– अन्वय सावंत

‘फिफा’ विश्वचषक या क्रीडा जगतातील सर्वांत लोकप्रिय स्पर्धेला जवळपास शतकभराचा इतिहास आहे. दर चार वर्षांनी या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जाते. मात्र, आता यात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली असून ‘फिफा’चे अध्यक्ष जिआनी इन्फान्टिनो फुटबॉल विश्वचषक दर दोन वर्षांनी आयोजित करण्याबाबत आग्रही आहेत. त्यांनी याबाबतचा प्रस्ताव ‘फिफा’च्या सदस्यीय संघटनांपुढे ठेवला आहे. त्यांच्या या प्रस्तावाचे जगभरातील काही चाहते, प्रशिक्षक, खेळाडू आणि विविध खंडांतील फुटबॉल नियामक मंडळांनी स्वागत केले तर अन्य काहींनी त्याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या प्रस्तावावरून पुढील काही काळ वादविवाद सुरू राहण्याची दाट शक्यता आहे.

नक्की काय आहे ‘फिफा’चा प्रस्ताव?
१९३० सालापासून (दुसऱ्या महायुद्धामुळे १९४२ आणि १९४६चा अपवाद वगळता) दर चार वर्षांनी ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. मात्र, आता ‘फिफा’चे अध्यक्ष इन्फान्टिनो यांनी दर दोन वर्षांनी विश्वचषकाच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवला आहे. इंग्लंडमधील नामांकित फुटबॉल क्लब आर्सेनलचे माजी प्रशिक्षक आर्सन वेंगर यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी मेमध्ये सौदी अरेबियन फुटबॉल महासंघाने सर्वांत आधी याबाबतची संकल्पना मांडली होती. वेंगर सध्या ‘फिफा’च्या जागतिक फुटबॉल विकास कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवत आहेत.

प्रस्तावामागे काय कारण?
वेंगर यांच्या मते, ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवण्यात आल्यास आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांची संख्या कमी होईल आणि खेळाडूंना विश्रांतीसाठी अधिक वेळ मिळेल. त्यामुळे खेळाडूंवरील अतिरिक्त प्रवास आणि सामन्यांचा ताणही कमी होईल, अशी ७२ वर्षीय वेंगर यांची धारणा आहे. तसेच ‘फिफा’च्या महसुलात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको संयुक्तरित्या २०२६ सालच्या ‘फिफा’ विश्वचषकाचे आयोजन करणार असून त्यानंतर दोन वर्षांनी (२०२८) या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी असा वेंगर यांचा विचार आहे.

मार्गातील अडथळे कोणते?
सध्या दर चार वर्षांनी ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येते. तसेच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि विविध खंडांतील राष्ट्रीय संघांच्या अन्य मुख्य फुटबॉल स्पर्धा (युरो, कोपा अमेरिका इ.) यासुद्धा चार वर्षांच्या कालावधीने आयोजित केल्या जातात. मात्र, त्यांचे वेळापत्रक एकमेकांसाठी अडचण निर्माण करत नाही. परंतु दर दोन वर्षांनी ‘फिफा’ विश्वचषक आयोजनाच्या प्रस्तावाला संमती मिळाल्यास भविष्यात ऑलिम्पिक आणि ‘फिफा’ विश्वचषक एकाच वर्षी होण्याचा धोका आहे. २०२८मध्ये लॉस एंजलिस येथे ऑलिम्पिक रंगणार असून वेंगर यांच्या योजनेनुसार याच वर्षी विश्वचषकही होऊ शकेल. त्यामुळे जागतिक क्रीडा संघटनांना अडचणींचा सामना करावा लागेल.

प्रस्तावाला कोणाचा विरोध?
‘फिफा’च्या या प्रस्तावाला अनेक स्तरातून विरोध होत आहे. विशेषत: युरोपातील फुटबॉल नियामक संघटना असलेल्या ‘युएफा’ने सर्वाधिक विरोध दर्शवला आहे. ‘फिफा’च्या या प्रस्तावात बऱ्याच त्रुटी असून त्यांनी अन्य फुटबॉल महासंघांचे मत विचारात घेतले नसल्याचे ‘युएफा’चे अध्यक्ष अलेक्झांडर शेफेरीन यांनी म्हटले आहे. ‘युएफा’ला जागतिक फुटबॉलमध्ये विशेष महत्त्व असून जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल क्लब हे युरोपात आहेत. तसेच चॅम्पियन्स लीगसारख्या स्पर्धेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात महसूल उपलब्ध होतो. मात्र, दर दोन वर्षांनी विश्वचषक झाल्यास या स्पर्धांचे महत्त्व कमी होण्याचा धोका आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रस्तावाला कोणाचा पाठिंबा?
जगभरातील ६० टक्क्यांहून अधिक फुटबॉल चाहत्यांनी, दर दोन वर्षांनी विश्वचषकाच्या आयोजनाला पाठिंबा दर्शवल्याचा दावा ‘फिफा’ने केला आहे. तसेच आफ्रिकन महासंघाचाही (५४ सदस्य राष्ट्रे) त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. उत्तर अमेरिकन महासंघाने (३५ सदस्य राष्ट्रे) या प्रस्तावाबाबत विचार करण्याची तयारी दर्शवली आहे. आशियाई महासंघाने (४६ सदस्य राष्ट्रे) या प्रस्तावाला पाठिंबा दिलेला नसला तरी विरोधही केलेला नाही. त्यामुळे ‘फिफा’चे अध्यक्ष इन्फान्टिनो यांच्या दर दोन वर्षांनी विश्वचषक आयोजनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याच्या आशा अजून कायम आहेत.