-अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंजिनमध्ये आग लागल्याच्या काही घटनांमुळे अमेरिकन सैन्यदलाने आपल्या ताफ्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ४०० सीएच – ४७ चिनूक या मालवाहू हेलिकॉप्टरचा वापर थांबवून ती तूर्तास जमिनीवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देखभाल, दुरुस्ती (ओव्हरहॉल) झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये या घटना घडल्याची माहिती पुढे येत आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात देखील १५ चिनूक हेलिकॉप्टर आहेत. परंतु, भारतीय हवाई दलाने अद्याप तसा निर्णय घेतलेला नाही. कारण, स्थानिक पातळीवर तशी काही समस्या उद्भवलेली नाही. चिनूक हेलिकॉप्टरमध्ये उद्भवलेल्या समस्यांचा हा वेध.

अमेरिकेने चिनूकचे उड्डाण का थांबवले?

अलीकडच्या काळात काही चिनूक हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या. त्यात जीवितहानी झाली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकन सैन्यदलाने ताफ्यातील सर्व चिनूक हेलिकॉप्टर जमिनीवर (उड्डाण स्थगित) ठेवण्याचे निश्चित केले. अमेरिकन सैन्यदलांकडे ४०० बहुउद्देशीय, मालवाहू सीएच – ४७ चिनूक हेलिकॉप्टर आहेत. सैन्य दलाच्या मोहिमांमध्ये त्यांना हेलिकॉप्टर निर्माती बोईंग कंपनीचे पाठबळ मिळते. या संबंधीचे वृत्त दी वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे. इंधन गळती या घटनेला कारक ठरल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे जवानांच्या सुरक्षिततेसाठी उड्डाणे तात्पुरती थांबविली गेली. लवकरच या समस्येचे निराकरण केले जाईल. उड्डाणास ती सुरक्षित असल्याची खातरजमा करण्यात येणार आहे. सैन्य तुकडी आणि अवजड शस्त्र सामग्रीच्या वाहतुकीसाठी अमेरिकेने अफगाणिस्तान, इराक युद्धात चिनूकचा वापर केला आहे. १९६० मध्ये या मालवाहू हेलिकॉप्टरची रचना करण्यात आली होती. सहा दशकांपूर्वी रचना केलेले आणि आजपर्यंत सैन्यदलाच्या सक्रिय सेवेत असणारे हे एकमेव हेलिकॉप्टर आहे.

हेलिकॉप्टर, इंजिन निर्मात्याचे म्हणणे काय?

या घटनाक्रमावर चिनूक हेलिकॉप्टरची निर्मिती करणाऱ्या बोईंग कंपनीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. चिनूकमध्ये हनिवेल कंपनीची दोन टी ५५ शक्तिशाली इंजिन असतात. या कंपनीने इंजिनमधील काही सुटे भाग (रिंग) मूळ रचनेतील निकषाप्रमाणे नसल्याचे म्हटले आहे. चिनूकची अवजड सामग्री वाहतुकीची जी विलक्षण क्षमता आहे, त्यात या इंजिनचे महत्त्वाचे योगदान आहे. कालपरत्वे त्यात नियमित सुधारणा होऊन नवीन आवृत्ती समाविष्ट केली जाते. नवीन टी ५५ – ७१४ सी हे इंजिन अधिक विश्वासार्ह मानले जाते. २२ टक्के अधिक वजन उचलण्यास ते सक्षम आहे. शिवाय इंधन कार्यक्षमता आठ टक्के वाढल्याचा दावा केला जातो. हे इंजिन जुन्या टी ५५ – ७१४ ए इंजिनधारी चिनूकच्या अद्ययावतीकरणासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

या घटनाक्रमाचे भारतीय हवाई दलावर काय परिणाम होतील?

भारतीय हवाई दल १५ चिनूक हेलिकॉप्टर संचालित करते. अमेरिकेतील घटनाक्रमाचा भारतीय हवाई दलाच्या चिनूकच्या दैनंदिन वापरावर कोणताही परिणाम झालेला नाही. हवाई दल चिनूकचा नेहमीप्रमाणे वापर करीत आहे. त्यांना कुठल्याही समस्यांना तोंड द्यावे लागलेले नाही. अमेरिकेत ज्या चिनूकची देखभाल व दुरुस्ती (ओव्हरहॉल) झाली होती, त्यातील काही हेलिकॉप्टरच्या इंजिनला इंधन गळतीमुळे आग लागण्याच्या घटना घडल्याची माहिती प्राप्त होत आहे. तरीदेखील या संदर्भात हेलिकॉप्टर निर्मिती करणारी बोईंग आणि पेंटागॉनकडून अधिक तपशील मिळवून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार आहे.

ओव्हरहॉल आणि समस्येचा संबंध आहे का?

विशिष्ट उड्डाण तास पूर्ण करणाऱ्या विमान वा हेलिकॉप्टरमधील सर्व यंत्रणा, उपकरणे आणि सुट्या भागांची सखोलपणे केली जाणारी छाननी आणि त्या अनुषंगाने दुरुस्ती ही प्रक्रिया संपूर्ण देखभाल व दुरुस्ती (ओव्हरहॉल) म्हणून ओळखली जाते. नव्या हेलिकॉप्टरची बांधणी आणि कार्यरत हेलिकॉप्टरची पुनर्तपासणी यात फरक असतो. नव्या हेलिकॉप्टरची बांधणी करताना सर्व सुट्या भागांची निकषानुसार जोडणी करावी लागते. पुनर्तपासणीत मात्र काही वर्षे कार्यरत राहिलेल्या हेलिकॉप्टरचे सर्व भाग विलग करून सुट्या भागांची झीज, यंत्रणांमधील दोष यावर संशोधन केले जाते. प्रत्येक विभागाशी संबंधित प्रयोगशाळेत छाननीच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्णत्वास नेली जाते. दोष असलेले सुटे भाग काढून त्यांच्या जागी नवीन भाग बसविले जातात. ओव्हरहॉल झालेल्या अमेरिकन हेलिकॉप्टरमध्ये इंजिनला आग लागल्याच्या घटना घडत आहेत. हनिवेल कंपनीने इंजिनमधील काही सुटे भाग निकषानुसार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे देखभाल, दुरुस्तीत बदललेल्या काही सुट्या भागांनी नव्या समस्येला जन्म दिला का, हे पडताळणीअंती लवकरच स्पष्ट होईल.

भारतासाठी चिनूकचे महत्त्व काय?

प्रतितास ३१० किलोमीटर वेगाने मार्गक्रमण करण्याची क्षमता राखणारे चिनूक हे जगातील जलद हेलिकॉप्टर म्हणून गणले जाते. टी ५५ हे शक्तिशाली इंजिन आणि मागील व पुढील बाजुला असणारे व परस्परांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे दोन मोठे पंखे यामुळे त्यास अवजड सामग्री वाहताना स्थैर्य लाभते. एका वेळी ते ४५ जवानांची तुकडी अथवा ११ टन सामग्रीची वाहतूक करू शकते. युद्धजन्यस्थितीत सैन्यासह शस्त्रास्त्र वाहतुकीसाठी चिनूक उपयुक्त आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीत बचाव व मदत मोहिमेत ते प्रभावी कामगिरी करू शकते. या हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी सप्टेंबर २०१५ मध्ये भारत-अमेरिकेत आठ हजार कोटींचा करार झाला होता. मार्च २०१९ मध्ये ते हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट झाले. चंडीगड आणि आसाममधील मोहनबारी या हवाई तळांवर चिनूकची प्रत्येकी एक तुकडी तैनात आहे. पूर्व लडाखमध्ये चीनशी झालेल्या संघर्षात हलक्या वजनाच्या एम ७७७ तोफा आणि जवानांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील उंच पर्वतीय क्षेत्रात जलदपणे नेऊन चिनूकने आपले सामर्थ्य अधोरेखित केलेले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why has the us grounded its chinook helicopters and what it means for india print exp scsg
First published on: 02-09-2022 at 07:20 IST