गुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिन आणि टेस्लाचे सह-संस्थापक इलॉन मस्क यांच्यांत मतभेद असल्याचं वृत्त समोर आलं आहे. जगातील सर्वात श्रीमंत दोन व्यक्तींच्या मतभेदाचं कारण सर्जी ब्रिन यांच्या पत्नी निकोल शानाहन असल्याचं बोललं जात आहे. निकोल शानाहन आणि इलॉन मस्क यांच्यात प्रेमसंबंध सुरू असल्याने मस्क आणि ब्रिन यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलं आहे.
पण इलॉन मस्क यांनी वॉल स्ट्रीटने केलेला दावा फेटाळून लावला असून संबंधित वृत्तात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. सर्जी ब्रिन आणि मी चांगले मित्र असून काल रात्रीच एका पार्टीत आम्ही दोघे एकत्र होतो, असं स्पष्टीकरण मस्क यांनी दिलं आहे. पण इलॉन मस्क आणि सर्जी ब्रिन यांच्या दुराव्याला कारण ठरलेल्या निकोल शानाहन नेमक्या आहेत तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला तर मग जाणून घेऊया…
निकोल शानाहन यांचं लग्न आणि घटस्फोट
निकोल शानाहन ह्या गुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिन यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या लग्नाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांना एक मुलगीदेखील आहे. पण जूनमध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे. आपसात मतभेद असल्याचं कारण त्यांनी दिलं आहे. सध्या त्यांच्यात घटस्फोटाच्या अटींबाबत वाटाघाटी सुरू आहेत. ज्यामध्ये निकोल यांनी पोटगी म्हणून १ बिलियन डॉलरपेक्षा अधिक रक्कम मागत असल्याचं वृत्त वॉल स्ट्रीटने दिलं आहे.
निकोल यांचं व्यावसायिक जीवन
निकोल शानाहन ह्या एक वकील आणि CodeX कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांची कंपनी लोकांना व्यवसायाचं पेटंट देण्याचं आणि बौद्धिक संपत्तीच्या अधिकाराचं व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करण्याचं काम करते.
शैक्षणिक पार्श्वभूमी
चिनी स्थलांतरित दाम्पत्याच्या पोटी निकोल यांचा जन्म झाला. त्यांची आई मोलकरीण म्हणून काम करत होती. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी वॉशिंग्टन येथील ‘पगेट साउंड’ विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. याठिकाणी त्यांनी अर्थशास्त्र, आशियाई आणि मँडरीन चायनीजचा अभ्यास केला. तसेच ‘सांता क्लारा’ विद्यापीठातून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे.
सामाजिक कार्य
२०१९ मध्ये शानाहन यांनी स्वतःची ‘Bia-Echo’ नावाची सामाजिक संस्था सुरू केली. या संस्थेला त्यांनी १०० मिलियन डॉलरची मदत करण्याचं वचनही दिलं आहे. ही संस्था महिलांना गरोदारपणात आणि बाळाला जन्म दिल्यानंतर येणाऱ्या अडचणींवर काम करते. ज्यामध्ये वैद्यकीय तंत्रज्ञानाचादेखील समावेश आहे. तसेच इतरही काही गुन्हेगारी घटनांमध्ये न्याय मिळवून देण्याचं कार्यही या संस्थेकडून केलं जातं.