पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बांधण्यात येत असलेल्या ग्वादर बंदरावर बुधवारी हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे दोन सैनिक ठार झाले असून, प्रत्युत्तरादाखल ८ हल्लेखोरही मारले गेलेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या माजीद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या ब्रिगेडच्या स्थापनेचाही इतिहास रंजक आहे. २०११ मध्ये बलूच लिबरेशन आर्मीची स्थापना झाली होती. माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना मारल्या गेलेल्या रक्षक माजीद नावाने बलूच लिबरेशन आर्मी तयार करण्यात आली होती. पाकिस्तानी तज्ज्ञांच्या मते या संघटनेचे अफगाणिस्तानातही अस्तित्व आहे.

इतकेच नाही तर या संघटनेने पाकिस्तान आणि इराणच्या सीमेवरही आपले तळ उभारल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. या लोकांना इराणच्या सीमावर्ती बलूच भागातही प्रवेश मिळत आहे. या भागातही बलूच संस्कृतीचा प्रभाव आहे आणि तेथे मोठ्या प्रमाणात बलूच लोक स्थायिक आहेत. माजीद ब्रिगेड हे बलूच लिबरेशन आर्मीचे आत्मघाती पथक मानले जाते. विशेषत: पाकिस्तानमधील चीनचा हात असलेल्या बांधकामावरही त्यांनी हल्ले चढवले आहेत. यापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये याच संघटनेने कराची विद्यापीठाच्या कन्फ्यूशियस संस्थेवर हल्ला केला होता. हा देखील आत्मघातकी हल्ला होता.

२०२२ मध्ये माजीद ब्रिगेडने नौष्की आणि पंजगूर जिल्ह्यात हल्ले केले होते. यावेळी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी शस्त्र हाती घेत २० हून अधिक हल्लेखोरांना मारले होते. याशिवाय पाक सुरक्षा दलाचे ९ सैनिक मारले गेले. पाकिस्तान बेकायदेशीरपणे बलुचिस्तानमधील संसाधनांवर कब्जा करीत आहे आणि त्याचा फायदा त्यांना मिळू शकत नाही, असाही बलुचिस्तानमधील मोठ्या लोकसंख्येचा विश्वास आहे. चीनच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येत असलेल्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरची सुरुवातही तिथूनच होत आहे. ग्वादर बंदरही याच कॉरिडॉरचा एक भाग आहे. याआधीही हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत. यंदा जानेवारी महिन्यात या संघटनेने बलुचिस्तानच्या माच शहरात रॉकेट आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला होता. या काळात ४ सुरक्षा कर्मचारी आणि २ नागरिकांचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले झपाट्याने वाढले आहेत. या हल्ल्यांमध्ये तालिबान, बलूच लिबरेशन आर्मी यांसारख्या संघटनांचा हात आहे.

ग्वादर हल्ला करणारे मजीद ब्रिगेड अन् बलूच अतिरेकी कोण?

खरं तर बीएलएने पाकिस्तानचे २५ सुरक्षा सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील अनेक फुटीरतावादी गटांपैकी BLA हा सर्वात प्रमुख गट आहे. बलूच लिबरेशन आर्मीचे मजीद ब्रिगेड २०११ पासून सक्रिय आहे. बीएलएचे हे एक आत्मघातकी पथक आहे. या युनिटचे नाव दोन भावांच्या नावावर आहे, ज्यांना माजीद लांगोवे असे म्हणतात. ही त्यांची कहाणी आहे. पाकिस्तानच्या नैऋत्येकडील बलुचिस्तान हा देशातील सर्वात मोठा आणि विरळ लोकसंख्या असलेला प्रांत आहे. तिकडे तेलाचे साठे आणि विपुल नैसर्गिक संसाधने आहेत, परंतु बलूच जातीचे लोक हे पाकिस्तानचे सर्वात गरीब आणि सर्वात कमी प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत. ब्रिटिशांच्या छत्रछायेखाली असलेले बलुचिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेले. कलातचा प्रमुख अहमद यार खान हा या आदिवासी बलुचिस्तानमधील प्रमुखांपैकी सर्वात शक्तिशाली शासक होता, त्याला आपल्या लोकांसाठी स्वतंत्र राज्य हवे होते. परंतु पाकिस्तानने कलातवर आक्रमण केल्यानंतर १९४८ मध्ये त्यांना पाकिस्तानमध्ये सामील व्हावे लागले. तेव्हापासून इथे एक बंडखोरी सुरू झाली, जी अद्यापही सातत्याने सुरू आहे. त्यामुळेच या प्रदेशात नेहमीच असंतोष असतो, राजकीय दबाव आणि पाकिस्तानद्वारे राज्यांमध्ये चालवल्या जाणाऱ्या दडपशाहीमुळे इथे बंडखोरीला चालना मिळत आहे. खरं तर चीन बांधत असलेले ग्वादर बंदर हे बलूच लोकांवर होत असलेल्या आर्थिक अन्यायाचे प्रतीक आहे. प्रांतात प्रचंड बेरोजगारी असूनही, पंजाब, सिंध आणि अगदी चीनमधून अभियंते आणि तांत्रिक तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली होती. अलिकडच्या वर्षांत बलूच हल्लेखोरांनी देशातील ग्वादर आणि चिनी नागरिकांना वारंवार लक्ष्य केले आहे.

हेही वाचाः एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर! आयपीएलमध्ये यंदा तुफानी फटकेबाजीला ब्रेक लागेल?

मे १९७२ मध्ये बलुचिस्तानमध्ये नॅशनल अवामी पार्टी (NAP) सत्तेवर आली. राष्ट्रीय पातळीवर NAP हा पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) च्या विरोधात होता. NAP ने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रादेशिक स्वायत्ततेसाठी दीर्घकाळ वकिली केली होती आणि १९७१ मध्ये बांगलादेशमधील अस्थिरतेच्या वातावरणामुळे त्याला हवा मिळाली. भारताकडून पाकिस्तानच्या पराभवाने अपमानित झालेले भुट्टो पाकिस्तानमधील इतर प्रांतांना कोणत्याही मोठ्या सवलती देण्यास तयार नव्हते. प्रांतीय सरकारमधील NAP च्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासून भुट्टो यांनी आपले वजन वापरून बलुचिस्तानचे राज्यपाल आणि नोकरशाहीचे कार्यालय वापरून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अधिक कट्टर बलूच राष्ट्रवादी नेत्यांनी बंडखोरी सुरू केली, ज्यामुळे प्रांतात कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली.

बंडखोरांसाठी असलेल्या शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्यानंतर भुट्टो यांनी फेब्रुवारी १९७३ मध्ये एनएपी सरकार बरखास्त केले. यामुळे बलुचिस्तानमध्ये बंडखोरी आणि पाकिस्तानकडून राज्यांवर होत असलेली दडपशाही या दोन्ही गोष्टींनी गंभीर स्वरूप धारण केले. १९७३ ते १९७७ दरम्यान लढाईत हजारो सैनिक आणि लष्करी कर्मचारी मारले गेले आणि पाकिस्तानी सैन्याने बलूच लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केल्याच्या बातम्या आल्या. त्याच वेळी मजीद लांगोवे सीनियर या तत्कालीन बलूच तरुणाने भुत्तो यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. २ ऑगस्ट १९७४ रोजी भुट्टो एका सार्वजनिक मेळाव्यात सहभागी होण्यासाठी क्वेट्टा येथे आले तेव्हा मजीद एका उंच झाडावर बसून होता आणि त्याच्या हातात ग्रेनेड होते. त्याच्याकडे पळून जाण्याची कोणतीही योजना नव्हती आणि भुट्टो यांना मारण्याच्या प्रयत्नात त्याला त्याचा जीव गमवावा लागणार होता. भुत्तो यांच्या मोटार गाडीची वाट पाहत असतानाच मजीदच्या हातातच ग्रेनेड फुटला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचाः विश्लेषण : एके काळी उत्तर-दक्षिण भारत जोडणारा अकोला-खंडवा सुधारित रेल्‍वेमार्ग का रखडला?

माजीद सीनियरचा मृत्यू आणि त्याच्या धाकटा भाऊ माजीद लांगोवे ज्युनियरच्या कृतीमुळे वंशजांसाठी ती एक पौराणिक कथा झाली आहे, ज्याचा जन्म सीनियरच्या हत्येनंतर दोन वर्षांनी झाला होता. १७ मार्च २०१० रोजी पाकिस्तानी सैन्याने क्वेट्टा येथे अनेक बलूच अतिरेक्यांच्या निवासस्थानाच्या घराला वेढा घातला. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याशी ज्युनियरने लढा देण्याचे ठरवले आणि त्याच्या साथीदारांना बाहेर पडण्यासाठी वेळ दिला. तासाभराच्या प्रतिकारानंतर ज्युनियरने पाकिस्तानी सैन्याने ठार केले.

माजीद ज्युनियरच्या मृत्यूवर बलुचिस्तानातील राष्ट्रवाद्यांनी शोक व्यक्त केला. माजीद सीनियरनंतर धाकटा भाऊ मजीद ज्युनिअरही सगळीकडे प्रसिद्ध झाला, ज्याने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी आपला जीवही दिला होता, त्यामुळेच माजीद लांगोवे बंधूंना जवळ जवळ पौराणिक दर्जा मिळाला. अस्लम अचू या बीएलए नेत्याने आत्मघातकी पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यासाठी ‘मजीद’ हे नाव निवडण्यात आले. मजीद ब्रिगेडने ३० डिसेंबर २०११ रोजी पहिला आत्मघाती हल्ला केला, ज्यात पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले. या हल्ल्यात किमान १४ लोक ठार झाले आणि इतर ३५ जखमी झाले.

प्रदीर्घ विश्रांतीनंतर २०१८ मध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळील दालबंदिनमध्ये चिनी अभियंत्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला करून हा गट पुन्हा सक्रिय झाला. अस्लम अचू यांचा २२ वर्षीय मुलगा रेहान अस्लम बलोच याने हा हल्ला केला होता. मजीद ब्रिगेडने कराचीतील चिनी वाणिज्य दूतावास (२०१८), ग्वादर पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेल (२०१९) आणि पाकिस्तान स्टॉक एक्स्चवरही हल्ला केला आहे.