Who is Dr Shaheen Shahid Role in Delhi Blast Case : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून जळपास २४ जण जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही, पण डॉक्टरांच्या एका मॉड्यूलने या स्फोटाचा कट रचल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाहीन शाहीद नावाच्या महिला डॉक्टरला अटक केली आहे. तिच्या कारमधून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. अटकेनंतर डॉक्टर शाहीनचे महाराष्ट्राशीदेखील कनेक्शन असल्याचे समोर आले आहे, त्याविषयीचा हा आढावा…
कोण आहे डॉक्टर शाहीन शाहीद?
- डॉक्टर शाहीन ही उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील लालबाग परिसरातील रहिवासी आहे.
- फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाशी ती कथितपणे जोडलेली आहे.
- याच विद्यापीठात अटक झालेला काश्मिरी डॉ. मुझम्मिल अहमद गनाई प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
- डॉक्टर शाहीन आणि मुझम्मिल गनाई यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचे सांगितले जात आहे.
- डॉ. शाहीनवर जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कमध्ये सामील असल्याचा आरोप आहे.
- तिचा संबंध जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत-उल हिंद यांसारख्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशी जोडला जात आहे.
- डॉ. शाहीनने भारतात ‘जमात-उल-मोमिनात’ नावाची महिलांची संघटना स्थापन केल्याचे सांगितले जात आहे.
- ही संघटना जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा मानली जाते आणि तिचे नेतृत्व दहशतवादी मसूद अझहरची बहीण सादिया अझहर करत आहे.
- सादियाचा पती युसूफ हा कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील सूत्रधार होता. भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये तो मारला गेला आहे.
- जैश-ए-मोहम्मदचे फरिदाबाद मॉड्यूल उद्ध्वस्त केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर शाहीन शाहीदला अटक केली आहे.
- डॉक्टरांच्या या मॉड्यूलकडे अनेक राज्यांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे काम सोपण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
- तपासादरम्यान पोलिसांनी डॉक्टर शाहीनच्या कारमधून एके ४७ रायफल, एक पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि इतर स्फोटक साहित्य जप्त केले आहे.
- अटकेनंतर डॉ. शाहीनला विमानाने श्रीनगरला नेले जात आहे. तिथे चौकशीसाठी तिला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
- पोलिसांकडून शाहीनच्या बँक व्यवहारांची आणि संदेशांची तपासणी करून दहशतवादी नेटवर्कशी असलेले तिचे संबंध शोधले जात आहे.
डॉक्टर शाहीनची दहशतवादी पार्श्वभूमी?
शाहीन शाहीद ही सामान्य डॉक्टर नसून कानपूरमधील एका वैद्यकीय महाविद्यालयातील माजी प्राध्यापक आहे. भारतात महिला दहशतवादी ब्रिगेड तयार करण्याची तिची योजना असल्याचे पोलिसांच्या प्राथामिक तपासातून समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरणानंतर उत्तर प्रदेश एटीएसने लखनऊ पोलिसांच्या मदतीने शाहीनच्या भावाच्या फरिदाबादमधील घरावर छापा टाकला होता. तिचा भाऊ डॉ. परवेज अन्सारी हा फरिदाबाद येथील इंटिग्रल विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहे. शाहीन आणि परवेज हे दोघेही सईद अन्सारी यांची मुले आहेत.
डॉक्टर शाहीनचे महाराष्ट्र कनेक्शन
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. शाहीनची पब्लिक सर्व्हिस कमिशनमार्फत निवड झाली होती. सुरुवातीला तिने कानपूरमधील गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. मात्र, २०१३ पासून ती कोणतीही पूर्वसूचना न देता महाविद्यालयात गैरहजर राहू लागली. २०१५ मध्ये तिने महाराष्ट्रातील जफर नावाच्या एका तरुणाबरोबर निकाह केला होता. मात्र, दोन वर्षांतच तिचा घटस्फोट झाला, अशी माहिती पोलिसांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली. २०२१ मध्ये कानपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने तिला सेवेतून काढून टाकले होते. घटस्फोटापूर्वी काही काळ शाहीन महाराष्ट्रात वास्तव्यास होती अशी माहितीही समोर आली आहे, त्यामुळे आता पोलिसांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र एटीएस ॲक्शन मोडवर
दिल्लीतील कार स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसचे अधिकारीही सतर्क झाले असून अनेक संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. डॉक्टर शाहीन महाराष्ट्रात नेमकी कुणाच्या संपर्कात होती का याची चौकशी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एटीएसने आज पहाटे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील कौसा विभाग येथील एका शिक्षकाच्या घरावर छापा टाकून शोध मोहीम राबवली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे एटीएसने ताब्यात घेतलेल्या आरोपींनी मुंब्रा येथील या शिक्षकाशी ओळख असल्याचा दावा केला होता. एटीएस पथकाने शिक्षकाच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि संगणकाचे इतर साहित्य जप्त केले आहे.
आतापर्यंत आठ जणांना अटक
दिल्ली कार स्फोट प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमधील एकूण आठ जणांना अटक केली आहे, त्यापैकी सात जण काश्मीरमधील असल्याची माहिती आहे. या प्रकरणात अटकेत असलेला डॉ. मुझम्मिल शकील ऊर्फ मुसैब हा पुलवामा येथील कोइल येथील रहिवासी आहे; तर दुसरा डॉक्टर आदिल राथेर हा कुलगाम येथील वालपोरा येथील रहिवासी असून तो अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात तैनात होता. पोलिसांनी लखनऊ येथील रहिवासी असलेल्या शाहीन शाहीद या महिला डॉक्टरलाही अटक केली आहे. अजून इतर संशयित आरोपींची माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा : Donald Trump Tariff : भारतावरील टॅरिफ होणार रद्द? डोनाल्ड ट्रम्प कशामुळे नरमले? अमेरिकेत काय घडतंय?
स्फोटाचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही, मोदींचा इशारा
या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्फोटानंतर राष्ट्रीय राजधानी आणि देशाच्या इतर भागांमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काही तासांतच हा निर्णय घेण्यात आला. शाह यांनी मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा सुरक्षा आढावा बैठक बोलावली आहे. एनआयएला फक्त दहशतवादी प्रकरणांचीच चौकशी करण्याचे अधिकार असल्याने केंद्र सरकार या प्रकरणाकडे दहशतवादी कृत्य म्हणून पहात आहे. तपास यंत्रणा या स्फोटाची चौकशी करीत असून त्या घटनेच्या मुळापर्यंत जातील असे अमित शाह यांनी म्हटले आहे. दुसरीकडे भूतानच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली स्फोटावर आपली प्रतिक्रिया दिली. ‘या स्फोटाचा कट रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही, सर्व जबाबदार व्यक्तींना कडक शिक्षा होईल,’ अशा इशारा पंतप्रधानांनी दिला आहे.
