Tsunami risks Pacific Ocean रशियात गेल्या सहा दशकांमधील सर्वांत मोठा भूकंप झाला आहे. ८.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने रशियापासून जपान आणि अमेरिकेलाही हादरवले आहे. रशियाच्या कामचात्क द्वीपकल्पाच्या किनाऱ्याजवळ झालेल्या या भूकंपामुळे जपान आणि अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानंतर लोकांना मोठ्या प्रमाणात सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हा भूकंप आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या भूकंपांपैकी एक असल्याचे भौगोलिक तज्ज्ञांचे सांगणे आहे.

हा भूकंप २०११ मध्ये जपानच्या किनारपट्टीवर झालेल्या भूकंपानंतरचा जगातील सर्वांत मोठा भूकंप आहे. या भूकंपामुळे रशियातील समुद्रकिनार्‍यावर ५० फुटांची त्सुनामी लाट निर्माण झाली. त्यामुळे फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात आपत्ती ओढवली. हा भूकंप किती शक्तिशाली होता? कामचात्का द्वीपकल्प काय आहे आणि त्याला भूकंपप्रवण क्षेत्र का म्हणतात? त्याविषयी जाणून घेऊयात.

कामचात्का द्वीपकल्प काय आहे?

  • कामचात्का द्वीपकल्पाच्या आसपासच्या प्रदेशात अनेक मोठे भूकंप झाले आहेत.
  • हा द्वीपकल्प रशियाच्या पूर्वेकडील १२५० किलोमीटर लांबचा भूभाग आहे आणि तो उत्तर पॅसिफिक महासागरापर्यंत पसरलेला आहे.
  • २०२०, २००६, १९५९, १९५२ व १९२३ मध्ये या भागांत मोठे भूकंप नोंदवले गेले. या सर्व भूकंपांमुळे तेथे त्सुनामीचे संकटही आले.
  • १८४१ आणि १७३७ मध्येही भूकंप-त्सुनामी झाल्याच्या नोंदी आहेत; मात्र या घटनांची फारशी माहिती उपलब्ध नाही.

कामचात्का प्रदेशातील टेक्टोनिक प्लेट

कामचात्का द्वीपकल्पाचा दक्षिणेकडील भाग अशा क्षेत्रावर स्थित आहे, जिथे पॅसिफिक प्लेट तिच्या उत्तरेकडील ओखोत्स्क मायक्रोप्लेटच्या खाली सरकते म्हणजेच सबडक्ट होते. कामचटकाच्या किनारपट्टीवर समुद्राच्या तळाशी कुरिल-कामचात्का ट्रेंच आहे, जो या सबडक्शनमुळे तयार झाला आहे. हा ट्रेंच कामचात्का द्वीपकल्पाच्या सर्वांत खोल ठिकाणी म्हणजेच सुमारे १० किलोमीटर खोल असल्याचा अंदाज आहे. या भूगर्भीय हालचालींमुळे हा प्रदेश भूकंपीयदृष्ट्या अत्यंत अस्थिर आहे. पॅसिफिक प्लेट ओखोत्स्क प्लेटच्या खाली प्रत्येक वर्षी अंदाजे ८६ मिमी वेगाने सरकत असल्यामुळे आणि मेगाथ्रस्ट सीमेवरील दरडींमुळे ठरावीक कालावधीने भूकंप आणि उत्तर पॅसिफिक महासागरात त्सुनामी येतात.

पॅसिफिक महासागरातील ‘रिंग ऑफ फायर’ काय आहे?

कामचात्का द्वीपकल्प प्रदेश ‘रिंग ऑफ फायर’चा एक भाग आहे, जो पॅसिफिक महासागराच्या किनारी पसरलेला आहे आणि जिथे वारंवार तीव्र ज्वालामुखी व भूकंपीय क्रियाकलाप दिसून येतात. रिंग ऑफ फायर ही प्रशांत महासागराच्या सभोवताली असलेली ज्वालामुखी आणि भूकंपाच्या ठिकाणांची एक शृंखला आहे. हे क्षेत्र अर्धवर्तुळाकार किंवा घोड्याच्या नालीच्या आकारासारखे असून, ४० हजार २५० किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. या क्षेत्रालाच सर्कम-पॅसिफिक बेल्ट, असेही म्हणतात. महत्त्वाचे म्हणजे या भागात ४०० पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहेत. रिंग ऑफ फायरचा भाग दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील टोकापासून उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारा, तसेच जपान आणि न्यूझीलंडपर्यंत पसरला आहे.

कामचात्का द्वीपकल्प प्रदेश ‘रिंग ऑफ फायर’चा एक भाग आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

‘रिंग ऑफ फायर’ युरेशियन, उत्तर अमेरिकन, जुआन डी फुका, कोकोस, कॅरेबियन, नाझ्का, अंटार्क्टिक, भारतीय, ऑस्ट्रेलियन, फिलिपिन आणि इतर लहान प्लेट्ससह असंख्य टेक्टोनिक प्लेट्सना जोडतो. जे सर्व मोठ्या पॅसिफिक प्लेटला घेरतात. रिंग ऑफ फायरमध्ये बोलिव्हिया, चिली, इक्वेडोर, पेरू, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅनडा, रशिया, जपान, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, न्यूझीलंड व अंटार्क्टिका या ठिकाणांचा समावेश आहे.

‘रिंग ऑफ फायर’मध्ये काय आहे?

या भागातील टेक्टोनिक प्लेट्सच्या सततच्या सरकण्याने, एकमेकांवर आदळण्याने किंवा एकमेकांच्या वर-खाली जाण्याने या भागात मोठ्या प्रमाणात भूकंप होतात. याच प्रकारच्या भूकंपीय क्रियेमुळे 30 जुलैचा कामचात्का भूकंप आणि त्यानंतरची त्सुनामी आली. मुळात या प्लेट्सचे कडे खडबडीत असतात. त्यामुळे ते एकमेकांना चिकटून राहतात आणि उर्वरित प्लेट सतत हलत राहते. मात्र, भूकंप तेव्हा होतो, जेव्हा या प्लेट एकमेकांपासून दूर जातात आणि दुसऱ्या प्लेटच्या वर किंवा खाली सरकतात.

टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे ‘रिंग ऑफ फायर’मध्ये ज्वालामुखींचे अस्तित्व आढळून येते. जेव्हा महाप्रचंड आकारमानाचे दोन भूस्तरखंड एकमेकांवर आदळतात, त्या वेळेस वजनदार असलेला भूस्तरखंड दुसऱ्या भूस्तरखंडाच्या खाली सरकतो. तेव्हा तो पृथ्वीचे आवरण भेदून, त्याखाली शिरलेला असतो. या प्रक्रियेला भूगोलात ‘सबडक्शन’, असे म्हटले जाते. हे आवरण भेदून आत घुसलेला भूस्तरखंड साहजिकच हळूहळू गरम होत जातो आणि त्या ठिकाणी लाव्हारस तयार होतो. ‘रिंग ऑफ फायर’ च्या भागात ही सबडक्शन प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडते.

भूकंपाची तीव्रता कशी मोजतात?

भूकंप किती सामर्थ्यशाली होता हे रिश्टर एककाने मोजणी केल्यास समजते. बुधवारी झालेला भूकंप ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. या स्वरूपाचा भूकंप साधारणतः वर्षातून एकदाच अपेक्षित असतो. यूएस जिओलॉजिकल सर्वे (यूएसजीएस) नुसार, हा आतापर्यंतच्या नोंदीतील सहावा सर्वांत मोठा भूकंप आहे. यूएसजीएस सांगते की, भूकंपाच्या तीव्रतेमध्ये एक (पूर्ण अंक) वाढ झाल्यास, भूकंपीय ऊर्जा सुमारे ३१.६ पटींनी वाढते. याचा अर्थ असा की, बुधवारी झालेल्या ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने निर्माण केलेल्या ऊर्जेपेक्षा ३१.६ पट जास्त ऊर्जा निर्माण केली असावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मार्चमध्ये मध्य म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपात सुमारे १,७०० लोक मृत्युमुखी पडले होते आणि त्याची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल होती. ‘यूएसजीएस’नुसार आतापर्यंतचा सर्वांत तीव्र भूकंप ९.५ रिश्टर स्केलचा होता. हा भूकंप १९६० मध्ये चिलीच्या किनारपट्टीवर आला होता आणि त्यात १,६०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. भूकंपमापक (साइस्मॉमीटर) हे एक अत्यंत संवेदनशील यंत्र आहे. भूकंपादरम्यान जमिनीची हालचाल या उपकरणाद्वारे मोजली जाते.