रशियाकडून खनिज तेल खरीदण्याच्या मुद्द्यावर नाराज झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठवड्याभरात भारतावर २५ अधिक २५ असे ५० टक्के जबर आयात शुल्क अर्थात टॅरिफ लावले आहे. यांतील पहिले टॅरिफ भारत-अमेरिका व्यापारातील तफावत खूपच अधिक असल्याबद्दल लावले गेले. तर रशियाकडून भारत खनिज तेल आयात थांबवण्याची कोणतीही चिन्हे न दिसल्याने दुसऱ्या टप्प्यातील टॅरिफ ‘शिक्षा’ म्हणून लावले जाणार आहे. एके काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ मित्र मानले जाणारे ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष बनल्यानंतर अक्षरशः भारतद्वेष फुत्कारत आहेत. स्वातंत्र्यानंतर काही भारतद्वेष्टे अमेरिकी अध्यक्ष भारताने पाहिले आहेत. भारताला सतत इशारे देणारे आणि दुसरीकडे पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणारे ट्रम्प या मालिकेतील सर्वांत खडतर अध्यक्ष ठरू लागले आहेत.

मैत्रीपूर्ण अमेरिकी अध्यक्ष

बिल क्लिंटन, जॉर्ज बुश धाकटे, बराक ओबामा आणि काही प्रमाणात जो बायडेन यांनी भारताविषयी नेहमीच मित्रत्वाची भूमिका घेतली. बिल क्लिंटन हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे १९९०च्या सुरुवातीस पाकिस्तानधार्जिणे समजले जायचे. काश्मीर मुद्द्यावर त्यांच्या प्रसासनाने भारताची कोंडी करण्याचे प्रयत्न केल्याचे विश्लेषक सांगतात. पण क्लिंटन यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये परिस्थिती विलक्षण पालटली. उदारीकरणामुळे भारताची अर्थव्यवस्था खुली झाली होती. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आयटी प्रशिक्षित मनुष्यबळ दाखल होत होते. त्यामुळे अमेरिकेचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्या काळात भारताने अणुस्फोट चाचण्या घेतल्या, तरी अमेरिकेने सौम्य निर्बंध लादले. जॉर्ज बुश धाकटे यांच्या पहिल्या टर्ममध्ये ९/११ चा हल्ला झाल्यानंतर दहशतवादाची झळ सातत्याने पोहोचणाऱ्या भारताविषयी अमेरिकी प्रशासनाची दृष्टी बदलली. बुश यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये तर भारत-अमेरिकी नागरी आण्विक करारही झाला. बराक ओबामा यांच्या दोन्ही टर्ममध्ये भारत-अमेरिकी मैत्री नव्या उंचीवर पोहोचली. त्यांनी दोन वेळा भारताचा दौरा केला. एकविसाव्या शतकातील सर्वांत महत्त्वाची भागीदारी या शब्दांत ओबामा यांनी भारत-अमेरिका मैत्रीचे वर्णन केले. वेगाने विस्तारणारी अर्थव्यवस्था आणि सक्षम लोकशाही व्यवस्था ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली.

भारतद्वेष्टे अमेरिकी अध्यक्ष

यायादीमध्ये सर्वांत वरचे नाव अर्थातच रिचर्ड निक्सन यांचे घ्यावे लागेल. तत्कालीन भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी अपशब्द उच्चारणे, १९७१मधील युद्धात पाकिस्तानला जाहीर पाठिंबा देताना भारताच्या विरोधात आरमार धाडणे या कृत्यांमुळे निक्सन कायम स्मरणात राहतील. त्यांच्या आधीचे अध्यक्ष लिंडन जॉन्सन हेही पाकिस्तानधार्जिण होते. शीतयुद्धाच्या त्या काळात भारताला अमेरिकेने सोव्हिएत रशियाचा मित्र म्हणूनच पाहिले. भारताचे अलिप्ततेचे परराष्ट्र धोरण जॉन्सन यांना संशयास्पद वाटत होते. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी पाकिस्तानला मदत केली होती. त्यांचा भारतद्वेष निक्सन यांच्याइतका टोकाचा नव्हता. भारताला त्यांनी काही वेळा धान्याची मदत केली. जॉन्सन यांच्याप्रमाणेच आणखी एक अध्यक्ष जिमी कार्टर यांनाही भारताच्या सोव्हिएतमैत्रीविषयी संशय वाटत होता. शिवाय ते अण्वस्त्रप्रसारबंदीचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्याच वेळी अणुऊर्जा तंत्रज्ञान विकसित करण्याचे भारताचे प्रयत्न सुरू होते आणि अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर सही करण्याविषयी कार्टर यांच्या आग्रहास भारताने जुमानले नव्हते. कार्टर प्रशासनानेही पाकिस्तानची बाजू अनेक प्रसंगांमध्ये घेतली होती.

व्यक्तिगत मैत्री पण राष्ट्रसंबंध कोरडे

जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष असताना तत्कालीन भारतीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. त्यांचे स्वागत करण्यासाठी केनेडी स्वतः विमानतळावर राजशिष्टाचाराचे संकेत बाजूला सारून हजर राहिले होते. नेहरू यांच्याविषयी जगभर लोकशाही वर्तुळात असलेल्या आदरभावातून हे घडले होते. पण त्यावेळी भारताचा ओढा सोव्हिएत रशियाकडे होता, याची दखल अमेरिकेने घेतली होती. रोनाल्ड रीगन अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन्ही पंतप्रधानांचे स्वागत व्हाइट हाऊसमध्ये वेगवेगळ्या टर्ममध्ये केले होते. पण त्यांच्यातील स्नेहभावाचे प्रतिबिंब भारत-अमेरिका संबंधांमध्ये फारसे उमटले नाही. उलट पाकिस्तानला एफ – १६ लढाऊ विमाने देण्याचा करार रीगन यांच्याच काळात प्रथम चर्चिला गेला होता.

ट्रम्प यांचे बदलते रंग

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये (२०१६-२०२०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले. मोदी यांनी तर शिष्टाचाराचे संकेत मोडून ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ असा नाराही दिला होता. ‘हाउडी मोदी’सारख्या समारंभांतून ट्रम्प-मोदी मैत्री दृढ झाली होती. ट्रम्प यांचे अहमदाबादमध्येही जंगी स्वागत झाले. त्या काळातील अमेरिकेच्या धोरणानुसार, चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी अमेरिकेने भारताशी मैत्री वाढवली. पण हा मैत्रीभाव ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर आटू लागला आहे. सप्टेंबर २०२४मध्ये मोदी अमेरिकेते गेलेले असताना त्यावेळी अध्यक्ष नसलेले ट्रम्प यांनी त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मोदी यांनी ती दिली नाही, यामुळे ट्रम्प प्रचंड नाराज झाल्याचे सांगितले जाते. शिवाय राजकारणी होण्याआधी ट्रम्प हे व्यापारी आहेत. भारत हा परदेशी मालावर आकारत असलेल्या कथित उच्च शुल्काविषयी ते खूप आधीपासून नाराजी व्यक्त करत. अध्यक्ष बनल्यानंतर या नाराजीला अधिक धार आली. शिवाय भारताने रशियाकडून तेलखरेदी अव्याहत सुरू ठेवली नि आपल्या इशाऱ्यांना तो बदला नाही हे ट्रम्प यांच्या जिव्हारी लागले असावे. तशात भारतातील कृषी क्षेत्र आणि डेअरी क्षेत्र अमेरिकी मालाला खुले करण्यास भारताकडून होत असलेल्या आडकाठीसही ट्रम्प वैतागले असावेत. आतापर्यंत मेक्सिको, कॅनडा, चीन आणि ब्राझील या चारच देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवला आहे. भारताने आजवर सौम्य नाराजीच व्यक्त केली आहे. पण ट्रम्प यांचा नूर आणि भारताचा निर्धार पाहता, भविष्यात दोन्ही देशांमध्ये अभूतपूर्व कटुता निर्माण होण्याचीच चिन्हे आहेत.