Imran Khan Wife new party पाकिस्तानचे माजी पंतप्रधान दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी अनेकविध प्रयत्न सुरू आहेत; परंतु त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यातच आता त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने एका नवीन पक्षाची स्थापना केली आहे. पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, ज्यांची वेगवेगळी विचारसरणी आहे. त्यात पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन), इम्रान खान यांचा पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय), बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि इतर अनेक पक्षांचा समावेश आहे. आता या यादीत आणखी एका पक्षाची भर पडली आहे. पाकिस्तान रिपब्लिक पार्टी, असे या पक्षाचे नाव आहे. त्याची स्थापना पंतप्रधान इम्रान खान यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी रेहम खान यांनी केली आहे. त्यामुळे आता त्यांचा राजकारणात औपचारिक प्रवेश झाला आहे. रेहम खान कोण आहेत? त्यांच्याभोवतीचे वाद काय? त्यांनी स्थापन केलेल्या नवीन पक्षाची चर्चा का होत आहे? त्या पाकिस्तानमधील प्रमुख राजकीय पक्षांना आव्हान देऊ शकेल का? जाणून घेऊयात
रेहम खान कोण आहेत?
- २०१५ मध्ये रेहम खानने माजी क्रिकेटर व राजकारणी इम्रान खानशी लग्न केले. त्यानंतर रेहम खान या नावाची चर्चा होऊ लागली आणि ते नाव पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध झाले.
- इम्रान खानशी झालेले हे त्यांचे दुसरे लग्न होते. त्यापूर्वी त्यांनी इजाज रेहमान यांच्याशी लग्न केले होते, ते एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत. या जोडप्याने १९९३ मध्ये लग्न केले आणि २००५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती.
- इम्रान खानशी लग्न करण्यापूर्वी रेहम पत्रकार म्हणून काम करीत होत्या. त्यांनी बीबीसीसाठीदेखील काम केले.
- त्यांनी चित्रपट निर्मितीमध्येही पाऊल ठेवले आणि २०१६ मध्ये त्यांनी ‘जान’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट तयार केला.

जेव्हा रेहम यांनी इम्रान खान यांच्याशी लग्न केले, तेव्हा पाकिस्तानमध्ये बरीच चर्चा झाली. पेशावरमध्ये तालिबानने १३० हून अधिक शाळकरी मुलांची हत्या केल्यानंतर काही आठवड्यांनंतर इम्रान खान यांनी हे लग्न केल्याने त्यांच्यावर टीका झाली. रेहम खान एका ग्रामीण मेळ्यात डुकराच्या मांसासंबंधीच्या व्हिडीओमध्ये दिसली होती., त्यामुळेही वाद निर्माण झाला होता. खान यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लग्नाला नकार दिला आणि समारंभापासूनही ते दूर राहिले होते. त्यानंतर रेहम आणि इम्रान खान यांचे लग्न १० महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबर २०१५ मध्ये संपुष्टात आले.
२०१८ मध्ये रेहम यांनी इम्रान खान यांच्यावर त्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला. इम्रान यांनी बुशरा वट्टूशी लग्न केले आणि नंतर त्यांच्याशीदेखील इम्रान खान यांनी घटस्फोट घेतला. रेहम यांनी ‘द टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, क्रिकेटपटूपासून राजकारणी झालेल्या या व्यक्तीचे बुशरा यांच्याबरोबर दीर्घकाळ विवाहबाह्य संबंध होते. त्या म्हणाल्या, “तीन वर्षांपूर्वी म्हणजे मी त्यांची पत्नी असताना इम्रान खान बुशराच्या संपर्कात होते.” त्यानंतरच्या काळात रेहम यांनी पुन्हा लग्न केले. २०२२ मध्ये त्यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी अभिनेता व व्यंगचित्रकार मिर्झा बिलालशी लग्न केले.
रेहम खान यांच्या पाकिस्तान रिपब्लिक पार्टीची चर्चा का?
मंगळवारी (१५ जुलै) रेहम खान यांनी पाकिस्तानमध्ये नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. त्यांनी या पक्षाचे नाव पाकिस्तान रिपब्लिक पार्टी, असे ठेवले. कराची प्रेस क्लबमध्ये ही घोषणा करताना रेहम खान म्हणाल्या, “मी यापूर्वी कधीही राजकीय पदं स्वीकारली नाहीत. मी एकदा फक्त एका व्यक्तीसाठी पक्षात सामील झाले होते,” असे त्यांनी इम्रान खान यांच्याविषयी बोलताना म्हटले. त्यांच्या भाषणात रेहम म्हणाल्या की, त्यांचा पक्ष पाकिस्तान रिपब्लिक पार्टी हा लोकांचा आवाज असेल. त्या पुढे म्हणाल्या की, त्यांनी या पक्षाची स्थापना देशातील वाढत्या असंतोषामुळे केली आहे. “हा फक्त एक पक्ष नाही, तर राजकारणाला सेवेत रूपांतरित करण्याची एक चळवळ आहे,” असे त्या म्हणाल्या.
त्यांनी त्यांच्या नवीन पक्षाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या संघर्ष करणाऱ्या देशात सुधारणा घडवून आणण्याचा निश्चय केला. “२०१२ ते २०२५ पर्यंत मी पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये अजूनही पिण्याचे स्वच्छ पाणी आणि मूलभूत आरोग्य सेवेचा अभाव आहे. ते आता स्वीकारार्ह नाही,” असे त्या म्हणाल्या. रेहम यांनी पाकिस्तानच्या लोकांसाठी, विशेषतः महिला आणि शेतकऱ्यांसाठी सुधारणा घडवून आणण्याची शपथ घेतली आहे. रेहम यांनी जुन्या राजकीय पक्षांवर टीका केली आणि म्हटले, “आमच्या पक्षात कोणीही एकाच वेळी चार मतदारसंघांतून निवडणूक लढवणार नाही आणि आम्ही येथे राजकीय खेळ खेळण्यासाठी आलेलो नाही. मी इथे सर्व मोठ्या राजकीय लोकांना बदलण्यासाठी आली आहे,” असे त्या म्हणाल्या.
पाकिस्तानचे राजकारण बदलणार?
रेहम यांचा पक्ष राजकीय क्षेत्रात कसा कामगिरी करेल हे पाहणे अद्याप बाकी आहे; परंतु सध्या पाकिस्तानमध्ये आणखी एक पक्ष स्थापन झाल्याने पाकिस्तानच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो. सध्या देशाचे नेतृत्व पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज करीत आहे, त्यांनी पीपीपीशी युती केली आहे. दरम्यान, इम्रान खान यांचा पीटीआय हा पक्ष स्वतःचे प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. कारण- त्यांचा नेता तुरुंगात आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी पीटीआय ५ ऑगस्ट रोजी देशव्यापी निषेधाची योजनादेखील आखत आहे.
इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावर अनेक गुन्हेगारी खटले आहेत. पीटीआय नेते ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाद्वारे शेहबाज शरीफ सरकार आणि लष्करी स्थापनेवर दबाव वाढविण्याचे प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, पाकिस्तान ढासळत्या अर्थव्यवस्थेचा सामना करत आहे. लोकसंख्यावाढ आणि कमकुवत आर्थिक धोरण व्यवस्थापनामुळे गेल्या ५० वर्षांत पाकिस्तान दक्षिण आशियातील सर्वांत श्रीमंत अर्थव्यवस्थेवरून सर्वांत गरीब अर्थव्यवस्था झाला आहे. अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सरकारने सार्वजनिक कर्ज इतके वाढवले आहे की, त्या कर्जावरील व्याज आता सार्वजनिक महसुलाच्या जवळजवळ दोन- तृतीयांश आहे. या परिस्थितीत रेहम खान यांचा पक्ष परिस्थितीला मदत करेल की आणखी नुकसान करेल, हे येणाऱ्या काळातच कळेल.