गेल्याच महिन्यात वाराणसी न्यायालयाने हिंदू भाविकांना ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजाअर्चा करण्याचा अधिकार दिला. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हिंदू भाविक ‘व्यास का तेहखाना’ या भागात पूजा करू शकतात. वाराणसीमध्ये असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूला ज्ञानवापी ही मशीद आहे. याच ज्ञानवापी मशीद परिसरात मंदिर होते, असा दावा हिंदू पक्षकारांकडून केला जात आहे; तर मुस्लीम पक्षकारांकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. इतिहासातील पाने चाळताना आपल्याहाती नेमके काय लागते? इतिहास काय सांगतो या व अशा अनेक प्रश्नांचा घेतलेला शोध!

मूलतः ज्ञानवापी मशीद परिसरात पूजाअर्चा करू देण्याची विनंती वाराणीसीतील काही साधूंनी १९९१ मध्ये न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर २०२२ साली पाच हिंदू महिलांकडून ज्ञानवापी मशीद संकुलात शृंगारगौरीसह अन्य देवतांच्या पूजनासाठी परवानगी देण्यात यावी ही मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. याच खटल्यात २०२३ मध्ये न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व विभागाला ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण सुरू करण्याचा आदेश दिला. याच सर्वेक्षणात ज्ञानवापी मशिदीच्या जागी हिंदू मंदिर असल्याचा अहवाल पुराव्यांनिशी भारतीय पुरातत्त्व विभागाकडून सादर करण्यात आला. एकूणच या सर्व प्रक्रियेत पुरातत्त्व विभागाने मोलाची भूमिका बजावली आहे. यानिमित्ताने प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ जेम्स प्रिन्सेप यांचेही नाव चर्चेत आहे.

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

अधिक वाचा: ज्ञानव्यापी आणि शाही इदगाह मशीद: ‘हा’ अधिनियम हिंदू याचिकाकर्त्यांना का रोखू शकला नाही?

जेम्स प्रिन्सेप चर्चेत का आहेत?

जेम्स प्रिन्सेप यांनी तयार केलेला लिथोग्राफी मॅप सध्या विशेष चर्चेत आहे. १८३१ साली या ब्रिटिश विद्वानाने जुन्या काशी विश्वनाथ मंदिराचा लिथोग्राफिक नकाशा तयार केला होता. आणि त्याच नकाशामुळे काशी विश्वेश्वर मंदिराच्या जागी औरंगजेबाने बांधलेली मशीद कशी उभी आहे याची पुरेशी कल्पना येते. हा नकाशा जवळपास गेल्या ५०० वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकतो. इतकेच नाही तर जेम्स प्रिन्सेप यांच्यामुळे सम्राट अशोकाच्या इतिहासालाही उजाळा मिळाला, हे विशेष. त्यांनी भारतीय इतिहास लेखनात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे कोलकात्याच्या हुगळी नदीवरील एका घाटाला प्रिन्सेप घाट असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळेच जेम्स प्रिन्सेप यांनी ज्ञानवापी मशिद आणि काशी विश्वेश्वराविषयी नक्की काय म्हटले आहे हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरावे.

कोण होते जेम्स प्रिन्सेप?

जेम्स प्रिन्सेप हे पुरातत्त्वज्ञ, प्राचीन भारतीय लिपी अभ्यासक होते. त्यांनी ‘जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ सुरु केले. तसेच त्यांनी नाणकशास्त्र, धातूशास्त्र, हवामानशास्त्राच्या अनेक पैलूंचा अभ्यास, दस्तऐवजीकरण आणि चित्रण केले. प्रसिद्ध पुरातत्त्व अभ्यासक शांताराम भालचंद्र देव यांनी आपल्या ‘पुरातत्त्वविद्या’ या पुस्तकात नमूद केले आहे की, “जेम्स प्रिन्सेप यांनी भारतीय पुरातत्त्वीय संशोधनाला विलक्षण कलाटणी दिली. प्रिन्सेप वयाच्या २८ व्या वर्षी भारतात आले आणि ब्रिटिश एशियाटिक सोसायटीचे सर्वात तरुण सहकारी झाले. १८३४ ते १८३७ या काळात त्यांनी ब्राह्मी व खरोष्ठी या लिपी पहिल्या प्रथम उलगडून दाखवल्या. या लिपींच्या वाचनाने भारतीय इतिहासात आणि पुरातत्त्वीय संशोधनात क्रांतीच झाली”. त्यांनी सम्राट अशोकाचा इतिहास जगासाठी खुला केला. श्रीलंकेपासून अफगाणिस्तानपर्यंतच्या अनेक शिलालेखांमध्ये उल्लेख असलेला राजा ‘देवनामप्रिय पियदसि’ हा दुसरा कोणी नसून सम्राट अशोक होता हे त्यांनीच सिद्ध केले. तसेच अँटीओकस तिसरा आणि टॉलेमी फिलॅडेल्फस या ग्रीक राजांशी अशोकाची समकालिनताही सिद्ध केली. शां. भा. देव यांनी नमूद केल्याप्रमाणे याचे “सारे श्रेय प्रिन्सेप यांनाच दिले पाहिजे; ब्राह्मी आणि खरोष्ठी लिपींच्या वाचनाची किल्ली हाती आल्याने मौर्यकालीन व त्यानंतरच्या काळातील विविध प्रकारच्या उपलब्ध पुराव्याचे वाचन करता येऊन भारतीय इतिहास व पुरातत्त्वात ठोकळमानाने कालनिश्चितीची चौकट पक्की करता आली”. वयाच्या ४१ वर्षी १८४० साली त्यांचे निधन झाले.

जेम्स प्रिन्सेप आणि ‘बनारस इलस्ट्रेटेड, अ सीरीज ऑफ ड्रॉइंग’

प्रिन्सेप यांनी भारतातील आपल्या कारकिर्दीची सुरुवात कोलकाता येथील टांकसाळीतून केली ,१५ सप्टेंबर १८१९ रोजी ते आपल्या भावासह कोलकात्यात दाखल झाले. त्यानंतर एका वर्षाच्या आतच, त्यांच्या वरिष्ठांनी त्यांचे काम पाहून त्यांना वाराणसी येथील टांकसाळीत पाठविले, १८३० पर्यंत ती टांकसाळ बंद होईपर्यंत ते वाराणसीलाच राहिले. १९२० ते १९३० या दहा वर्षांच्या कालखंडात ते वाराणसीमध्ये होते. या कालखंडात त्यांनी वाराणसीच्या सचित्र इतिहासाची नोंदणी केली. आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर त्यांनी त्या कालखंडात केलेलं संशोधन महत्त्वाचे ठरणारे आहे. वाराणसीमधील वास्तव्यात प्रिन्सेप यांच्या देखरेखीखाली भूमिगत सांडपाणी व्यवस्था बांधण्यात आली, जी अजूनही कार्यरत आहे हे विशेष. या शिवाय त्यांनी १६६९ साली औरंगजेबाने बांधलेल्या आलमगीर मशिदीची पुनर्बांधणी केली, तसेच या शहराचा नकाशाही तयार केला. १८३१ मध्ये त्यांनी ‘बनारस इलस्ट्रेटेड, अ सीरीज ऑफ ड्रॉइंग’ हे पुस्तकही प्रकाशित केले. हे पुस्तक आणि नकाशा ज्ञानवापी प्रकरणातील मुख्य पुरावा असेल असे न्यायालयामध्ये हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू जैन यांनी ‘इंडिया टुडे डॉट इन’ला सांगितले. ‘बनारस इलस्ट्रेटेड’ या पुस्तकात जेम्स प्रिन्सेप यांनी लिथोग्राफीचा वापर करून प्रत्येक दृश्य कागदावर रेखाटले आहे आणि पुराव्यासह माहिती सादर केली आहे. या पुस्तकातील माहिती आणि चित्रांमध्ये मुनिकुर्णिका घाट (मनकर्णिका), ब्रह्मा घाट, ताजींची मिरवणूक आणि हिंदू नृत्य करणाऱ्या मुली यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जेम्स प्रिन्सेप यांनी ‘बनारस इलस्ट्रेटेड’ मध्ये जुन्या विश्वेश्वर मंदिराच्या स्थापत्यकलेची आणि मूळ प्रार्थनास्थळाचे सध्याच्या ज्ञानवापी मशिदीत कसे रूपांतर झाले याबद्दल चर्चा केली आहे.

औरंगजेबाची धर्मांधता

‘बनारस इलस्ट्रेटेड’ मध्ये, प्रिन्सेप यांनी औरंगजेबाच्या माणसांनी ज्ञानवापी मशीद बांधण्यासाठी नष्ट झालेल्या काशी विश्वेश्वर मंदिरातील साहित्य कसे वापरले याचे तपशील दिले आहेत. प्रिन्सेप यांनी नमूद केल्याप्रमाणे “औरंगजेबाच्या कट्टरतेमुळे प्राचीन शैलीतील अनेक अवशेष त्याने टिकू दिले नाहीत आणि करवसुलीच्या क्षुल्लक कारणाच्या आड प्राचीन शिवालय उध्वस्त करण्याची संधी त्याने घेतली.किंबहुना नवीन मशीद बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या नावाखाली जुन्याच मंदिराच्या अवशेषांचा वापर करून नवीन बांधकाम करण्यात आले, इतकेच नाही तर नवीन बांधकामात हिंदू धर्माला अपमानित करण्यासाठी जुन्या मंदिराच्या भिंती दिसतील अशाप्रकारे ठेवल्या”.
अशीच पद्धत बाबरी मशिदीतही वापरण्यात आली होती. बाबरी मशीद १२ व्या शतकातील हिंदू मंदिराच्या अवशेषांवर उभी करण्यात आली होती. १५२८ मध्ये बाबरचा सेनापती मीर बाकी याने ही मशीद बांधली होती. बाबर हा भारतातील पहिला मुघल शासक होता, तर औरंगजेब हा त्या घराण्यातील शेवटचा राजा होता.

अधिक वाचा: Sharad Pawar त्यामुळेच कर्करोगही हादरवू शकला नाही- असं शरद पवार का म्हणतात?

प्रिन्सेप यांचा नकाशा

प्रिन्सेप यांनी काशी विश्वेश्वर मंदिराची जुनी रचना उघडकीस आणली आणि त्यावर औरंगजेबाने बांधलेली मशीद कशी उभी राहिली याचा नकाशा काढून त्यावर खूण केली. प्रिन्सेप यांनी ‘बनारस इलस्ट्रेटेड’ या पुस्तकात जुन्या विश्वेश्वर मंदिराचा नकाशा नेमका कसा काढला याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे, ‘पुरातन वास्तू विश्लेषकांना हे जाणून आनंद होईल की मुस्लिमांनी, त्यांच्या स्वतःच्या धर्माच्या विजयाच्या आवेशात, मूळ संरचना पूर्ण नष्ट न करता, त्याच वास्तूला मशिदीत कसे परिवर्तित करावे ही पद्धत शोधून काढली, त्यामुळे मूळ वास्तूचा ढाचा तसाच अबाधित राहिला, त्यावरूनच मूळ रचनेची, मूळ वास्तूच्या उंचीची कल्पना येते. बनारस इलस्ट्रेटेडच्या ‘प्लॅन ऑफ द ओल्ड विश्वेश्वर टेम्पल’ या अध्यायात, प्रिन्सेप यांनी नकाशा दिला केला आहे, या नकाशातील रचनेनुसार जुन्या काशी विश्वेश्वर मंदिरात आठ मंडप होते आणि मध्यभागी असलेल्या मंडपाचा उल्लेख प्रिन्सेप यांनी ‘महादेव’ असा केला आहे. प्रिन्सेप यांच्या नकाशातील गडद छायांकित केलेला भाग मुख्य देवळाची आकृती आणि पाया दर्शवितो, तर फिकट रंग देवळाचा बाह्य भाग दर्शवितो.

ज्ञानवापी मधील लिंगाविषयी प्रिन्सेप काय नमूद करतात?

जेम्स प्रिन्सेप त्यांच्या ‘बनारस इलस्ट्रेटेड’ मध्ये लिहितात, “महादेवाच्या मुख्य शिवलिंगाच्या खाली एक जलाशय होते ज्यामुळे गंगेच्या पाण्याचा अभिषेक रात्रंदिवस शिवलिंगावर होत होते. प्रिन्सेप यांनी मंदिराच्या मध्यभागी विश्वेश्वर किंवा महादेवाचे स्थान दाखवले आहे. त्यामुळे शिवलिंग ज्या जलाशयात होते, तेच ज्ञानव्यापी मशिदीतील वझुखानामधील तथाकथित कारंजे असू शकते असे राष्ट्रीय संग्रहालयाचे महासंचालक बी.आर. मणी यांनी ‘इंडिया टुडे डॉट इन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तसेच या विषयावर आणखी संशोधनाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०२२ मध्ये ज्ञानवापी मशिदीचा वझुखाना किंवा स्नान क्षेत्र सील करण्यात आले. हिंदू पक्षकारांच्या म्हणण्यानुसार, वझुखानामधील कारंज्यासारखी रचना ही एक “शिवलिंग” किंवा “लिंगम” आहे. हेच प्रिन्सेप यांनी त्यांच्या १८३१ च्या पुस्तकात सुचवलेले दिसते.