Neha Singh Rathore दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच दहशतवादी हल्ल्यानंतर एका प्रसिद्ध गायिकेने केलेल्या सोशल मीडिया पोस्टनंतर तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यंगात्मक राजकीय गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या लोकप्रिय भोजपुरी गायिका नेहा सिंह राठोड विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर तिने केलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टनंतर तिच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? कोण आहे नेहा सिंह राठोड? त्याविषयी जाणून घेऊ.
प्रकरण काय?
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊमधील अभय प्रताप सिंह यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गायिका नेहा सिंह राठोडविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. नेहा सिंह राठोड यांच्यावर देशविरोधी विधाने केल्याचा आणि जातीय तणाव निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत गायिकेने केलेल्या पहलगाम हल्ल्याच्या तिच्या पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे आणि ही पोस्ट लोकांच्या भावना भडकवणारी आणि देशाच्या एकतेला हानी पोहोचवणारी असल्याचे म्हटले आहे.

तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमांखाली गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सांप्रदायिक द्वेष वाढवणे, सार्वजनिक शांतता बिघडवणे आणि भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गतदेखील आरोप करण्यात आले आहेत.
कोण आहे नेहा सिंह राठोड?
नेहा सिंह राठोड हिचा जन्म १९९७ मध्ये बिहारमधील जनदहा येथे झाला. नेहा सिंह राठोड ही एक राजकीय व्यंगचित्रकार आणि लोक गायिका आहे. तिला भोजपुरी गाण्यांसाठीदेखील ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत, सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. नेहा सिंह राठोड हिचे ‘यूट्यूब’वर १.४५ दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, नेहा सिंह राठोडने २०१८ मध्ये कानपूर विद्यापीठातून बी.एससीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर लगेचच तिचा संगीत क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. तिने सुरुवातीला मोबाइल फोनवर भोजपुरी लोकगीते लिहिण्याची आणि गायनाची सुरुवात केली आणि त्याला फेसबुकवर अपलोड केले. हळूहळू तिची लोकप्रियता वाढत गेली. प्रसिद्ध भोजपुरी कवी भिखारी ठाकूर आणि महेंद्र मिसीर हे तिची प्रेरणा असल्याचे तिने सांगितले.
२०२० मध्ये नेहा सिंह राठोडने यूट्यूबवर तिचे चॅनेल सुरू केले आणि सामाजिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. तिने या गाण्यांमध्ये स्थलांतरित कामगारांवर कोविड लॉकडाऊनचा परिणाम, यांसारखे विषय मांडले. त्याच वर्षाच्या अखेरीस, तिच्या राजकीय व्यंगचित्राने सर्वांचे लक्ष वेधले. २०२१ पर्यंत तिच्या यूट्यूब चॅनेलने एक लाख सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडला. नेहा सिंह राठोडची ‘बिहार में का बा’ (२०२०), ‘यूपी में का बा?’ (२०२२), ‘यूपी में का बा? सेशन २’ (२०२३), आणि ‘एमपी में का बा?’ (२०२३) सारखी गाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड लोकप्रिय झाली. २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रदर्शित झालेले ‘बिहार में का बा’ हे गाणे बिहारच्या कामगारांशी संबंधित मुद्द्यांवर केंद्रित होते.
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले ‘यूपी में का बा?’ या गाण्यात उत्तर प्रदेशातील शासनव्यवस्थेवर टीका करण्यात आली होती. या गाण्यात कोविड-१९ काळातील संकट, लखीमपूर खेरी हिंसाचार आणि हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण यांसारख्या विषयांना हात घालण्यात आला होता. तिच्या ‘यूपी में का बा- सीझन २’ या गाण्यात कानपूर देहात येथे एका मोहिमेदरम्यान आई-मुलीच्या मृत्यूबद्दल राज्य सरकारवर टीका करण्यात आली होती.
या गाण्यावरून पोलिसांनी तिला नोटीसही बजावली होती. जुलै २०२३ मध्ये, मध्य प्रदेशातील लघुशंकेच्या एका घटनेशी संबंधित व्यंगचित्र पोस्ट केल्याबद्दल तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या काळात तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या घटनेत एका आदिवासी मजुरावर लघवी करणाऱ्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेवर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. राठोड यांनी राज्य विधानसभा निवडणुकीच्या काळात ‘एमपी में का बा?’ हे गाणे प्रदर्शित केले होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील तिची प्रतिक्रिया
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर २३ एप्रिल रोजी तिने केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर जाती आणि धर्मावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. तिने पुढे असे म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला, हा हल्ला गुप्तचर आणि सुरक्षेचे अपयश होता. एका व्हिडीओ संदेशात तिने सोशल मीडियावर म्हटले, “मी या सरकारला काय प्रश्न विचारू? शिक्षण आणि आरोग्याचे मुद्दे आता संबंधित नाहीत. लोक मारले जात आहेत आणि हिंदू-मुस्लीम तणाव शिगेला पोहोचला आहे.”
तिने भाजपावर पुलवामा हल्ल्याच्या नावाखाली मते गोळा केल्याचा आरोप केला. तिने आगामी बिहार निवडणुकीदरम्यान पहलगाम हल्ल्याच्या बाबतीतही असेच घडेल, असा आरोप केला. २६ एप्रिल रोजी तिने पुन्हा एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिने म्हटले, “मी हे पुन्हा सांगू इच्छिते की, जर पहलगामच्या मुद्द्यावर बिहारच्या निवडणुका लढवल्या गेल्या तर बिहारचे सामाजिक मुद्दे बाजूला पडतील.”