Meta is Firing 600 Employees टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मेटाने आपल्या एआय विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने एआय सुपरइंटेलिजन्स प्रकल्पासाठी एक टीम तयार केली होती. त्यासाठी अब्जावधी डॉलर्सही खर्च करण्यात आले होते. मात्र, आता याच विभागातील तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. त्यामुळे आता एआय नोकऱ्याही सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. नोकर कपात करण्यात आल्याची माहिती मुख्य एआय अधिकाऱ्यांनी एका अंतर्गत मेमोमध्ये दिली आहे. या मेमोमध्ये नक्की काय म्हणण्यात आले आहे? ६०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याचे कारण काय? जाणून घेऊयात…
शेकडो कर्मचाऱ्यांची कपात
- फेसबुकची मूळ कंपनी मेटा त्यांच्या ‘सुपरइंटेलिजन्स लॅब्स’ विभागातील ६०० कर्मचाऱ्यांची कपात करत आहे, अशी माहिती मुख्य एआय अधिकाऱ्यांनी एका अंतर्गत मेमोमध्ये दिली आहे.
- अलेक्झांडर वांग यांनी सांगितले की, या कपातीमुळे कंपनीला अधिक जलद गतीने निर्णय घेण्यास मदत होईल, असे वृत्त ‘बिझनेस इनसाइडर’ने दिले आहे.
- वांग यांनी अंतर्गत मेमोमध्ये लिहिले आहे की, “आमच्या टीममधील सदस्य संख्या कमी केल्याने निर्णय घेण्यासाठी कमी चर्चा कराव्या लागतील. प्रत्येक व्यक्ती अधिक जबाबदारी उचलेल, तसेच त्यांची कामाची व्याप्ती आणि प्रभाव वाढेल.”
त्यांनी पुढे सांगितले की, प्रभावित कर्मचाऱ्यांना याची सूचना देण्यात आली आहे. या मेमोशिवाय मेटाने कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. काही महिन्यांपूर्वीच मेटाने ओपनएआय (OpenAI), गुगल डीपमाईंड (Google DeepMind), ॲपल (Apple) आणि इतर कंपन्यांमधील अभियंते (Engineers) आणि संशोधकांना (Researchers) कामावर घेण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च केले होते. मात्र, आता याच कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
अलेक्झांडर वांग यांनी मेमोमध्ये काय म्हटले?
या मेमोमध्ये म्हणण्यात आले आहे, “आम्ही उद्योगातील सर्वात प्रतिभावान टीम तयार करण्याच्या दिशेने पाऊल उचलत ‘एमएसएल’ (MSL – Meta Superintelligence Labs) मध्ये काही बदल केले आहेत. आमच्या टीमची संख्या कमी केल्यामुळे प्रत्येक व्यक्ती अधिक जबाबदारीने काम करेल. आपल्या सहकाऱ्यांना निरोप देणे हा कधीही सोपा निर्णय नसतो. ही सर्वजण अत्यंत प्रतिभावान आहेत, त्यांनी कंपनीच्या एआय प्रकल्पामध्ये खूप मेहनत घेतली आणि योगदान दिले आहे. उत्तर अमेरिकेत ज्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे त्यांना आधीच सूचित करण्यात आले आहे.”
यापैकी बहुतांश प्रभावित कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये नवीन काम शोधण्यात आम्ही मदत करत आहोत. त्यांच्या कौशल्याशी जुळणारे काम शोधण्यासाठी आणि जलद भरती प्रक्रियेद्वारे त्यांना कामावर घेण्यासाठी, आम्ही भरती करणाऱ्यांच्या ‘टायगर टीम’ची स्थापना केली आहे, असेही ते म्हणाले. आम्ही उद्योगातील उत्कृष्ट एआय विशेषज्ञांना कामावर घेणे सुरू ठेवू. ‘एमएसएल’ला अधिक वेगाने काम करता यावे, हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही ज्या मॉडेल्सचे प्रशिक्षण देत आहोत, आम्ही जी उत्पादने तयार करत आहोत, त्याबद्दल उत्साही आहोत, असेही त्यांनी या मेमोमध्ये स्पष्ट केले.
मेटा ६०० कर्मचाऱ्यांची कपात का करत आहे?
‘मेन्लो पार्क’ येथील मेटाच्या नोकर कपातीचा परिणाम त्यांच्या चार भागांच्या एआय युनिटपैकी तीन भागांवर होणार आहे. या कपातीमध्ये कंपनीच्या जुन्या एआय संशोधन टीममधील आणि एआय केंद्रित उत्पादन व पायाभूत सुविधा युनिटमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात आहे. ‘ॲक्सिओस’च्या वृत्तानुसार, त्यांच्या लहान ‘टीबीडी लॅब’ टीमवर नोकर कपातीचा परिणाम होणार नाही. ‘टीबीडी लॅब’ अत्याधुनिक एआय मॉडेल्सवर काम करणारा एक विभाग आहे.
‘ॲक्सिओस’च्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना बुधवारी सकाळी ७ वाजण्यापूर्वीच कळले की त्यांची नोकरी गेली आहे. ‘सीएनबीसी’ला नोकरी गेलेल्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे की, ते २१ नोव्हेंबरपर्यंत ‘नॉन-वर्किंग नोटिस पीरियड’मध्ये असतील आणि या वेळेचा उपयोग ते मेटा मध्ये दुसरी भूमिका शोधण्यासाठी करू शकतात. जर त्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना सेव्हरन्स पॅकेज स्वीकारता येईल, ज्यात किमान १६ आठवड्यांचा पगार मिळेल, असे ‘सीएनबीसी’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.
प्रभावित कर्मचाऱ्यांना या निर्णयाने धक्का बसला आहे. मात्र, मेमोनुसार, त्यांना १६ आठवड्यांचे सेव्हरन्स आणि कंपनीत पूर्ण केलेल्या प्रत्येक वर्षासाठी अतिरिक्त दोन आठवड्यांचा पगार दिला जाईल, असे सांगण्यात आले आहे. असे असले तरी कंपनीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचारी चिंतेत आहेत आणि नाराज आहेत.
एआय नोकऱ्याही आता सुरक्षित नाहीत?
सूत्रांनी ‘सीएनबीसी’ला सांगितले की, या कपातीचा परिणाम ‘टीबीडी लॅब्स’मधील कर्मचाऱ्यांवर होणार नाही. हा वांग यांच्या नेतृत्वाखालील एक नवीन विभाग आहे. या विभागात वर्षाच्या सुरुवातीला कामावर घेतलेल्या अनेक उच्च-प्रोफाइल एआय तज्ज्ञांचा समावेश आहे. या युनिटला कपातीतून वगळण्यात आले आहे. परिस्थितीची माहिती असलेल्या लोकांच्या मते, मेटाच्या आत अनेकांना एआय विभाग सर्वात सुरक्षित वाटत होता. मात्र, या वृत्तावरून तसे दिसत नाही. ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
लोकांनी म्हटले की, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील नोकऱ्याही सुरक्षित राहिल्या नाहीत. जुन्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या निर्णयामुळेही लोकांनी संताप व्यक्त केला आहे. नोकर कपातीच्या या बातमीने नोकरीच्या सुरक्षिततेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “कल्पना करा की तुम्ही अनेक वर्षांपासून मेटामध्ये काही लाख डॉलर्ससाठी काम करत आहात आणि अचानक तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.” दुसऱ्या एका मेटा कर्मचाऱ्याने लिहिले, “या अब्जाधीशाला विसर पडला आहे की लोक अन्नासाठी नोकरीवर अवलंबून असतात.”
