Child sexual abuse charges Rustam Bhagvagar case सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका वैमानिकाला नाट्यमयरीत्या अटक करण्यात आली आहे. भारतीय वंशाचा डेल्टा एअरलाइन्सच्या सह-वैमानिकाला बाल लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान पोहोचल्यानंतर अवघ्या १० मिनिटांनी ही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या वैमानिकाचे नाव रुस्तम भगवागर असून, त्याचे वय ३४ वर्षे आहे. त्याला विमानातील कॉकपिटमधूनच फेडरल एजंट्सनी ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या अटकेमुळे प्रवासी आणि कर्मचारी सदस्य दोघेही थक्क झाले. विमान उतरताच घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे अनेकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. परंतु, नेमके काय घडले? कोण आहे रुस्तम भगवागर? त्याच्यावरील आरोप काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

विमानाच्या कॉकपिटमधून अटक

रुस्तम भगवागरविरोधात अनेक महिन्यांपासून खटला सुरू होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॉन्ट्रा कोस्टा काउंटी शेरीफच्या तपास विभागातील गुप्तहेर अधिकाऱ्यांनी बाल लैंगिक शोषणासंबंधीच्या एका अहवालानंतर एप्रिल २०२५ मध्ये आपला तपास सुरू केला. त्यांचा तपास जसजसा पुढे सरकला, तसतसा व्यावसायिक व वैमानिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवागर याच्याबाबत संशय निर्माण झाला. ‘रेमी अरेस्ट वॉरंट’ जारी करण्यात आले आणि त्यामुळेच आरोप दाखल करण्यापूर्वीच अधिकाऱ्यांना त्याला ताब्यात घेण्याची परवानगी मिळाली. अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की, भगवागर शनिवार, २६ जुलैच्या संध्याकाळी सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या विमानाचा सह-वैमानिक आहे.

भारतीय वंशाचा डेल्टा एअरलाइन्सच्या सह-वैमानिकाला बाल लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

मिनियापोलिसमधून आलेले डेल्टा फ्लाइट २८०९ हे विमान दाट धुक्यामुळे उशिरा रात्री ९:३५ च्या सुमारास उतरले. त्यावेळीच अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. हे नाट्यमय अटकनाट्य विमानातील प्रवाशांच्या डोळ्यासमोर घडत असल्याने प्रवासी थक्क झाले. प्रत्यक्षदर्शींनी या क्षणाचे वर्णन धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे, असे केले. विमान उतरताच काही क्षणांतच होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन्सचे एजंट व एअर मार्शल यांच्यासह अनेक अधिकारी विमानात चढले. १० सशस्त्र अधिकारी त्वरित कॉकपिटमध्ये गेले आणि त्यांनी प्रवाशांसमोर भगवागरला अटक केली.

रुस्तम भगवागर कोण आहे?

  • भारतीय वंशाचा रुस्तम भगवागर हा डेल्टा एअर लाइन्समध्ये सह-वैमानिक म्हणून काम करतो.
  • तो टेक्सास सॅन रामोन येथे राहतो. मात्र, तो फ्लोरिडाचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते.
  • भगवागरवर १० वर्षांखालील मुलीबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात असे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • त्याला सध्या मार्टिनेझ डिटेन्शन फॅसिलिटीमध्ये ठेवण्यात आले आहे, आणि त्याची जामीन रक्कम पाच दशलक्ष डॉलर्स निश्चित करण्यात आली आहे.

फॉक्स केटीव्हीयू (Fox KTVU) नुसार, भगवागरवर एका मुलीचा ती सहा वर्षांची असतानापासून ते ११ वर्षांची होईपर्यंत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याने तब्बल पाच वर्षे मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. तो त्या काळात त्या मुलीच्या आईबरोबरदेखील संबंधात होता, असे म्हटले जाते.

याहूनही धक्कादायक बाब म्हणजे मुलीने तपासकर्त्यांना सांगितले की, तिच्या आईला या शोषणाबद्दल माहीत होते आणि काही वेळा तिचे शोषण करण्यात आले तेव्हा आई उपस्थित होती, अशी माहिती मुलीने दिली. डेल्टा एअरलाइन्सने या अटकेवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. सीबीएस न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत एअरलाइन्सने म्हटले आहे की, त्यांना वैमानिकाच्या अटकेशी संबंधित आरोपांमुळे त्यांना धक्का बसला आहे. ‘फॉक्स केटीव्हीयू’शी बोलताना, डेल्टाच्या प्रवक्त्याने सांगितले, “डेल्टा बेकायदा कृत्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे. आमची एअरलाईन्स अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करेल.” या निवेदनात भगवागरला अंतर्गत तपास प्रलंबित असेपर्यंत निलंबित करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

डेल्टा फ्लाइट २८०९ मधील कॉकपिट अटकेने प्रवासी चिंतेत

विमानात असलेल्या प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले की, विमानात चढलेले अधिकारी वेगवेगळ्या फेडरल एजन्सींचे चिन्ह असलेल्या गणवेशात होते. ते त्वरित कॉकपिटमध्ये घुसले. त्यांनी भगवागरला अटक केली आणि विमानातून बाहेर काढले. एका प्रवाशाने ‘द सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल’ला सांगितले, “बॅज, बंदूक आणि वेगवेगळ्या एजन्सीच्या गणवेश असलेले अनेक लोक कॉकपिटमध्ये गेले आणि त्यांनी एका वैमानिकाला विमानातून बाहेर काढले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘व्ह्यू फ्रॉम द विंग’ (View From the Wing) या एव्हिएशन ब्लॉगने प्रकाशित केलेल्या एका लहान व्हिडीओमध्ये अनेक एजंट कॉकपिटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. एका प्रवाशाने सांगितले, “त्यांनी कॉकपिट उघडले आणि सह-वैमानिकाला अटक केली. त्याला कॉकपिटमधून खाली आणले आणि विमानाच्या फर्स्ट क्लास व कोचमधील दारातून बाहेर काढले.” त्यावेळी दुसरा वैमानिकही हादरलेला आणि गोंधळलेला दिसत होता. काय घडत आहे याची माहिती वैमानिकाला नव्हती, असे काही प्रवाशांनी सांगितले.