गाझापट्टीतील हमास संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक हल्ला केल्यामुळे इस्रायलने गाझापट्टीची नाकेबंदी केली असून जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत. गाझापट्टीत बंदिस्त झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना शेजारी असलेले इजिप्त आणि जॉर्डन देश आश्रय का देत नाहीत? असा प्रश्न विचारला जात आहे. इस्रायलच्या दुतर्फा असलेले आणि गाझापट्टी आणि वेस्ट बँक या प्रदेशाची सीमा लागून असलेल्या देशांनी पॅलेस्टिनी नागरिकांना आपल्या देशात घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जॉर्डनमध्ये आधीपासूनच मोठ्या प्रमाणात पॅलेस्टिनी लोकसंख्या आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल सिसी यांनी बुधवारी (१८ ऑक्टोबर) इस्रायल-हमास युद्धावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “हे युद्ध फक्त गाझापट्टीवर शासन असलेल्या हमासच्या विरोधात नसून या माध्यमातून गाझापट्टीतील रहिवाश्यांना इजिप्तमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होत आहे.” या प्रयत्नामुळे इजिप्तमधील शांतता धुळीस मिळेल, असेही ते म्हणाले.

जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जॉर्डनमध्ये निर्वासितांना जागा नाही, इजिप्तमध्येही नाही.” इजिप्त आणि जॉर्डनने पॅलेस्टिनी नागरिकांना आश्रय देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. पॅलेस्टिनींना युद्धाच्या भीतीने कायमचे गाझापट्टीतून हुसकावून लावायचे आणि वेगळ्या पॅलेस्टाईन राज्याची मागणी या निमित्ताने निष्प्रभ करायची, अशी इस्रायलची योजना असू शकते, अशी भीती या देशांना वाटते. अल सिसीदेखील म्हणाले की, गाझापट्टीतून मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडल्यामुळे इजिप्तच्या सिनाई द्विपकल्पावर ते ताबा घेण्याची शक्यता वाटते. या ठिकाणाहून त्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यास, आमच्या दोन देशांमध्ये झालेला ४० वर्षांपूर्वीचा शांतता करार भंग होऊ शकतो.

हे वाचा >> इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे वैर कधीपासून आहे? आतापर्यंत कितीवेळा झाला संघर्ष?

इजिप्त आणि जॉर्डनने अशी भूमिका घेण्यामागे कोणती कारणे आहेत? पॅलेस्टिनी नागरिकांना कुणीही थारा का देत नाही? याबद्दल घेतलेला हा आढावा ….

विस्थापनाचा इतिहास

पॅलेस्टाईनला विस्थापनाचा मोठा इतिहास आहे. १९४८ मध्ये जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली, त्यावेळी जवळपास सात लाख पॅलेस्टिनी नागरिक आजच्या इस्रायलच्या भूभागातून बाहेर हुसकावले गेले. पॅलेस्टिनी नागरिक या घटनेला ‘नकबा’ असे म्हणतात. हा अरेबिक शब्द असून त्याचा अर्थ ‘आपत्ती’ किंवा अचानक कोसळलेले संकट असा होतो.

१९६७ मध्ये मध्य आशियाच्या युद्धात इस्रायलने वेस्ट बँक आणि गाझापट्टीवर आपली पकड घट्ट केली, त्यानंतर तीन लाखांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांनी पॅलेस्टाईनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यातील बहुसंख्य लोक जॉर्डनमध्ये गेले. पॅलेस्टाईनमधील निर्वासित आणि त्यांचे वंशज यांची संख्या सहा दशलक्ष एवढी झाली असून यातील बहुसंख्य लोक वेस्ट बँक, गाझा, लेबनॉन, सीरिया आणि जॉर्डन या ठिकाणी शिबिरे आणि सामुदायिक वसाहती करून राहत आहेत. पॅलेस्टिनी नागरिक अशाप्रकारे इतर अरब देशांमध्ये आणि काही पाश्चिमात्य देशांमध्ये जाऊन स्थायिक झाले आहेत.

१९४८ सालचे युद्ध थांबल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईन बाहेर गेलेल्या निर्वासितांना पुन्हा घेण्यास विरोध केला. तेव्हापासून पॅलेस्टिनी निर्वासितांना पुन्हा एकदा देशात घेऊन शांतता करार प्रस्थापित करण्याची पॅलेस्टाईनची मागणी इस्रायलने धुडकावून लावली आहे. जर निर्वासितांना आता पुन्हा येण्याची मुभा दिली तर ज्यू बहुल असलेल्या इस्रायलला धोका निर्माण होऊ शकतो, असा प्रतिवाद इस्रायलकडून करण्यात येत आहे. इजिप्तलाही इतिहासाच्या पुनरावृत्तीची भीती वाटत आहे. पॅलेस्टाईनमधील निर्वासित गाझा सोडून इजिप्तमध्ये आल्यास इथली शांतता भंग होऊ शकते, असे त्यांना वाटते.

पॅलेस्टाईनच्या बाहेर पडल्यानंतर परतण्याची खात्री नाही

इस्रायल आणि हमास यांच्यात भडकलेले युद्ध कधी थांबेल याची कुणालाही कल्पना नाही. इस्रायलने हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधलेला दिसतो. पण, हमासचा खात्मा झाल्यानंतर काय? गाझावर कोण शासन करणार? याचेही उत्तर कुणाकडे नाही. जर इस्रायलने या प्रदेशावर पुन्हा नियंत्रण मिळवले तर भविष्यात पुन्हा एकदा संघर्षाची भावना निर्माण होऊ शकते, असेही सांगितले जाते.

हे वाचा >> गाझापट्टीला जगातील सर्वात मोठे ‘खुले कारागृह’ का म्हणतात?

इस्रायली लष्कराने सांगितले की, गाझापट्टीच्या उत्तर भागात राहणारे पॅलेस्टिनी नागरिक लष्कराचा आदेश पाळून सध्या दक्षिण दिशेला गेल्यास, युद्ध समाप्तीनंतर त्यांना पुन्हा आपल्या देशात परतण्याची मुभा दिली जाईल. मात्र, इजिप्त दिलासा देण्यास तयार नाही. अब्देल फत्ताह अल सिसी यांनी म्हटले की, इस्रायलचे समाधान होत नाही, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहू शकते. दहशतवाद्यांचा खात्मा झालेला नाही, असा मुद्दा इस्रायलकडून उपस्थित केला जाऊ शकतो. अल सिसी यांनी प्रस्ताव दिल्यानुसार, लष्करी कारवाई संपेपर्यंत इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना गाझापट्टीच्या शेजारी असलेल्या नेगेव्ह वाळवंटात (इस्रायलचा भाग) आश्रय द्यावा.

इंटरनॅशनल क्राइसिस ग्रुपचे उत्तर आफ्रिका प्रकल्प संचालक रिकार्डो फाबियानी म्हणाले, “गाझाबाबत इस्रायलचा नेमका विचार काय आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. गाझामधून लोकांना हुसकावून लावणे हे अधिक धोकादायक बनू शकते. या संभ्रमावस्थेमुळे शेजारी राष्ट्रांमध्येही भीती पसरू शकते.”

इस्रायलने गाझापट्टीला मानवतावादी मदत मिळू देण्यासाठी सहकार्य करावे, असा दबाव इजिप्तकडून टाकण्यात येत आहे. यानंतर बुधवारी (१८ ऑक्टोबर) इस्रायलने म्हटले की, त्यांनी कधीही मानवतावादी मदत मिळू देण्यास विरोध केलेला नाही. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, इजिप्त आधीपासूनच आर्थिक संकटाचा सामना करत आहे. इजिप्तमध्ये आधीपासूनच नऊ दशलक्ष निर्वासित आणि स्थलांतरित नागरिक आश्रयास आहेत. यापैकी तीन लाख सुदानी नागरिक याच वर्षी सुदानमधील युद्धामुळे इजिप्तमध्ये आश्रयास आले आहेत.

अरब राष्ट्र आणि अनेक पॅलेस्टिनी नागरिकांना भीती आहे की, हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल ही संधी साधून भूभागाच्या रचनेत कायमचे बदल करण्यासाठी प्रयत्न करेल. गाझा, वेस्ट बँक आणि पूर्व जेरूसलेमला स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्र घोषित करावे, अशी पॅलेस्टिनी नागरिकांची मागणी आहे. १९६७ साली इस्रायलने या भूभागावर ताबा मिळविला आहे. अब्देल फत्ताह अल सिसी यांनी बुधवारी (१८ ऑक्टोबर) पुन्हा एकदा इशारा दिला की, गाझामधून होणारे विस्थापन हे पॅलेस्टाईन राष्ट्राच्या मागणीला तिलांजली देणारे आहे. आमच्या प्रदेशातील ही एक महत्त्वाची मागणी आहे. अल सिसी पुढे म्हणाले की, लष्कर उभारता येणार नाही, या अटीवर पॅलेस्टाईन राष्ट्राला मान्यता दिली गेली असती, तर आज अशी युद्धाची परिस्थिती निर्माणच झाली नसती.

हे वाचा >> मुंबईपेक्षाही लहान असलेली ‘गाझा’पट्टी गेल्या १०० वर्षांत युद्धभूमी कशी ठरली?

कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पिस या संस्थेचे संशोधक सहयोगी एच. ए. हेलियर म्हणाले की, इतिहासातील सर्व घटनांचा बारकाईने अभ्यास केल्यास असे दिसते की, जेव्हा जेव्हा पॅलेस्टिनी नागरिक पॅलेस्टाईन भूमीच्या बाहेर गेले आहेत, तेव्हा तेव्हा त्यांना पुन्हा त्या प्रदेशात पाऊल ठेवता आलेले नाही. गाझामधून पॅलेस्टिनी वंशाच्या नागरिकांना बळजबरीने हुसकावून लावू नये, अशी खबरदारी इजिप्तकडून घेतली जात आहे.

हमासमुळे इजिप्तची काळजी वाढली

दुसरीकडे इजिप्तला अशीही भीती वाटत आहे की, गाझामधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्यास त्यांच्यासह हमास किंवा इतर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचेही स्थलांतर आपल्या भूमीत होऊ शकते. यामुळे सिनाई द्विपकल्पात आणखी मोठे संकट उभे राहू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी इजिप्त इस्लामिक कट्टरतावाद्यांविरोधात लढाई लढत आहे. हमासने येथील दहशतवाद्यांना मदत पुरविल्याचाही आरोप मध्यंतरी इजिप्तने केला होता. २००७ साली गाझापट्टीवर हमासने सत्ता स्थापन केल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीच्या सीमा बंद केल्या होत्या. या निर्णयाला म्हणूनच इजिप्तने पाठिंबा दर्शविला होता.

आणखी वाचा >> इस्रायल-हमास युद्ध चिघळणार? गाझातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश, तर UNकडून विनाशकारी परिणामांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाझामध्ये हमास आणि पॅलेस्टिनी लोकांसाठी अनेक वस्तूंची तस्करी करण्यासाठी सीमेवर असलेल्या भूसुरुंगाचा वापर करण्यात येत होता. इजिप्तने हे भूसुरुंग उदध्वस्त केले. सिनाई द्विपकल्पावरील बंडखोरी शमवल्यानतंर इजिप्तला सुरक्षेच्या दृष्टीने आणखी नव्या अडचणी नको आहेत, अशी माहिती रिकार्डो फाबियानी यांनी दिली.