ASI Spent 25% of Its Excavation Budget in Gujarat: गेल्या पाच वर्षांत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाने आपल्या एकूण उत्खनन खर्चापैकी जवळपास २५ टक्के हिस्सा गुजरातसाठी राखून ठेवला आहे. गुजरात आणि पंतप्रधान मोदी यांचं नात वेगळं सांगण्याची गरज नाही. मोदींच्या मूळगावी वडनगरमध्ये उत्खनन करण्यासाठी भारतीय पूरातत्त्व विभागाने ८.०३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी गुजरातसाठी मंजूर केलेल्या एकूण ८.५३ कोटी रुपयांपैकी ९४ टक्के आहे, असे संसदेत सादर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
२०२० ते २०२४ दरम्यान भारतीय पुरातत्त्व खात्याने वडनगर येथे उत्खनन केले होते. या कालावधीत गुजरातमधील वलभीपूर, विहार, सरवल आणि लोथल या ठिकाणीही उत्खनन करण्यात आले होते. या काळात ASI ने १७ राज्यांमधील एकूण ५८ स्थळांवर ३४.८१ कोटी रुपयांचा खर्च करून उत्खनन केले, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी २४ जुलै रोजी राज्यसभेत केरळचे खासदार ए. रहीम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
गजेंद्रसिंह शेखावत यांनी संगितले की, या कालावधीत गुजरात, मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी सहा उत्खनने झाली. त्यानंतर हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी पाच, तसेच बिहार, तमिळनाडू आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी चार उत्खनने करण्यात आली. गेल्या पाच वर्षांतील एकूण खर्चापैकी, ASI ने सहा प्रमुख स्थळांवर ५० टक्क्यांहून अधिक रक्कम खर्च केली. त्यात वडनगर (गुजरात), राखीगढी (हरियाणा), केसारुआ खेड़ा (हरियाणा), रत्नागिरी (ओडिशा), बहाज (राजस्थान) आणि अधिचनल्लूर (तमिळनाडू) यांचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांत ASI चे उत्खननासाठीची आर्थिक तरतूदही वाढविली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ते १,०३६.४१ कोटी रुपये होते, तर २०२५-२६ मध्ये ते १,२७८.४९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. “गेल्या काही वर्षांत उत्खननाचा वेग लक्षणीय वाढला असून देशभरातील अनेक नवीन स्थळांवर उत्खनन करण्यात आले आहे,” असे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ASI मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द प्रिंटशी बोलताना सांगितले.
परंतु, ASI च्या एकूण बजेटमध्ये प्रत्यक्ष शोध आणि उत्खननासाठीचा खर्च अजूनही १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. २०२२ च्या अहवालात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांनीही या त्रुटीकडे लक्ष वेधले होते. याच वर्षी, सांस्कृतिक मंत्रालयाने संसदेतल्या सार्वजनिक खाते समितीला आश्वासन दिले होते की, उत्खनन आणि शोध कार्यासाठी वाटप होणारा निधी एकूण अंदाजपत्रकाच्या किमान ५ टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल. मात्र, CAG च्या अहवालानुसार, मंत्रालयाच्या आश्वासनानंतरही हा खर्च अद्यापही १ टक्क्याच्या खालीच आहे.
आजही शोध आणि उत्खननासाठीचे वाटप जवळपास तसेच आहे.
हरियाणातील राखीगढी हे सिंधु संस्कृतीशी संबंधित सर्वात मोठे स्थळ आहे. उत्खननासाठी निधी वाटपाच्या बाबतीत या स्थळाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत ASI ने राखीगढी येथे उत्खननासाठी १.८६ कोटी रुपये खर्च केले. हा निधी हरियाणाला देण्यात आलेल्या एकूण ५.४७ कोटी रुपयांपैकी ३४ टक्के आहे. राखीगढीच्या उत्खननात विहीर, प्राचीन मातीच्या विटांच्या रचना, मातीच्या विटांचे स्टेडियम आणि जलसाठा क्षेत्र यांचे पुरावे मिळाले आहेत. या कालावधीत हरियाणातील सिरसा येथील थेड टेकडी, राखीगढी, केसारुआ खेड़ा, आसंध आणि अग्रोह या पाच स्थळांवर उत्खनन झाले.
निधीच्या वाटपाच्या बाबतीत राखीगढीनंतर केसारुआ खेड़ा हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे २०२२ आणि २०२३ मध्ये उत्खननासाठी १.८३ कोटी रुपये खर्च झाले. हे स्थळ समृद्ध सांस्कृतिक थरांसाठी प्रसिद्ध असून, येथील उत्खननातून पेंटेड ग्रे वेअर (PGW) कालखंडातील (इ.स.पू. ११००–८००) वस्तू आढळल्या आहेत. पेंटेड ग्रे वेअर हाच महाभारताचा कालखंड मानला जातो. परंतु, यंदा ASI ने राखीगढी (हरियाणा) आणि राजगिर (बिहार) यांसह देशातील अनेक स्थळांवर उत्खननासाठी परवाने दिले नाहीत, असे द प्रिंटने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
कीझाड़ी उत्खनन
तमिळनाडूमधील कीझाड़ी उत्खननासाठी मागील पाच वर्षांत किती निधी देण्यात आला याबाबत केरळचे खासदार ए. रहीम यांनी संसदेत चौकशी केली होती, परंतु या संदर्भात संबंधित मंत्रालयाने कोणतीही माहिती दिली नाही. कीझाड़ी हे स्थळ राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरले आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे पुरातत्त्वज्ञ अमरनाथ रामकृष्ण यांना मसुदा अहवालात तज्ज्ञांच्या सूचनांनुसार आवश्यक दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले होते. “वैगई नदी खोऱ्यातील शास्त्रीय पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणानंतर ASI ने कीझाड़ीचे पुरातत्त्वीय महत्त्व ओळखले होते. २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ या हंगामात येथे उत्खनन करण्यात आले, त्यातून समृद्ध पुरातत्त्वीय अवशेष मिळाले. २०१८ पासून तमिळनाडू राज्य पुरातत्त्व विभाग या स्थळी उत्खनन करत आहे,” असे शेखावत यांनी उत्तरात सांगितले.
तामिळनाडूसाठी वितरित केलेल्या ३.४३ कोटी रुपयांपैकी २.११ कोटी रुपये अधिचनल्लूर स्थळावर खर्च करण्यात आले आहे. याठिकाणी ASI ने २०२१ ते २०२४ या कालावधीत उत्खनन केले होते. हे स्थळ लोहयुगीन मेगालिथिक दफनभूमी म्हणून ओळखले जाते आणि येथील उत्खननातून माठ, इतर मातीची भांडी आणि संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत. २०२०-२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या स्थळाचा समावेश ‘आयकॉनिक साइट’ म्हणून विकसित करण्यासाठी निवडलेल्या पाच पुरातत्त्वीय स्थळांपैकी करण्यात आला होता.