Yulia Svyrydenko Ukraine new PM रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्धादरम्यान आता युक्रेनने एक मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी एका महिला नेत्याला सोपवली आहे. अर्थशास्त्रज्ञ आणि अनुभवी तंत्रज्ञ युलिया स्व्हिरिडेन्को या युक्रेनच्या नवीन पंतप्रधान आहेत. युलिया या उपपंतप्रधान होत्या. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
त्यांची नियुक्ती युक्रेनची लष्करी-औद्योगिक क्षमता सुधारण्यासाठी आणि सध्याच्या युद्धाच्या व बजेट तुटीच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले सुरू असल्याने युक्रेनला अमेरिकेच्या पाठिंब्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे युलिया स्व्हिरिडेन्को यांच्यावर वित्तीय सुधारणा, मित्रराष्ट्रांशी अधिक घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी असणार आहे. कोण आहेत युलिया स्वीरिडेन्को? जाणून घेऊयात.

कोण आहेत युलिया ॲनाटोलिव्हना स्व्हिरिडेन्को?
- युलिया ॲनाटोलिव्हना स्व्हिरिडेन्को यांचा जन्म २५ डिसेंबर १९८५ रोजी युक्रेनच्या (तेव्हा युक्रेनियन एसएसआर, सोव्हिएत युनियन) चेर्निहिव्ह येथे झाला.
- त्या एक अनुभवी तंत्रज्ञ आणि स्वतंत्र राजकारणी आहेत. त्या १७ जुलै २०२५ रोजी युक्रेनच्या १९ व्या पंतप्रधान ठरल्या.
- त्यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या युद्धकालीन मंत्रिमंडळ फेरबदलादरम्यान केली. स्व्हिरिडेन्को या ४ नोव्हेंबर २०२१ पासून उपपंतप्रधान पदावर कार्यरत होत्या.
- त्यांनी आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री म्हणूनदेखील काम केले, त्यामुळे युक्रेनच्या युद्धकालीन आर्थिक धोरणात त्यांची मध्यवर्ती भूमिका होती.
स्व्हिरिडेन्को यांनी २००८ मध्ये कायिव्ह नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ट्रेड अँड इकॉनॉमिक्समधून अँटिमोनोपॉली व्यवस्थापनात पदवी प्राप्त केली. त्यांनी त्याच वर्षी ‘एएमपी’ या युक्रेनियन-अंडोरन वेंचरमध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. २०११ मध्ये त्या चीनमधील वुशी शहरात चेर्निहिव्हच्या स्थायी प्रतिनिधी झाल्या. चीनमधील हे कार्यालय युक्रेनियन शहराचे एकमेव अधिकृत प्रतिनिधी कार्यालय आहे. २०१५ साली चेर्निहिव्ह ओब्लास्टच्या आर्थिक विकास विभागाच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. एक सक्षम प्रशासक म्हणून त्यांची ख्याती असल्याने त्यांची ३० जुलै ते २८ नोव्हेंबर २०१८ पर्यंत चेर्निहिव्ह ओब्लास्टच्या कार्यवाहक राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
युलिया ॲनाटोलिव्हना स्व्हिरिडेन्को यांचीच नियुक्ती का करण्यात आली?
युद्ध सुरू असल्यामुळे सरकारमध्ये कार्यकारी बदल होऊ शकले नव्हते, ते बदल आता शक्य झाले. मुख्य म्हणजे झेलेन्स्की यांना डेनिस श्मिहल यांचा पर्यायी उमेदवार सापडला नाही. युलिया या उपपंतप्रधान होत्या आणि मुख्य म्हणजे त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे, त्यामुळे युलिया यांची या पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय राजकारणात प्रवेश
मे २०२० मध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांना ट्रायलेटरल कॉन्टॅक्ट ग्रुपच्या सामाजिक आणि आर्थिक उपसमूहात युक्रेनचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नियुक्त केले. हा समूह पूर्व युक्रेनमधील युद्धाशी संबंधित वाटाघाटींमध्ये गुंतलेला होता. २२ डिसेंबर २०२० रोजी त्यांना युलिया यांच्या जागी राष्ट्रपती कार्यालयाच्या उपप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत म्हणजेच ४ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांना पहिल्या महिला उपपंतप्रधान आणि आर्थिक विकास व व्यापार मंत्री म्हणून नियुक्त केले. त्यांना यात २५६ खासदारांचा पाठिंबा मिळाला.
१४ जुलै २०२५ रोजी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अपेक्षित सरकारी फेरबदलाची घोषणा केली आणि स्व्हिरिडेन्को यांना पंतप्रधान म्हणून नामांकित केले. (Verkhovna Rada) युक्रेनियन संसदने १७ जुलै रोजी ही घोषणा केली. पाच वर्षांत पंतप्रधानांच्या कार्यालयात हा पहिला बदल होता. त्या डेनिस श्मिहाल यांची जागा घेतील. स्व्हिरिडेन्को या त्यांच्याकडून संरक्षण मंत्री पद स्वीकारण्याचीही शक्यता आहे.
झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखाली त्यांना आता संरक्षण उत्पादन, वित्तीय सुधारणा आणि आर्थिक आधुनिकीकरण यावर लक्ष केंद्रित केलेल्या युद्धकालीन प्रशासकीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या प्रशासनाची तात्काळ प्राथमिकता देशांतर्गत शस्त्र उत्पादन वाढवणे आहे, ज्यामुळे सैन्याच्या ५० टक्के गरजा सहा महिन्यांच्या आत पूर्ण होतील. स्व्हिरिडेन्को यांनी ही तातडीची गरज असल्याचे सांगितले. “युद्धाला विलंब करण्याची वेळ नाही,” असे त्यांनी घोषित केले. त्यांनी संरक्षण पुरवठा साखळी आणि लष्करी औद्योगिक आधुनिकीकरणावर भर दिला जाणार असल्याचे वचनही दिले.
स्व्हिरिडेन्को यांच्यासमोरील आव्हाने कोणती?
स्व्हिरिडेन्को यांना देश एका गंभीर टप्प्यावर असताना पंतप्रधानपदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यांची मुख्य कार्ये खालीलप्रमाणे:
- किमान ५० टक्के आघाडीच्या लष्करी गरजा पूर्ण करण्यासाठी देशांतर्गत शस्त्र उत्पादन वाढवणे.
- आंतरराष्ट्रीय मदत कमी झाल्याने बजेटमधील १९ अब्ज डॉलरचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे.
युक्रेनवर रशियाने आपले भूदल आणि हवाई हल्ले तीव्र केले असताना त्यांची नियुक्ती झाली आहे. अंतर्गत पातळीवर, युक्रेनला केवळ आर्थिक ताणच नव्हे तर देशांतर्गत त्रुटींनाही सामोरे जावे लागत आहे. स्व्हिरिडेन्को यांना ४५० सदस्यीय Verkhovna Rada (युक्रेनियन संसद) मध्ये २६२ मते मिळाली आहेत. मात्र, विरोधी खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे की मंत्रिमंडळातील हा फेरबदल आताच्या घडीला चुकीचा निर्णय असू शकतो.