भारताच्या विनेश फोगटने ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलोची अंतिम फेरी गाठल्यानंतर स्पर्धेसाठी तिने वजन गट बदलल्याचे प्रकर्षाने समोर आले. एकदा वजन कमी जास्त केले की ते कायम राखणे त्या कुस्तीगीरासाठी आव्हानात्मक कसे असते या संदर्भात घेतलेला आढावा… वजनी गट बदलण्याचा निर्णय का घेतला जातो? सहसा एखादा कुस्तीपटू वजनी गट स्पर्धेत खेळायला लागला की आपला वजनी गट बदलत नाही. आपल्या वजनी गटात स्पर्धा आणि आव्हाने वाढली की कुस्तीपटू वजन बदलण्याचा विचार करू लागतो. दुसऱ्या बाजूने जेव्हा शिखर संघटनाच एखाद्या वजनी गटात बदल करते तेव्हा कुस्तीगीरांना वजन गट बदलण्याचा निर्णय घ्यावा लागतो. सहसा कुस्तीगीर वजन बदलण्याचा निर्णय घेत नाही. कारण, त्याला ते नंतर कायम ठेवायचे असते. ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेच्या वजनी गटात फरक आहे. जागतिक स्पर्धेत १० वजन गट असतात, तर ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई अशा मोठ्या बहुराष्ट्रीय स्पर्धांत सहाच वजनी गटांचा समावेश असतो. त्यामुळे ऑलिम्पिक गटात नसलेल्या वजन गटातील कुस्तीगीर कधी कधी ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न साकार होण्यासाठी वजन गट बदलण्याचा विचार करू शकतात. कुस्ती खेळात वजनाचे एवढे महत्त्व का? ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात कुस्ती, बॉक्सिंग, ज्युडो असे खेळ आहेत की ज्यामध्ये स्पर्धा ही वजनी गटानुसार घेतली जाते. त्यामुळे कुस्तीप्रमाणेच या खेळात वजनाचे महत्त्व असते. त्या खेळाडूला आपल्या निश्चित केलेल्या वजनी गटातून खेळायचे असते. अशा वेळी नैसर्गिक वजन लक्षात घेऊन कुस्तीगीर आपला वजनी गट ठरवत असतात. जेणेकरून वजन बदलायचा निर्णय घाला, तर दुसऱ्या जवळपासच्या वजनी गटाशी झटपट जुळवून घेता येऊ शकेल. त्यामुळे कुस्तीपटूंना स्पर्धकांच्या अभ्यास करताना आपल्या शरीरयष्टीला साजेसा किंवा शरीरयष्टी जुळवून घेऊ शकेल, अशा वजनी गटाचा निर्णय घ्यावा लागतो. हेही वाचा : हिंसक, वर्णद्वेषी हल्ल्यांनी ब्रिटनमधील शहरे का धुमसताहेत? मुस्लिमविरोध, स्थलांतरित विरोध कारणीभूत? वजन वाढवणे सोपे असते की वजन घटवणे? कुठल्याही खेळात या दोन्ही गोष्टी चर्चेचा विषय ठरतात. पण, केव्हाही वजन वाढवणे खेळाडूसाठी फायद्याचे ठरते. वजन कमी करून खेळण्याचा निर्णय घेतला, तर त्याला ते टिकविण्यासाठी अभ्यास करावा लागतो. वजन घटवणे किंवा वाढवणे हे खेळाडूची शरीरयष्टी आणि त्या वजनी गटातील दिग्गज प्रतिस्पर्ध्यांवर अवलंबून असते. एखाद्या खेळाडूची चरबी जास्त असेल, तर तो खेळाडू आपले वजन झटकन कमी करुूशकतो. पण, ज्याने आपली शरीरयष्टी संपादित केली आहे आणि मेहनतीने पीळदार बनविली आहे, त्यांना वजनातील संतुलन राखणे जमत नाही. वजनी कमी करण्यासाठी कोणते उपाय? स्पर्धा सुरू झाल्यावर वजन वाढले असल्यास खेळाडूला वजन नियंत्रणात आणण्यासाठी केवळ १५ मिनिटे असतात. या पंधरा मिनिटात त्याला सगळे प्रयत्न करावे लागतात. यामध्ये निर्जलीकरण, ऊर्जा निर्माण करणारे खाद्यपदार्थ न खाणे, सॉना बाथ, उलट्या करणे, लघवीचे प्रमाण वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे असे अनेक उपाय केले जातात. यातूनही फरक पडला नाही, तर अनेकदा मल्ल कपडे कमी करणे, केस कापणे असे टोकाचे निर्णय घेऊ शकतात. हेही वाचा : तीन मुलींची हत्या, वर्णद्वेष, स्थलांतरितांचा विरोध; ब्रिटनमधील हिंसक आंदोलनांची स्थिती काय? वजन गट बदलताना काय काळजी घ्यावी लागते? आपला नियमित वजन गट बदलताना मल्लाला पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा लागतो. वजन वाढवताना फारशा आव्हानांचा सामना करावा लागत नाही, पण वजन कमी करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असतो. अर्थात हे आव्हान आपल्या नेहमीच्या वजन गटातून खेळतानाही कायम असते. यामध्ये वजन गट निवडताना आपण ते वजन कायम राखू शकतो का, वजन बदलल्यावर त्याचा कामगिरीवर काही परिणाम होणार नाही ना आणि वजन नियंत्रित करताना आपल्याला सर्व गोष्टींना सामोरे जाता येईला ना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजेच खेळाडूला नुसता मॅटवर सराव करून चालत नाही, तर त्यांना मॅट बाहेरही अशा पद्धतीने लक्ष पुरवावे लागते. उपायांचा विपरीत परिणाम होऊ शकतो? काही करून खेळायचेच म्हटल्यावर मल्ल आपले आवश्यक वजन राखण्यासाठी जे काही प्रयत्न करतो, त्याच्या विपरीत परिणामांनाही त्याला तोंड द्यावे लागते. वजन कमी करताना निर्जलीकरणाचे प्रमाण वाढले, तर नंतर चक्कर येणे, डोकेदुखी, एखादा अवयव निकामी होण्याचा धोका असतो. ऊर्जा वाढविणारे खाद्यपदार्थ खाण्यावर निर्बंध घातल्यास अती थकवा, स्नायूंची ताकद कमी होणे किंवा अन्य आरोग्यविषयक गुंतागुंतीच्या तक्रारी उद्भवू शकतात. अति उलट्या केल्यास शरीरातील पाणी कमी होणे, अन्ननलिका कमकुवत होणे अशा दुखण्याचा सामना करावा लागतो. सॉना बाथचा वापर वाढल्यास उष्माघाताची भीती वाडते. लघवीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्यास त्याचा किडनीवर परिणाम होऊ शकतो. सर्वात म्हणजे अशा उपायांमुळे खेळाडूकडे उत्तेजकाचे सेवन केल्याचा संशय घेतला जाऊ शकतो. हेही वाचा : ‘पायरोक्युम्युलोनिम्बस’: अधिक वणवे पेटण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ढगांमध्ये वाढ का झाली आहे? वजन नियंत्रित राखणे आव्हानात्मक कसे? वजन गटावर आधारित असलेल्या कुस्ती खेळात कुस्तीगीरांसमोर आपले वजन नियंत्रित राखण्याचे सर्वात मोठे आव्हान असते. यासाठी नियमांचे काटेकोर पालन करताना त्याचा आपल्या खेळावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होणार नाही ना याची काळजी खेळाडूला घ्यायची असते. मुळात वजन वाढवणे किंवा कमी करणे शारीरिकदृष्ट्या सोपे नाही. ती एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अशा वेळी खेळाडूवर अनेक बंधने येत असतात. यातील सर्वात मोठे बंधन संतुलित आहार आणि झोप याचे असते. खेळाडूला आवश्यक तोच आहार घ्यावा लागतो. त्यात कमी जास्तपणा आला की त्याचा शरीरावर परिणाम होतो. एकवेळ वजन वाढवणे सोपे जाते पण, कमी करताना खूप काळजी घ्यावी लागते. जागतिक आणि ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत हे आव्हान अधिक कठीण असते. कारण, येथे तुमचे वजन ज्या वजन गटात खेळणार आहात तेवढेच भरावे लागते. अन्य स्पर्धांत अजून नियम तेवढे कडक नाहीत. त्यामुळे वजनात कमी जास्तीचा फरक अन्य स्पर्धांमध्ये चालून जातो. ऑलिम्पिकमध्ये मात्र तुमचे वजन आहे तेवढेच किंवा त्यापेक्षा थोडे कमी भरावे लागते. एखादा ग्रॅम वजन वाढले तरी ते चालत नाही.