Tsunami impacts on cruise ships रशियाच्या पूर्व द्वीपकल्प कामचात्का या भागाला एका अतिशय शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर या परिसराला त्सुनामीचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. जिओलॉजिकल सर्वेक्षणानुसार रशियातील भूकंपाची तीव्रता ८.८ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपानंतर समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीयुक्त कुतूहल निर्माण झाले आहे की, त्सुनामीच्या काळात क्रूझ जहाजांना खरंच धोका असतो का? त्याचविषयी जाणून घेऊयात.
खोल समुद्रात सुरक्षित
खुल्या समुद्रात क्रूझ जहाजे खरे तर सर्वांत सुरक्षित असतात. जेव्हा लोक ‘त्सुनामी’ हा शब्द ऐकतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर पाण्याची एक प्रचंड मोठी लाट येते. पण समुद्रात जे घडते, ते या चित्रापेक्षा वेगळे असते. खोल समुद्रात म्हणजेच जिथे पाण्याची खोली १८० फुटांपेक्षा जास्त असते, तिथे त्सुनामीच्या लाटा खूप लांब; पण उंचीने कमी असतात. या लाटा जेट विमानाच्या वेगाने प्रवास करू शकतात; पण जहाजावरील लोकांना त्या लाटा क्वचितच जाणवतात. गाडी एखाद्या छोट्या स्पीडब्रेकरवरून गेल्यावर जसे जाणवते, तशीच जाणीव जहाजावर असलेल्या लोकांना होते.
पण, जेव्हा या लाटा किनाऱ्याजवळ येतात आणि पाण्याची खोली कमी होते, तेव्हा त्यांचा वेग कमी होतो; परंतु त्यावेळी त्यांची ऊर्जा एकत्रित होते आणि त्यांची उंची खूप वाढते. त्यामुळे अशा वेळी या लाटा धोकादायक होतात. त्सुनामीमुळे होणारी हानी जवळपास नेहमीच किनारी भागांमध्ये होते आणि समुद्राच्या मध्यभागी त्याचा कोणताही परिणाम होत नाही.
बंदरात असलेल्या जहाजांना जास्त धोका का?
- बंदरात किंवा किनाऱ्याजवळ थांबलेल्या जहाजांना त्सुनामीच्या काळात खूप जास्त धोका असतो.
- पाण्याच्या पातळीत अचानक वाढ किंवा घट झाल्यामुळे जहाजाचा तोल बिघडू शकतो.
- जोरदार प्रवाहामुळे जहाज जमिनीवर आदळू शकते किंवा इतर जहाजांशी त्यांची टक्कर होऊ शकते.
- तरंगणारा कचरा, जसे की कंटेनरदेखील मोठा धोका निर्माण करतात.
- याच कारणामुळे त्सुनामीचा इशारा मिळताच क्रूझ कंपन्या त्यांची जहाजे त्वरित खोल समुद्रात घेऊन जातात.
- सर्व प्रवासी परत आले नसले तरीही जहाज कंपन्या हा निर्णय घेतात. सुरक्षिततेच्या नियमांनुसार जहाज आणि जहाजावरील प्रवाशांना प्राधान्य दिले जाते.

हवाई आणि अलास्कामध्ये नुकत्याच दिलेल्या इशाऱ्यादरम्यान, काही क्रूझ जहाजांना तत्काळ बंदर सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचा एक व्हिडीओ लगेच व्हायरल झाला. त्यात प्रवासी त्यांच्या जहाजापर्यंत धावत जाताना दिसत होते. एका व्हायरल झालेल्या टिकटॉक व्हिडीओमध्ये लोक बसमधून जहाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते; पण त्यांना आढळले की, जहाज आधीच निघून गेले आहे. काही जहाजे तर कमी प्रवाशांना घेऊन निघाली. कारण- त्यांनी वेळापत्रकापेक्षा सुरक्षिततेला जास्त महत्त्व दिले.
क्रूझ जहाजे कशी तयार करतात?
आधुनिक क्रूझ जहाजे आधुनिक सुरक्षा प्रणालीसह डिझाइन केली गेलेली आहेत. त्यात उपग्रह-आधारित निरीक्षण, वेळ यांनुसार हवामान अपडेट्स, त्सुनामी अलर्ट नेटवर्क आणि कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन प्रशिक्षण या बाबींचा समावेश असतो. त्सुनामीचा इशारा मिळाल्यावर क्रूझ जहाजांकडून केल्या जाणाऱ्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी खालीलप्रमाणे :
- ठरलेल्या बंदरांवर जाण्याचा निर्णय रद्द करणे
- किनाऱ्यावर परतण्यास उशीर करणे
- मार्ग बदलणे
- आपत्कालीन नियम लागू करणे
या बदलांमुळे काही प्रवाशांचा हिरमोड होऊ शकतो; पण सुरक्षितता नेहमीच महत्त्वाची असते.
रशियातील भूकंपादरम्यान काय घडले?
भूकंप बुधवारी सकाळी रशियाच्या पूर्वेकडील कामचात्का द्वीपकल्पावर झाला. भूकंपाची वेळ अंदाजे सकाळी ११.१४ वाजताची होती. रशियामधील कामचात्का प्रदेश दोन प्रमुख सबडक्शन झोनजवळ आहे. तिथे पॅसिफिक प्लेट उत्तर अमेरिकन प्लेटच्या खाली सरकत आहे. हा भाग मोठ्या भूकंपांसाठी ओळखला जातो. या भागात १९५२ मध्ये एका भूकंपाची तीव्रता ९.० रिश्टर स्केल होती. अलीकडील भूकंपात कदाचित फॉल्ट लाइनच्या बाजूने मोठी हालचाल झाली असावी, असा अंदाज आहे. परिणामी समुद्राच्या तळाचा काही भाग वर सरकला आणि समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात वर ढकलले गेले. अशा प्रकारे त्सुनामी आली आणि ती पॅसिफिक महासागरातून अमेरिकेकडे सरकू लागली.
तज्ज्ञांनी सांगितले की, या लाटा अमेरिकेपर्यंत ५०० ते ८०० किलोमीटर प्रति तास वेगाने पोहोचल्या. त्यांचा वेग एका जेट विमानासारखा होता. परंतु, उथळ पाण्यात पोहोचल्यावर या लाटांचा वेग कमी झाला. या लाटांमुळे हवाई आणि पश्चिम किनारपट्टीचा भाग प्रभावित झाला. कारण- हा प्रदेश कामचात्का द्वीपकल्पाच्या थेट समोर होता. भूकंपाच्या सुमारे सहा तासांनंतर स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.१० वाजता लाटा हवाईमध्ये पोहोचल्या. अलास्का आणि पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांनाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता.
भूकंपामुळे त्सुनामी कशी येते?
भूकंपामुळे समुद्रातील भूभाग हादरतो. बहुतेक विनाशकारी त्सुनामी समुद्राखालील भूकंपांमुळे निर्माण होतात. उथळ भूकंपांची खोली साधारणपणे शून्य ते ७० किलोमीटरदरम्यान असते. कामचात्का भूकंप रशियातील पेट्रोपाव्लोव्स्क-कामचात्कास्की या किनारपट्टीवरील शहराच्या १३६ किलोमीटर पूर्वेला आणि केवळ १९.३ किलोमीटरच्या उथळ खोलीवर झाला. त्यामुळेच या भूकंपामुळे त्सुनामी लाटा निर्माण झाल्या.
त्सुनामी सामान्यतः ७.० रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपांमुळे निर्माण होतात. परंतु, सर्वांत विनाशकारी त्सुनामी सामान्यतः ८.० रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपांमुळे होतात. अशा प्रकारच्या त्सुनामी मोठ्या अंतरापर्यंत प्रवास करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवू शकतात. कामचात्का भूकंपाची तीव्रता ८.८ होती आणि हा भूकंप १९०० नंतरच्या सर्वांत शक्तिशाली भूकंपांपैकी एक होता.