विश्लेषण: चंदीगढमध्ये जन्म, डोनाल्ड ट्रम्पच्या वकील; हरमीत ढिल्लों रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदी पराभूत का झाल्या? | Who is Harmeet Dhillon the Chandigarh born lawyer who loses the US Republican Party presidential election | Loksatta

विश्लेषण: कोण आहेत चंदीगढच्या हरमीत ढिल्लों? ज्या अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या

रिपब्लिकन राष्ट्रीय समिती (RNC – Republican National Committee) ही अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष चालवणारी मुख्य समिती आहे. या समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरमीत ढिल्लों पराभूत झाल्या.

indian american harmeet dhillon
भारतात जन्मलेल्या आणि रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या हरमीत ढिल्लों

अमेरिकेमधील रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण करणारी मुख्य समिती म्हणून रिपब्लिकन राष्ट्रीय समितीकडे (RNC – Republican National Committee) पाहिले जाते. या समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणूकीत दोन मोठे नेते उभे राहिले होते. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पक्षात एकता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान रिपब्लिकन्स समोर आहे. पक्षाध्यक्ष पदाच्या शर्यतीत भारतात जन्मलेल्या आणि एकेकाळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकील असलेल्या हरमीत ढिल्लों आणि आरएनसीच्या वर्तमान अध्यक्षा रोना मॅकडॅनियल उभ्या होत्या. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत रोना मॅकडॅनियल या विजया झाल्या आहेत. तर भारतीय वंशाच्या हरमीत ढिल्लों यांचा पराभव झाला. मी शीख असल्यामुळे मला त्रास दिला जात असल्याचा आरोप मध्यंतरी त्यांनी केला होता. त्यानंतर अमेरिकेसहीत जगाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते.

रिपब्लिकन पक्षाच्या आरएनसी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाद्वारे होते. शुक्रवारी झालेल्या मतदानात मॅकडॅनियल यांना १११ तर ढिल्लों यांना ५१ मतं मिळाली. मॅकडॅनियल यांच्याकडे दोन वर्षांसाठी अध्यक्षपदाची जबाबदारी असेल. या निवडणुकीमुळे रिपब्लिकन्समध्ये फूट पडल्याचे चित्र दिसले आहे, ज्याचे परिणाम २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निडणुकीत दिसू लागतील, अशी शक्यता आहे. दक्षिण कॅलिफॉर्नियाच्या एका रिसॉर्टमध्ये ही निवडणूक पार पडली. ज्याच्यासाठी ५० प्रांतामधून १६८ पदाधिकारी एकत्र आले होते.

कोण आहेत हरमीत ढिल्लों

ढिल्लों यांचा जन्म भारतात चंदीगढ येथे झाला होता. त्या लहान असतानाच त्यांचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांचे वडील ऑर्थोपेडिक सर्जन होते, अमेरिकेत कायमचे स्थायिक होण्याआधी ते लंडन येथे काम करत होते. २०१३ साली सॅन फ्रॅन्सिस्को क्रोनिकलला मुलाखत देताना त्यांनी आपल्या भूतकाळाबाबत सांगितले होते. लग्न झाल्यानंतर माझ्या पतीने मला एकदा मरेपर्यंत मारले होते. शेवटी नवऱ्याला सोडून त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया स्कूल ऑफ लॉ मध्ये प्रवेश घेतला आणि वकीलीचे शिक्षण पूर्ण केले. आता त्या सर्वजीत रंधावा यांच्यासोबत विवाहबद्ध झालेल्या आहेत.

आपल्या वकीली पेशाच्या कारकिर्दीत ढिल्लों यांनी अनेक महत्त्वाचे खटले लढवले. अनुचित व्यवहार, गुप्त व्यापार, बौद्धिक संपदा, रोजगारातील भेदभाव, आणि नागरी हक्कांशी संबंधित अनेक प्रकरणे त्यांनी हाताळली. यासोबतच त्यांनी निवडणूक आणि प्रचारासंबंधी प्रकरणेही पाहिली आहेत. २००६ साली त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली. एका आंदोलना दरम्यान पोलिस ट्रम्प समर्थकांचे सरंक्षण करु शकली नाही, असा खटला ढिल्लों यांनी समर्थकांच्यावतीने दाखल केला होता.

आरएनसीच्या अध्यक्षाच्या जबाबदार काय असतात

द वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार, आरएनसीच्या अध्यक्षांची दोन महत्त्वाची कार्ये असतात. पहिले, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करणे आणि आरएनसीच्या दोन वार्षिक बैठका आयोजित करणे. तसेच पक्षासाठी निधी गोळा करणे हे देखील अध्यक्षाचे आणखी एक महत्त्वाचे काम आहे.

आरएनसीचे एकूण १६८ सभासद आहेत. प्रत्येक प्रांतातून तीन सदस्य आरएनसीमध्ये असतात. या तीघांपैकी एक प्रांताध्यक्ष असतो (महिला किंवा पुरुष) आणि एक पुरुष राष्ट्रीय समिती सदस्य आणि एक महिला सदस्य असते. आरएनसीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी निवडणुकीत बहुमत आवश्यक असते. जोपर्यंत बहुमत मिळत नाही, तोपर्यंत मतदानाच्या अनेक फेऱ्या घेण्याची तरतूद रिपब्लिकन्सच्या घटनेत आहे. आता निवडून आलेल्या अध्यक्ष मॅकडॅनियल या २०२४ साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार असतील, असे सांगितले जात आहे.

ढिल्लों यांची मॅकडॅनियल टीका

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ढिल्लों यांनी मॅकडॅनियल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मॅकडॅनियल या धार्मिक कट्टरतावादी आहेत, त्यांना आर्थिक नियोजन जमत नाही, तसेच ट्रम्प त्यांना नियंत्रित करु शकतात, असे आरोप ढिल्लों यांनी केले होते. ढिल्लों यांना रिपब्लिकन पक्षाची विचारधारा बदलायची होती. त्या म्हणाल्या की, पक्षाचे नेतृत्व हे विशेषतः गोऱ्या पुरुष नेत्यांच्या ताब्यात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 22:59 IST
Next Story
विश्लेषण : जगातली पहिली नाकावाटे घेतली जाणारी करोना प्रतिबंधक लस भारतात, काय आहे किंमत? कोण घेऊ शकणार?