देशात तरुणाईची को-लिव्हिंगला पसंती वाढत आहे. कमी भाडे आणि सर्व सोयींनी युक्त निवासाची व्यवस्था यामुळे नोकरदारांसह विद्यार्थ्यांचा को-लिव्हिंगकडे कल वाढला आहे. केवळ मोठ्याच नव्हे, तर छोट्या शहरांमध्ये को-लिव्हिंग सुविधांमध्ये वाढ होत आहे. कोविड काळानंतर को-लिव्हिंगला गती मिळाली आहे. यामागे प्रामुख्याने शिक्षण आणि रोजगारासाठी शहरांमध्ये होणारे स्थलांतर कारणीभूत ठरले. अनेक मोठ्या कंपन्या या व्यवसायात असून, स्वतंत्रपणे अनेक इमारत मालकही को-लिव्हिंग सुविधा चालवत आहेत. देशातील को-लिव्हिंगमध्ये २०३० पर्यंत तिपटीने वाढ होण्याचा अंदाज आहे.

को-लिव्हिंग म्हणजे काय?

को-लिव्हिंग म्हणजे एकाच ठिकाणी राहण्यासाठी सर्व सोयींनी युक्त सुविधा असते. या क्षेत्रात अनेक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या स्वत: सुविधा करतात अथवा फ्रँचाईजी पद्धतीने या सुविधांची उभारणी करतात. या सुविधांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंपनीवर असते. त्या ठिकाणी तरुणांना आवश्यक असलेल्या दैनंदिन गोष्टी पुरविल्या जातात. त्यात वाय-फाय, कपडे धुलाई, जेवणासह इतर गोष्टींचा समावेश आहे. को-लिव्हिंगमध्ये राहण्याची लवचीकता असते. त्यात या सुविधांच्या दर्जानुसार आणि तिथे मिळत असलेल्या सेवांनुसार दरमहा भाडे ठरते. सर्वसाधारणपणे मासिक पातळीवर राहण्याच्या या सुविधा असल्या, तरी अगदी एक दिवस राहण्याची सोयही अनेक ठिकाणी असते. याचबरोबर दोन ते तीन जणांसाठी एकत्र खोलीसोबत स्वतंत्र खोलीचा पर्यायही उपलब्ध करून दिला जातो.

सद्य:स्थिती काय?

देशभरात गेल्या काही वर्षांपासून महानगरांमध्ये को-लिव्हिंगची सुविधा वाढत आहे. आता हे लोण छोट्या शहरांपर्यंत पोहोचू लागले आहे. देशातील शहरांमध्ये २० ते ३४ वयोगटातील सुमारे पाच कोटी स्थलांतरित लोकसंख्या सध्या असण्याचा अंदाज असून, हे या वाढीचे प्रमुख कारण आहे. सध्या देशभरात को-लिव्हिंगच्या एकूण बेडची संख्या ३ लाख असून, ती २०३० पर्यंत १० लाखांवर जाणार आहे. सध्या एकूण बेडची मागणी ६६ लाख आहे. ही संख्या २०३० पर्यंत वाढून ९१ लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे. या बाजारपेठेतील सध्याची उलाढाल ४० अब्ज डॉलर असून, ती २०३० पर्यंत २०६ अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज ‘कॉलिअर्स इंडिया’च्या ताज्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.

घरभाड्यापेक्षा किती स्वस्त?

स्वतंत्र घर भाड्याने घेण्यापेक्षा को-लिव्हिंग सुविधा सर्वच महानगरांमध्ये स्वस्त आहे. बंगळुरूमध्ये स्वतंत्र १ बीएचके घर भाड्याने घेतल्यास दरमहा भाडे १५ हजार ५०० रुपये ते ३६ हजार ५०० रुपये आहे. याच वेळी को-लिव्हिंगचे दरमहा भाडे ११ हजार ७०० ते २३ हजार ७०० रुपये आहे. दिल्लीत स्वतंत्र घराचे दरमहा भाडे १५ ते ३७ हजार रुपये, तर को-लिव्हिंगचे भाडे ११ हजार ३०० ते २४ हजार रुपये आहे. चेन्नईत स्वतंत्र घराचे दरमहा भाडे १२ ते २१ हजार ५०० रुपये, तर को-लिव्हिंगचे भाडे ९ ते १४ हजार रुपये आहे. हैदराबादमध्ये स्वतंत्र घराचे दरमहा भाडे १४ ते २६ हजार ५०० रुपये, तर को-लिव्हिंगचे भाडे १० हजार ५०० ते १७ हजार ३०० रुपये आहे. या महानगरांमध्ये घरभाड्यापेक्षा को-लिव्हिंगचा पर्याय २५ ते ३५ टक्के स्वस्त आहे.

मुंबई, पुण्यात काय चित्र?

मुंबईत सध्या १ बीएचके घराचे दरमहा भाडे १९ ते ४२ हजार रुपये आहे. त्याच वेळी को-लिव्हिंगचे दरमहा भाडे १५ हजार २०० ते २७ हजार ५०० रुपये आहे. पुण्यात सध्या १ बीएचके घराचे सरासरी मासिक भाडे १२ हजार ७०० ते २२ हजार ५०० रुपये आहे. याच वेळी को-लिव्हिंगचे सरासरी मासिक भाडे ९ हजार ५०० ते १५ हजार ७०० रुपये आहे. त्यामुळे स्वतंत्र घर भाड्याने घेण्यापेक्षा को-लिव्हिंगमध्ये राहणे मुंबईत २० ते ३५ टक्के आणि पुण्यात २५ ते ३० टक्के स्वस्त आहे. पुण्याचा विचार करता हिंजवडी, विमाननगर, बाणेर, खराडी, बालेवाडी, मगरपट्टा, कल्याणीनगर आणि कोथरूड या परिसरात या को-लिव्हिंग सुविधा अधिक आहेत. पुण्यात माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांच्या परिसरात या सुविधांची संख्या अधिक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sanjay.jadhav@expressindia.com