Who is Maya Handa Zohran Mamdani Campaign Manager : डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पक्षाचे उमेदवार झोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक जिंकून इतिहास घडवला. त्यांच्या पराभवासाठी खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मैदानात उतरले होते. ममदानी निवडून आल्यास न्यूयॉर्कला ‘आर्थिक व सामाजिक आपत्ती क्षेत्र’ घोषित करण्यात येईल अशी धमकीही त्यांनी दिली होती, त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ अमेरिकाच नव्हे तर साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. ट्रम्प यांच्या धमकीनंतरही न्यूयॉर्कवासीयांनी ममदानी यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ घातली. दरम्यान, ममदानी यांच्या विजयानंतर न्यूयॉर्क शहरात माया हांडा यांचीच चर्चा रंगली आहे. नेमके काय आहे त्यामागचे कारण? जाणून घेऊ…

कोण आहेत माया हांडा?

झोहरान ममदानी हे न्यूयॉर्कचे पहिले भारतीय वंशाचे आणि मुस्लीम महापौर ठरले आहेत. ममदानी यांच्या या अभूतपूर्व यशात त्यांच्या प्रचार व्यवस्थापक माया हांडा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकेतील निवडणुकीच्या मोहिमा हाताळण्यासाठी माया हांडा ओळखल्या जातात. जुलैमध्ये ममदानी यांच्या प्रचार व्यवस्थापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ममदानी यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळण्यापूर्वी हांडा यांनी झेलनॉर मायरी यांच्या महापौरपदाच्या प्राथमिक निवडणुकीतील प्रचार मोहिमेचे नेतृत्व केले होते. मात्र, या निवडणुकीत मायरी यांचा पराभव झाला होता. सीएनएनच्या वृत्तानुसार माया हांडा यांनी यापूर्वी न्यूयॉर्कच्या माजी नेत्या जमाल बोमन आणि मॅसॅच्युसेट्सच्या सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळलेली आहे.

जुलैमध्ये ममदानींच्या प्रचाराची जबाबदारी

न्यूयॉर्कच्या स्थानिक राजकारणातील प्रमुख पार्टी असलेल्या ‘वर्किंग फॅमिलीज पार्टी’बरोबरही माया हांडा यांनी काम केलेले आहे. जुलैमध्ये माया हांडा यांनी ममदानी यांच्या राज्य विधानसभा कार्यालयातील प्रमुख कर्मचारी तसेच त्यांच्या प्राथमिक प्रचार मोहिमेच्या व्यवस्थापक एले बिस्गार्ड-चर्च यांची जागा घेतली. त्या आता ममदानींच्या मुख्य सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. जुलैमध्ये बिस्गार्ड-चर्च सीएनएनशी बोलताना म्हणाल्या होत्या की, प्राथमिक निवडणुकीत राबवलेल्या ऐतिहासिक मोहिमेबद्दल मला अत्यंत अभिमान आहे. आता आमचे लक्ष्य झोहरान ममदानी यांची न्यूयॉर्कच्या पुढील महापौरपदी निवड निश्चित करणे आहे. या नव्या भूमिकेत काम करताना भविष्याची दिशा अधिक मजबूत करण्यास मी उत्सुक आहे.

आणखी वाचा : पाकिस्तानने हिंदू यात्रेकरूंना सीमेवरच रोखलं; वाघा बॉर्डरवर काय घडलं? भाविकांनी सांगितला घटनाक्रम!

ममदानींच्या प्रचारात बॉलीवूडचा वापर

झोहरान ममदानी यांच्या निर्णायक विजयाचे श्रेय त्यांच्या प्रबळ डिजिटल प्रचार मोहिमेला दिले जात आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे तरुण नेते म्हणून ममदानी यांनी आपल्या डिजिटल कौशल्याच्या जोरावर व्यापक जनसंपर्क साधला आहे, त्यामुळेच त्यांना न्यूयॉर्कमधील मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. ममदानी यांच्या प्रचार मोहिमेत दक्षिण आशियाई मुळांचा ठसा स्पष्टपणे दिसून आला. त्यांचे वडील महमूद ममदानी युगांडात शिक्षणतज्ज्ञ असून आई मीरा नायर भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत.

Maya Handa political strategist
झोहरान ममदानी यांच्या या अभूतपूर्व यशात त्यांच्या प्रचार व्यवस्थापक माया हांडा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (Photo : LinkedIn)

माया हांडा यांनी कशी सांभाळली जबाबदारी

ममदानी यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी बॉलीवूडमधील काही चित्रपटांमधील चित्रणांचा प्रभावी वापर केला. माया हांडा यांनी ममदानी यांच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारताना समाजमाध्यमांवर हिंदी भाषेतील व्हिडीओ संदेश शेअर केले, ज्यामध्ये लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांमधील मजेदार प्रतिमा आणि संवादांचा वापर केला गेला होता. त्यांच्या या डिजिटल दृष्टिकोनामुळे ममदानी यांना तरुण मतदारांचा जबरदस्त पाठिंबा मिळाला आणि त्यांनी स्पर्धेत विजयाची घोडदौड कायम ठेवली. निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात ममदानी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा संदर्भ देणे हादेखील याच मोहिमेचा भाग असल्याचे सांगितले जाते. ममदानींच्या विजयानंतर न्यूयॉर्कमध्ये माया हांडा यांचीच चर्चा होताना दिसून येत आहे.

हेही वाचा : Shah Bano case: शहाबानो प्रकरणात काँग्रेसचा निर्णय ठरला BJP साठी वरदान; ‘हक’ चित्रपटामुळे पुन्हा प्रकरण चर्चेत!

विजयानंतर वाजले धूम चित्रपटातील गाणे

मूळ भारतीय वंशाचे असलेल्या झोहरान ममदानी यांनी निवडणुकीच्या प्रचारात आणि निवडून झाल्यानंतरही हिंदी चित्रपटांतील गाण्यांचा खुबीने वापर केला. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर केलेल्या भाषणाच्या अखेरीस व्यासपीठावर २००४ च्या ‘धूम’ चित्रपटातील ‘धूम मचा ले…’ हे गाणे वाजत होते. हे गाणे वाजत असताना ममदानी हात उंचावून अभिवादन करत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. न्यूयॉर्कच्या भारतीय वंशाच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराच्या अनेक चित्रफितींमध्ये ममदानी यांनी हिंदी चित्रपटातील गाणी, संवादाचा वापर केला आहे. ‘दीवार’, ‘कर्ज’, ‘ओम् शांती ओम्’ या चित्रपटांतील गाणी, संवादाच्या चित्रफिती मतदारांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.

जवाहरलाल नेहरूंचा केला उल्लेख

महापौरपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर झोहरान ममदानी यांनी केलेल्या भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यानंतर केलेल्या भाषणामधील संदर्भाचा उल्लेख केला. भ्रष्टाचाराचे निर्मूलन, समानतेकडे वाटचाल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.‘न्यूयॉर्कच्या नागरिकांनी अशक्यही शक्य होईल, अशी आशा ठेवल्याने आपण जिंकलो आहोत. आपल्याबरोबर राजकारण ज्या पद्धतीने केले जात आहे, तसे आता होणार नाही, याचा सातत्याने आपण आग्रह धरल्यामुळेही आपण विजयी झालो आहोत,’ असे ममदानी यांनी म्हटले.