Gold Silver Prices Drop Today : काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीआधी झपाट्याने वाढलेले सोने-चांदीचे दर लक्ष्मीपूजनानंतर कमी झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी जागतिक बाजारात मौल्यवान धातूच्या किमतीत तब्बल १० टक्क्यांची घसरण झाली आहे. आगामी काळात या किमती आणखी कमी होण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तवली आहे. सणासुदीच्या काळात गगनाला भिडलेले सोने-चांदीचे दर अचानक कमी का झाले? नेमकी काय आहेत यामागची कारणे? त्याचाच हा आढावा…
या महिन्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दराने सुमारे ४,३८१ डॉलर प्रति औंस इतका टप्पा गाठला होता; तर चांदीचे दर ५४.५ डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले होते. मात्र, ऑक्टोबरच्या अखेरीस या दोन्ही धातूंच्या किमतींत जवळपास १० टक्के इतकी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मनी कंट्रोल या वेबसाइटनुसार, भाऊबीजेच्या दिवशी (२३ ऑक्टोबर) देशात २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रतितोळा (१० ग्रॅम) एक लाख २३ हजार २१० रुपये इतका आहे. त्याशिवाय २२ कॅरेट शुद्धतेचे सोने प्रतितोळा एक लाख १२ हजार ९४३ रुपये इतक्या दराने विकले जात आहे. चांदीच्या दराबाबत बोलायचे झाल्यास एक किलो चांदीचा दर एक लाख ४७ हजार ३८० रुपये इतका आहे.
सोने-चांदी दरात का होतेय घसरण?
सराफा तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीचे वाढलेले दर अचानक कमी होण्याची काही प्रमुख कारणे आहेत. त्यातील पहिले कारण भूराजकीय तणावातील शिथिलता हे आहे. इस्रायल व इराण यांच्यातील निर्माण झालेला तणाव कमी झाला आहे. त्याबरोबर पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातील संघर्षही जवळपास संपल्यात जमा आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भडकलेले युद्ध शमवण्यात काही देशांना यश आले आहे. त्यातच अमेरिकन डॉलरचा मजबूत होणार दर आणि जागतिक व्यापारात अनिश्चितता कमी करण्यासाठी अमेरिकेने केलेल्या नव्या करारांकडे वाटचाल यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत.
सोन्याचे दर कमी होणार की वाढणार?
जागतिक स्तरावर तणाव निर्माण झाल्यानंतर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदी खरेदी करण्याकडे वळले होते. आता हा तणाव संपुष्टात आल्यानंतर आणि मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यानंतर बहुतांश गुंतवणूकदारांनी नफा कमवण्यासाठी सोने-चांदीची विक्री सुरू केली आहे. परिणामी खरेदी कमी आणि विक्री जास्त होत असल्याने पिवळ्या धातूंच्या किमती कमी झाल्या आहेत. दिवाळीनंतर गुंतवणुकदार पुन्हा एकदा शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोने-चांदीचे गगनाला भिडलेले दर आणखी झपाट्याने खाली येऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
सोने-चांदी दराबाबत तज्ज्ञ काय म्हणाले?
एस. एस. वेल्थ स्ट्रीट कंपनीचे संस्थापक सुगंधा सचदेवा यांनी सांगितले की, सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये झालेली सध्याची घसरण ही मुख्यत्वे नफावसुली आणि जागतिक संकेतांमधील बदलांमुळे झाली आहे. “दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदार त्यातून नफा कमावण्याची संधी साधत आहेत. त्याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबरोबर व्यापार चर्चा करण्याची तयारी दर्शवल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीचे आकर्षण कमी झाले आहे. अमेरिकन डॉलरचा मजबूत होणारा दर या कारणामुळेही मौल्यवान धातूंची मागणी कमी झाली आहे,” असे सचदेवा यांनी स्पष्ट केले.
सोने-चांदी दर आगामी काळात किती राहू शकतो?
सचदेवा यांच्या म्हणण्यानुसार, विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याचे दर सुमारे ४३.८० डॉलर प्रति औंसवरून आता १० टक्क्यांनी कमी झाले आहेत. चांदीतही ५४.५ डॉलर प्रति औंसवरून तसाच घसरणीचा कल दिसून येत आहे. भारतातील सराफा बाजारामध्ये सध्या २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख २३ हजार २१० रुपये इतका आहे. आगामी काळात हा दर १,२५,००० ते १,२७,००० हजार रुपयांच्या आसपास राहू शकतो. त्याशिवाय चांदीचा दर १,४५,००० पर्यंत स्थिरावला जाऊ शकतो. या वर्षी सोन्याच्या किमतीत तब्बल ६५% वाढ झाल्यानंतर त्याच्या किमती आता एका विशिष्ट मर्यादित दिसतील, असेही सचदेवा यांनी सांगितले आहे.
सोन्या-चांदीचे दर झपाट्याने का उतरले?
मेहता इक्विटीज लिमिटेडचे कमोडिटीजचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री यांनी सांगितले की, भारत-अमेरिका व्यापार संबंध हळूहळू सुधारत असल्याने गुंतवणूकदारांना विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरक्षित मालमत्ता सोडून ते जोखीम असलेल्या मालमत्तांकडे (शेअर बाजार) वळताना दिसून येत आहेत. याच कारणामुळे सोन्या-चांदीच्या दरांत घसरण होताना पाहायला मिळत आहे. मौल्यवान धातूच्या किमतींत विक्रमी वाढ झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा कमावण्याच्या उद्देशाने त्याची विक्री सुरू केली आहे. परिणामी दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर सोने ४,०५० डॉलर आणि चांदी ४८ डॉलर प्रति औंसच्या आसपास स्थिर झाले आहेत. त्यातच सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांनी कमी खरेदी केल्याने किंवा त्याकडे पाठ फिरवल्यानेही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला आहे. कलंत्री पुढे म्हणाले की, सोन्या-चांदीच्या दरात तात्पुरती घसरण झाली असली तरी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात अधिक कपातीची अपेक्षा आणि जागतिक आर्थिक चिंता कायम आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचे दर अजूनही खूपच जास्त आहेत.
सोने-चांदीतील तेजीचा काळ संपला का?
सध्या सोने-चांदी दरात घसरण होत असली तरी हा तेजीचा अंत नाही, तर मोठ्या वाढीनंतर आलेला अल्पकालीन विराम आहे, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या वर्षी जागतिक स्तरावरील संघर्ष आणि आर्थिक मंदीच्या भीतीमुळे, तसेच बँकांकडून होत असलेल्या मोठ्या खरेदीमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींत तब्बल ६५ टक्यांहून अधिक वाढ झाली. सध्या भू-राजकीय तणाव काहीसा कमी झाल्यामुळे आणि गुंतवणूकदार पुन्हा शेअर बाजाराकडे वळल्यामुळे सोन्याची ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून असलेली मागणी कमी झाली आहे. मात्र, असे असले तरी सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता नाही. कारण- यूएस फेडरल रिझर्व्हने या महिन्याच्या अखेरीस अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कपात केली आहे. दरम्यान, जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष आता महागाईच्या आकडेवारीवर आणि मध्यवर्ती बँकांच्या निर्णयांवर केंद्रित झाले आहे. त्यामुळे सोने आणि चांदीचे दर स्थिर होतात की त्यात पुन्हा घसरण होते, हे पुढील काही आठवड्यांत स्पष्ट होणार आहे.
