कोण आहेत?

मिया मुस्लीम हे बंगाली भाषक मुस्लीम आहेत. त्यांचे पूर्वज पूर्व बंगाल (आताचे बांगलादेश)मधून स्थलांतरित झाले. त्यापैकी सर्वांत पहिले स्थलांतर ब्रिटिशांमुळे झाले. त्यांना ब्रह्मपुत्रेच्या सुपीक नदीकाठच्या बेटांवर (स्थानिक भाषेत ‘चार-चपोरी’) शेती करण्यासाठी आणण्यात आले. त्यानंतर १९४७ मध्ये फाळणीनंतर आणि १९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामादरम्यानही मोठ्या संख्येने या समुदायाने स्थलांतर केले. आज मिया मुस्लीम आसाममध्ये पसरलेले आहेत आणि राज्याच्या १२६ विधानसभा मतदारसंघांपैकी ३० पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये त्यांचे वर्चस्व आहे. ‘मिया’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘सज्जन’ असा आहे, मात्र गेल्या काही दशकांत विदेशी व्यक्तींसाठी या शब्दाचा वापर केला जात आहे. या समुदायातील अनेकांनी स्वतःला आसामी मुस्लीम म्हटले आहे.

मिया समुदाय हा मुख्यतः ‘चार-चपोरी’शी संबंधित आहे. या भागात त्यांनी अस्थिर परिस्थितीत कृषी उपजीविका निर्माण केली आहे. आसामच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे योगदान असूनही त्यांच्याकडे बेकायदा स्थलांतर आणि नागरिकत्वाच्या वादविवादांदरम्यान नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. अनेकांनी १९५१ च्या जनगणनेतही आसामी ही आपली मातृभाषा म्हणून नोंदवली होती.

मुस्लिमांविषयी आसामच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी इशारा दिला आहे की, सध्याच्या वाढीचा दर कायम राहिल्यास राज्यातील मुस्लीम लोकसंख्या लवकरच हिंदू लोकसंख्येच्या बरोबरीने येऊ शकते. जनगणनेच्या आकडेवारीचा उल्लेख करीत त्यांनी दावा केला की, २०११ मध्ये आसामच्या लोकसंख्येपैकी ३४ टक्के मुस्लीम होते आणि त्यापैकी केवळ तीन टक्के स्थानिक मुस्लीम होते. उर्वरित ३१ टक्के स्थलांतरित वंशाचे होते, असे ते म्हणाले. सरमा यांनी म्हटले की, सध्याचा लोकसंख्याशास्त्रीय कल कायम राहिल्यास २०४१ पर्यंत आसाममध्ये हिंदूंच्या बरोबरीने मुस्लीम असतील. “हे माझे मत नाही; हे फक्त जनगणनेचे परिमाण आहे,” असे त्यांनी दिब्रुगडमध्ये पत्रकारांना सांगितले. या आकडेवारीवरून स्पष्ट लोकसंख्याशास्त्रीय बदल दिसून येतो, असेही ते म्हणाले.

२०११ च्या जनगणनेनुसार आसाममधील एकूण ३.१२ कोटी लोकसंख्येपैकी मुस्लीम लोकसंख्या ३४.२२ टक्के (१.०७ कोटी) होती; तर हिंदू लोकसंख्या ६१.४७ टक्के (१.९२ कोटी) होती. मुस्लीम बहुसंख्य जिल्ह्यांची संख्या २००१ मध्ये सहावरून २०११ मध्ये नऊ झाली. २०२१ च्या जनगणनेची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही; मात्र काही नेत्यांचा दावा आहे की, ही संख्या आता किमान ११ झाली आहे.

मूळ निवासी मुस्लिमांबाबत चिंता

मूळ निवासी मुस्लिमांना आसाम सरकारने मान्यता दिल्यानंतर अनेक वर्षांपासून त्यांच्यासाठी खास विकास योजना, ओळख प्रमाणपत्र, वेगळी जनगणना आणि नोकरी व शिक्षणात आरक्षणाची शिफारस करण्यात येत होती. मुख्यमंत्री सरमा यांच्या मते, आसामी मुस्लिमांचे वेगळेपण जपण्यासाठी ही उपाययोजना आवश्यक आहे. ते म्हणतात की, या गटाला स्थलांतरित मुस्लिमांबरोबर जोडले गेले आहे. अखिल आसाम गोरिया-मोरिया देशी परिषद यासारख्या स्थानिक मुस्लीम संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि ही त्यांच्या सांस्कृतिक ओळख व संरक्षणासाठीची दीर्घकाळाची लढाई असल्याचे म्हटले आहे.

परंतु, काही टीकाकारांचे म्हणणे आहे की, हे धोरण राजकीय हेतूसाठी आहे. एआययूडीएफ (AIUDF)सारख्या पक्षांना ‘मिया’बहुल भागांतून जास्त पाठिंबा मिळतो. हा पक्ष भाजपावर मुस्लीम लोकसंख्येमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप करतो. बराक खोऱ्यातील कचारी मुस्लीम आणि मणिपुरी पंगाल यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गटांनीही त्यांना मूळ निवासी मुस्लीम म्हणून मान्यता न दिल्याने टीका केला आहे. हे समुदायदेखील अनेक शतकांपासून आसाममध्ये असल्याचा दावा करतात.

‘चार-चपोरी’ आणि मिया मुस्लिमांचा संघर्ष

मिया समुदायाच्या वस्तीचे केंद्र ब्रह्मपुत्रेच्या ‘चार-चपोरी’ या बेटांमध्ये आहे. नदीच्या बदलत्या प्रवाहामुळे हे केंद्र सतत बदलत असते. तेथील जीवन अस्थिर असून, राज्याच्या पायाभूत सुविधा आणि सेवांचा त्यांना पुरेसा लाभ मिळत नाही. तरीही अनेक दशकांपासून मिया मुस्लिमांनी कठोर परिश्रम करून कृषी समुदाय निर्माण केले आहेत. या सर्व गोष्टी असूनही मूळ निवासी मुस्लिमांसह अनेकांनी त्यांना बाहेरचे मानले आहे.

दोन्ही समुदायांचे राजकीय महत्त्व

दोन्ही समुदायांचा राजकीय प्रभावही असमान आहे. मूळ निवासी मुस्लिमांना अधिकृतपणे मान्यता आहे आणि ते दीर्घकाळापासून स्थायिक आहेत. मात्र, असे असले तरीही ते विखुरलेले आहेत. त्यांनी काँग्रेस, आसाम गण परिषद (एजीपी) आणि काही वेळा भाजपालाही पाठिंबा दिला आहे; परंतु एकत्रितपणे पाहिल्यास त्यांच्याकडे जास्त राजकीय ताकद नाही. पण, मिया मुस्लीम एक निर्णायक मतदार गटात आहेत. ते बहुतांश वेळा ‘एआययूडीएफ’ला पाठिंबा देतात. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत, या पक्षाने १४ जागा जिंकल्या. त्यातील बहुतेक जागा खालच्या आसाममधील मुस्लीम बहुसंख्य मतदारसंघांतील होत्या.