तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी १९ व्या शतकातील समाजसुधारक अय्या वैकुंदर यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यावर राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. “भगवान विष्णूने सनातन धर्माचा नाश थांबवण्यासाठी अवतार घेतला होता”, असे विधान त्यांनी केले. यामुळे वैकुंदर यांच्या अनुयायांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ४ मार्चला राज्यपालांनी अय्या वैकुंदर अवथारा दीना विळा (अय्या वैकुंदर जयंती) कार्यक्रमात हे विधान केले.

अय्या वैकुंदर एक समाजसुधारक

१८०९ साली अय्या वैकुंदर यांचा जन्म झाला. एक सामाजसुधारक आणि अय्यावाझी पंथाचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखले जाते. प्रामुख्याने दक्षिण तामिळनाडूमध्ये त्यांच्या अनुयायांची संख्या जास्त आहे. त्यांनी समता आणि बंधुतेची शिकवण देत, जाती-आधारित भेदभाव निर्मूलनाचे कार्य केले. तामिळनाडूचे राज्यपाल रवी यांनी सनातन धर्माचे संरक्षक म्हणून त्यांचा उल्लेख केला; ज्यामुळे त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे.

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
Raj Thackeray and anjali Damania
“ईडीचं चक्र होतं म्हणून…”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दर्शवल्यानंतर अंजली दमानियांचं मोठं विधान
Girish Mahajan criticizes Unmesh Patil in jalgaon
“एक संधी नाकारताच पक्ष सोडणे म्हणजे…” गिरीश महाजन यांचा उन्मेष पाटील यांना टोला

कठोर जातिवाद आणि जातीवर आधारित अत्याचार सुरू असताना वैकुंदर यांनी या प्रथांना आव्हान दिले. त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांसाठी समपंथी भोजनालय सुरू केले. विशेष म्हणजे वैकुंदर आपल्या शिष्यांना दलितांच्या घरी त्यांच्याबरोबर जेवायला पाठवत असत. जेव्हा दलितांना उच्चवर्णीय हिंदू वापरत असलेल्या विहिरींतून पाणी आणण्याची परवानगी नव्हती, तेव्हा वैकुंदर यांनी दलितांसाठी मुथिरीकिनारस नावाच्या विहिरी खोदण्यास सुरुवात केली.

त्या काळात मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दलितांचा स्पर्श होऊ नये म्हणून पुजारी विभूती आणि चंदनाचा लेप दूरवर फेकत असत. ही प्रथा अजूनही अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते. दलितांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती, तेव्हा वैकुंदर यांनी ‘थोट्टू नमम’ला सुरुवात केली. त्याद्वारे त्यांनी पुजार्‍यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. भक्तांच्या जातीचा विचार न करता, त्यांच्या कपाळावर पवित्र चंदन लावा. प्रत्येकात देवाचे रूप आहे, अशी शिकवण याद्वारे देण्यात आली.

वैकुंदर यांनी सर्व भक्तांना पगडी व धोतर घालण्यास प्रोत्साहित केले आणि समानतेचा प्रचार केला. त्यांनी थुवायल पंथी या कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी आपल्या अनुयायांना शिस्त आणि शाकाहाराची शिकवण दिली. त्यांच्या अनुयायांनी याचा प्रचार-प्रसार संपूर्ण तामिळनाडूमध्ये केला. समुदायाच्या उपासनेसाठी त्यांनी निझल थांगल हे ठिकाण तयार केले. या ठिकाणी कोणत्याही देवांच्या मूर्ती नव्हत्या. या सामुदायिक उपासना केंद्रामध्ये स्वयंपाकघरापासून अगदी प्राथमिक शाळादेखील होत्या. वैकुंदर यांनी दलितांना शिक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आणि भेदभाव करणार्‍या समाजकंटकांना विरोध केला. ब्राह्मण पुजारी किंवा संस्कृत मंत्रांशिवाय अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा संदेशही त्यांनी दिला.

राज्यपालांचा विरोध का?

३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अय्या वैकुंदर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली होती. “श्री. अय्या वैकुंड स्वामीकाल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. गरिबातील गरिबांना सक्षम केले जाईल, या दृष्टिकोनातून सौहार्दपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या अगणित प्रयत्नांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे”, असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले.

पंतप्रधानांनी पोस्ट केल्याच्या एक दिवसानंतर राज्यपाल रवी म्हणाले की, अय्या वैकुंदर हे भगवान विष्णूचा अवतार होते. १९ व्या शतकाच्या सुरुवातीस सनातन धर्माचा नाश रोखण्यासाठी त्यांनी अवतार घेतला. ते म्हणाले की, वैकुंदर यांच्या ‘अकिलाथिरत्तु अम्मानाई’मध्ये सनातन धर्माचे सार आहे. अय्यावाझी पंथाचे मुख्य प्रशासक बाला प्रजापती आदिगलर यांनी राज्यपालांच्या विधानावर निंदा केली. कन्याकुमारी येथे पत्रकारांशी बोलताना आदिगलर म्हणाले, “ज्यांना इतिहासाविषयी ज्ञान नाही, त्यांनी असे विधान करू नये. वैकुंदर यांचा लढा लोकांमधील अज्ञान नष्ट करण्यासाठी होता. त्यांनी जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्यांना नीच व्यक्ती म्हटले, तेव्हा ते (राज्यपाल) त्यांना सनातन धर्माचे रक्षणकर्ता कसे म्हणू शकतात. “

हेही वाचा : लक्षद्वीपमध्ये वाढणार भारतीय नौदलाची ताकद; नवीन लष्करी तळ आयएनएस जटायू देशासाठी महत्त्वाचा का?

तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम. अप्पावु यांनीही राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका केली. कायदा मंत्री एस. रेगुपथी यांनी राज्यपालांवर वादग्रस्त वक्तव्याद्वारे प्रसिद्धी मिळवत असल्याचा आरोप केला. तामिळनाडुतील इतिहासकारांनीही राज्यपाल रवी यांच्या वक्तव्याचा विरोध केला.