मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात गेल्या आठवड्यात भारतीय जनता पक्षाच्या भव्य अशा ठाणे विभागीय कार्यालयाचा दिमाखदार सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजपसाठी ठाणे महत्त्वाचे असेल असे विधान केले. मुख्यमंत्र्यांच्या शहरात आपला पक्ष शिंदेसेनेची ‘बी टीम’ नसेल हेच थेट सूचित करण्याचा प्रयत्न केला.

ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद किती?

ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या १८ जागा आहेत. लोकसभेचे ३ मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत. शिवसेना एकसंध असतानाही या जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत होती. आमदारांची आकडेमोड केली तर सर्वाधिक ८ आमदार भाजपचे आहेत. मुंबईस लागून असलेला आणि नागरीकरणाचा वेग कमालीचा असणाऱ्या या जिल्ह्यावर पक्षाचा वरचष्मा असावा असे सध्याच्या भाजप नेतृत्वास वाटले नाही तर आश्चर्यच म्हणावे लागेल. शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे ‘शत प्रतिशत’चे स्वप्न पूर्ण करण्याची ही सुवर्णसंधी असल्याची जाणीव या पक्षाला होऊ लागली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांना ठाणे लोकसभा मतदारसंघ मिळविण्यासाठी झुंजावे लागते यावरून भाजपची ही आक्रमक रणनीती स्पष्ट होते आहे.

हेही वाचा : बोर्नविटा ‘हेल्थ ड्रिंक’ नाही? केंद्र सरकारने का काढला असा आदेश?

ठाण्यातच शिंदेसेनेच्या कोंडीचे प्रयत्न?

महाविकास आघाडीचे सरकार उलथवून मुख्यमंत्रीपद मिळविणाऱ्या शिंदे यांना ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून भाजपने मुक्त वाव दिला आहे. भाजपच्या वाट्याला आलेल्या गृहमंत्रीपदाचा प्रभावही या जिल्ह्यात शिंदेसेनेपुढे चालत नाही असे चित्र आहे. डोंबिवलीत पक्षाच्या वाट्याला मंत्रीपद असूनही रवींद्र चव्हाण ठाण्यापेक्षा कोकणात अधिक असतात. त्यामुळे ‘कल्याणची सुभेदारी’ही मुख्यमंत्री पुत्र डाॅ. श्रीकांत चालवितात. हे सारेच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना कमालीचे अस्वस्थ करणारे ठरले. देशात मोदींचे नाणे खणखणीत असताना ठाण्यात आम्हाला कुणी विचारत नाही ही खंत असलेल्या भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून मात्र महायुतीत सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुख्यमंत्र्यांना ठाणे सहजासहजी मिळत नाही हे भाजप नेते, पदाधिकाऱ्यांना सुखावणारे आहे. पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांसाठी ठाणे ‘ॲाप्शन’ला सोडले आहे हा तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांचा अनेक वर्षांचा समजही यानिमित्ताने दूर होत आहे.

ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढते आहे?

शिवसेना एकसंध असतानाही ठाणे जिल्ह्यात या दोन पक्षांत गेल्या दहा वर्षांपासून नेहमीच स्पर्धा राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय राजकारणातील उदयानंतर ठाणे, नवी मुंबई, कल्या-डोंबिवली आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही भाजपची ताकद वाढल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले कपिल पाटील, किसन कथोरे यांसारखे नेते भाजपमध्ये आल्याने भिवंडी, मुरबाड, शहापूर पट्ट्यात या पक्षाला चेहरा मिळाला. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे हे संपूर्ण शहर भाजपच्या आधिपत्याखाली आहे. जिल्ह्यातील १८ आमदारांपैकी सर्वाधिक ८ आमदार हे भाजपचे आहेत. शिवसेना एकसंध असतानाही या पक्षाच्या आमदारांचा आकडा पाचपेक्षा अधिक नव्हता. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली यांसारख्या महापालिकांत शिवसेनेची एकहाती सत्ता असली तरी या दोन्ही शहरांमध्ये पूर्वीपेक्षा भाजपची ताकद वाढली आहे. मिरा-भाईंदर भागात गीता जैन अपक्ष आमदार असल्या तरी त्या भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. हे लक्षात घेता मुख्यमंत्र्यांची ‘बी टीम’ म्हणून वावरण्यात आता भाजपला रस नाही हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : इराणसह दहशतवादी गटांचा मिळून इस्रायलवर हल्ला; काय आहे ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स?

मुख्यमंत्र्यांना झुंजावे हा भाजप धोरणाचा भाग?

राज्याचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत ठाणे आणि कल्याण या दोन जागा शिंदेसेनेला सहज मिळतील असे चित्र अगदी महिन्याभरापूर्वीपर्यंत दिसत होते. मुख्यमंत्र्यांचे दिल्ली दरबारी ‘वजन’ असून मोदी-शहांच्या पसंतीस ते उतरले आहेत असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ठाणे आणि कल्याण हे मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचे असलेले दोन्ही मतदारसंघ त्यांच्या पक्षाला सहज सोडले जातील असा दावा त्यांचे निकटवर्तीय करत. हा दावा किती फोल आहे हे एव्हाना स्पष्ट होऊ लागले आहे. ठाणे, कल्याणपैकी एक मतदारसंघ द्या असा हट्ट भाजपने धरल्याने चर्चेच्या पहिल्याच फेरीत मुख्यमंत्र्यांची कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. कल्याणातून मुख्यमंत्री पुत्र डाॅ.श्रीकांत हेच उमेदवार असतील अशी परस्पर घोषणा करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचा तिढा अजूनही कायम असल्याचा संदेशच राजकीय वर्तुळात दिला. यामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता आणखी वाढली. काहीही झाले तरी ठाणे जिल्ह्यात आम्हाला गृहीत धरू नका असा संदेश यानिमित्ताने भाजपकडून दिला जात आहे. शिवसेना एकसंध असताना या पक्षाशी दोनहात करण्यास सज्ज असणारा भाजप दुंभगलेल्या शिवसेनेसाठी जिल्हा सहज सोडून देणार नाही हे तर स्पष्टच होते. लोकसभेच्या जागा वाटपानिमित्ताने ही बाब प्रकर्षाने पुढे येत आहे इतकेच.

हेही वाचा : iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?

भाजपला नाईक ठाण्यात का हवेत?

शिवसेनेचे दिवगंत नेते आनंद दिघे आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन नेत्यांचा अपवाद वगळला तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर प्रभाव टाकणारा नेता म्हणून गणेश नाईक यांची ओळख आहे. ठाणे आणि पालघर हा एक जिल्हा असताना या ठिकाणचे पालकमंत्रीपद तीन वेळा नाईकांनी भूषवले आहे. या दोन्ही जिल्ह्यांची खडान् खडा माहिती असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ठाणे जिल्ह्यातील आगरी, कोळी, कुणबी समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहेच. शिवाय इतर समाजांमधील प्रभावी व्यक्तींसोबत त्यांचे निकटचे संबंध राहिले आहेत. उद्योगस्नेही राजकीय नेता अशी नाईकांची नेहमीच ओळख राहिली आहे. यामुळे ठाणे लोकसभेत नाईक कुटुंबियांपैकी एकाला उमेदवारी देऊन ठाण्याचा गड मजबूत करण्याची भाजपची रणनीती आहे. नाईकांचे ठाण्यात परतणे हे एका अर्थाने भविष्यातील आव्हान ठरेल हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीयदेखील खासगीत बोलून दाखवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यासाठी आग्रह धरणे आणि त्यातही नाईकांची उमेदवारी पुढे रेटणे हे भाजपच्या विस्तारवादी धोरणांचा एक भाग आहे हे वास्तव यानिमित्ताने ठसठशीतपणे पुढे येत आहे.