Government ban on mercury makeup products भारतीय बाजारपेठेत सौंदर्यप्रसाधनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतात सौंदर्यप्रसाधनांची मोठी बाजारपेठ आहे. आपले सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक जण सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. अभिनेत्री व मॉडेल शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूमुळे अँटी एजिंग आणि स्कीन व्हाईटनिंग उत्पादनांच्या सुरक्षिततेबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोणते घटक आहेत? आणि ते आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात का? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.

मर्क्युरी असणारे सौंदर्यप्रसाधन मानवी शरीराला धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)कडून अशा फॉर्म्युलेशनवर बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली. त्यानंतर आता केंद्र सरकार मर्क्युरीवर आधारित सौंदर्यप्रसाधनांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. सरकार कोणकोणत्या सौंदर्यप्रसाधनांवर बंदी घालणार आहे? त्यामागील कारण काय? सौंदर्यप्रसाधने मानवी शरीरासाठी धोकादायक आहेत का? त्याविषयी जाणून घेऊयात.

सौंदर्यप्रसाधनांविरोधात सरकारचा नवीन निर्णय काय?

  • केंद्र सरकार ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मंजूर केलेल्या शिफारशींनुसार एक पीपीएम (पार्टस पर मिलियन ऑफ मर्क्युरी) असलेल्या सर्व मर्क्युरीवर आधारित सौंदर्यप्रसाधनांवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे.
  • ‘मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीमध्ये मर्क्युरी वापरण्यावर कडक निर्बंध लादले गेले पाहिजेत, अशी शिफारस ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने केली आहे.
  • भारतात सौंदर्यप्रसाधने नियम, २०२० च्या कलम ३९ (५) अंतर्गत मर्क्युरीचे प्रमाण आधीच मर्यादित आहे.
  • डोळ्यांसाठी असणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये मर्क्युरीची पातळी ०.००७ टक्क्यापेक्षा जास्त नसावी, असे नमूद करण्यात आले आहे. परंतु, आता डीसीजीआयला मर्क्युरीच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याच्या मिनामाटा कन्व्हेन्शनशी सुसंगत असलेले कठोर मानक हवे आहेत.
मर्क्युरी असणारे सौंदर्यप्रसाधन मानवी शरीराला धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

आता जर सरकारने डीसीजीआयच्या शिफारशी मान्य केल्या, तर सरकार मर्क्युरी असलेली सौंदर्यप्रसाधने २० अब्ज डॉलर्सच्या भारतीय सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारपेठेतून आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून टप्प्याटप्प्याने बंद करील, हे नक्की. त्याचाच एक भाग म्हणून सरकार कॉस्मॅटिक कंपन्यांना ते मर्क्युरी वापरतात की नाही हे स्वतः घोषित करण्यास सांगू शकते. त्यानंतर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ)सारख्या नियामकांकडून अचानक प्रयोगशाळेतील चाचण्या घेतल्या जाऊ शकतात. एका अधिकाऱ्याने ‘मिंट’ला सांगितले की, उत्पादकांना मर्क्युरीचा वापर स्वतः घोषित करावा लागेल आणि त्यांना मर्क्युरी टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी एक अंतिम मुदत द्यावी लागेल. या कंपन्यांना बाजारातून नमुने निवडून, सीडीएससीओकडून अनिवार्य प्रमाणपत्र आणि चाचणी देणेदेखील आवश्यक असेल.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये मर्क्युरीचा वापर किती धोकादायक?

मर्क्युरीचा वापर सौंदर्यप्रसाधनांमधील अँटी-एजिंग क्रीम, डोळ्यांची मेकअप उत्पादने, तसेच स्कीन व्हाईटनिंग लोशन आणि नेल पॉलिशमध्ये केला जातो. तज्ज्ञांच्या मते, सौंदर्यप्रसाधनांमध्ये मर्क्युरीचा वापर केला जातो. कारण त्यात त्वचा उजळवण्याची क्षमता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लुएचओ) यापूर्वी मर्क्युरीच्या वापराविरोधात इशारा जारी केला आहे की, हे विषारी रसायन त्वचा उजळवणारे साबण, क्रीम, डोळ्यांचा मेकअप, क्लिंजिंग उत्पादने आणि मस्कारा यांसारख्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते.

परंतु, मर्क्युरी असलेले मेकअप फॉर्म्युलेशन मानवी शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. मर्क्युरीच्या संपर्कात आल्याने त्वचेची जळजळ होऊ शकते. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)नुसार, मर्क्युरी असलेले सौंदर्यप्रसाधन वापरणाऱ्यांना लालसरपणा, खाज सुटणे व पुरळ यांसारखा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अंगावर पित्ताच्या गाठीदेखील येऊ शकतात. तज्ज्ञांचे असे सांगणे आहे की, मर्क्युरी असलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा दीर्घकाळ वापर केल्याने त्वचारोग होऊ शकतात. त्याच्या वापराने त्वचेवर दाह किंवा त्वचेचा रंग बदलू शकतो आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये कायमस्वरूपी त्वचा काळवंडू शकते.

मर्क्युरी असलेली सौंदर्यप्रसाधने त्वचेच्या छिद्रांतून आत प्रवेश करू शकतात आणि रक्तप्रवाहात जाऊ शकतात, ज्यामुळे मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते. परिणामी थरथर जाणवणे, स्मरणशक्ती जाणे, मूड स्विंग होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. मर्क्युरी असलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवू शकतो आणि रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करू शकतो. २०२२ मध्ये अमेरिकेतील मिनेसोटा येथे एका महिलेने दृष्टी काही प्रमाणात गमावल्याची घटना घडली होती. तिला उच्च पातळीचे विषारी रसायन असलेली ब्युटी क्रीम वापरल्यामुळे ही समस्या निर्माण झाली.

तज्ज्ञांनी असेही नमूद केले आहे की, सौंदर्यप्रसाधनांमधील मर्क्युरी अखेर सांडपाण्यात जातो. तो वातावरणात प्रवेश करतो आणि मिथाइलेटेड होतो. हा मिथाइलमर्क्युरी अखेर माशांमध्ये येतो आणि अन्नसाखळीत प्रवेश करतो. मिथाइलमर्क्युरी असलेले मासे गर्भवती महिलांनी खाल्ले, तर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. मर्क्युरीच्या वापराने मज्जासंस्थेचे नुकसान होते, जे कायमचे असू शकते, असे कोलोरॅडोमधील डेन्व्हर येथील रॉकी माउंटन पॉइझन अँड ड्रग सेफ्टीचे विषशास्त्रज्ञ व अमेरिकन कॉलेज ऑफ इमर्जन्सी फिजिशियनचे प्रवक्ते डॉ. एरिक लॅव्होनास यांनी ‘फॉक्स’ न्यूजला सांगितले.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये मर्क्युरीचा वापर किती प्रमाणात केला जातो?

मर्क्युरीच्या वापराचे धोके असूनही त्याचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. २०२२ मध्ये झिरो मर्क्युरी वर्किंग ग्रुपने १३ महिन्यांच्या कालावधीत १५ देशांमध्ये खरेदी केलेल्या २७१ उत्पादनांची चाचणी केली आणि जवळजवळ निम्म्या उत्पादनांमध्ये १ पीपीएमपेक्षा जास्त पातळी असलेल्या मर्क्युरीचा वापर करण्यात आला. मर्क्युरी पॉलिसी प्रोजेक्टचे आंतरराष्ट्रीय समन्वयक मायकेल बेंडर यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले, “आम्हाला १ पीपीएम असणारीच नाही, तर आम्हाला अशी उत्पादने आढळत आहेत की, ज्यात शेकडो, हजारो किंवा हजार पट जास्त पीपीएम आहे.” या जानेवारी महिन्यात केरळमध्ये नियमांचे पालन न केल्याबद्दल सात लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली. लिपस्टिक आणि फेस क्रीम नमुन्यांवर केलेल्या चाचण्यांमध्ये मर्क्युरीची पातळी परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. काही नमुन्यांमध्ये मर्क्युरीची पातळी परवानगीपेक्षा १२,००० पट जास्त असल्याचे आढळून आले, जी अतिशय गंभीर बाब आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्राहक स्वतःचे संरक्षण करू शकतात का?

जर तुम्हाला मर्क्युरी असलेल्या उत्पादनांचा वापर करायचा नसेल, तर पहिली गोष्ट म्हणजे उत्पादनाची लेबले काळजीपूर्वक वाचा. तसेच, त्वचा उजळवणाऱ्या क्रीम्सचा वापर टाळा. कारण- त्यात मर्क्युरी असतो. तज्ज्ञांनी असेही नमूद केले आहे की, ग्राहकांनी संशयास्पद स्वस्त उत्पादने खरेदी करणे टाळावे आणि प्रतिष्ठित दुकानांमधूनच उत्पादने खरेदी करावीत. सिडनीस्थित विज्ञान शिक्षक मिशेल वोंग यांनी ‘एबीसी न्यूज’ला सांगितले, “जर काही गोष्टी योग्य वाटत नसतील, जसे की उत्पादनावर चुकीचे शब्द लिहिलेले असतील, तर ते खरेदी करणे टाळा.”