Microsoft employee protest जगातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी असलेली मायक्रोसॉफ्ट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कंपनीचे वॉशिंग्टन, डीसीमधील कर्मचारी आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी कंपनीच्या मुख्य कॅम्पसचा काही भाग ताब्यात घेतला आहे. इस्रायलबरोबरचे कंपनीचे संरक्षण करार या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीमधील एका कर्मचारी गटाने मायक्रोसॉफ्टवर इस्रायलबरोबर संबंध तोडण्यासाठी दबाव आणला आहे. मायक्रोसॉफ्टने आपल्या अझूर (Azure) सॉफ्टवेअरच्या वापराची स्वतंत्र चौकशी सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे. परिस्थिती चिघळण्याचे कारण काय? कर्मचारी आक्रमक का झाले? काय आहे प्रकरण? जाणून घेऊयात.

काय आहे प्रकरण?

मंगळवारी (१९ ऑगस्ट) दुपारी अनेक कर्मचारी, तसेच कंपनीचे काही माजी सदस्य, वॉशिंग्टनमधील मायक्रोसॉफ्टच्या कॅम्पसमध्ये एकत्र जमले. हे कर्मचारी ‘No Azure for Apartheid’ या गटाचे आहेत. या गटाने रेडमंडमधील सुमारे ५०० एकर परिसर ताब्यात घेतला आहे. कंपनीकडून या परिसराची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली होती. त्यांनी या भागात तंबू लावले आणि या भागाला ‘मुक्त क्षेत्र’ (liberated zone) म्हणून घोषित केले. या गटाने या भागाचे नाव ‘ईस्ट कॅम्पस प्लाझा’वरून ‘द मार्टर्ड पॅलेस्टिनियन चिल्ड्रन्स प्लाझा’असे ठेवल्याचे सांगितले. त्यांनी गाझामध्ये मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कलाकृतीही तयार केल्या. त्यात ‘स्टॉप स्टार्व्हिंग गाझा’ असे लिहिलेली एक मोठी पाटीही होती. त्यांनी एक टेबलही लावले होते. त्यावर मायक्रोसॉफ्ट व्यवस्थापनाला चर्चेसाठी या आणि इस्रायलच्या सैन्याबरोबरचे संबंध तोडा, असे लिहिलेले होते.

जगातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी असलेली मायक्रोसॉफ्ट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

या गटाने ‘वी विल नॉट बी कॉग्स इन द इस्रायली जेनोसाइडल मशीन : अ कॉल फॉर अ वर्कर इंतिफादा’ नावाचे एक खुले पत्र आणि जाहीरनामादेखील प्रकाशित केला. या गटाने मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे आक्षेप व्यक्त करण्याचे, नोकरी सोडण्याचे व मायक्रोसॉफ्ट इस्रायल सरकार आणि सैन्याबरोबरचे व्यवसाय थांबवत नाही तोपर्यंत संपावर जाण्याचे आवाहन केले आहे. ‘No Azure for Apartheid’ गटाने मायक्रोसॉफ्टच्या अंतर्गत संवादात गाझा, नरसंहार व वंशभेद यांसारख्या शब्दांवर बंदी घालण्याच्या निर्णयाचीही निंदा केली आहे. गटाने सांगितले की, कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुमारे ५० लोक उपस्थित होते. मायक्रोसॉफ्टच्या रेडमंड कॅम्पसमध्ये जवळजवळ ५०,००० कर्मचारी काम करतात.

या आंदोलनाचे कारण काय?

मायक्रोसॉफ्टचे माजी कर्मचारी आणि या आंदोलनाचे नेतृत्व करणारे होसाम नासर यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्टने त्यांच्या अझूरच्या (Azure) वापराबद्दलच्या चिंतांबाबत बोलण्यास नकार दिला आणि त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले. अझूर (Azure) हा मायक्रोसॉफ्टचा क्लाउड-कॉम्प्युटिंग विभाग आहे. हा विभाग व्यावसायिक आणि सरकारांना सॉफ्टवेअर विकतो, तसेच त्यांना त्यांच्या सर्व्हरवर डेटा साठवण्याची परवानगी देतो. इस्रायल सरकार आणि त्याच्या संस्थादेखील अझूरचे ग्राहक आहेत. या महिन्यात झालेल्या एका तपासणीतून समोर आले की, इस्रायलचे एक लष्करी पाळत ठेवणारे युनिट वेस्ट बँक आणि गाझामधील पॅलेस्टिनी लोकांचे फोन कॉल रेकॉर्ड करण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या अझूर सॉफ्टवेअरचा वापर करत आहे. इस्रायलने या माहितीचा उपयोग बॉम्ब टाकण्याच्या ठिकाणांची निवड करण्यासाठी केला असल्याचे सांगितले जाते.

नासर यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले, “आम्ही येथे आहोत. कारण- २२ महिन्यांच्या नरसंहारात, मायक्रोसॉफ्टच्या मदतीने इस्रायल दर तासाला पॅलेस्टिनी मुलांना मारत आहे आणि अपंग करत आहे.” नासर यांनी अल-जझीराचे पत्रकार अनास अल-शरीफ यांचा इस्रायली डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ)द्वारे झालेल्या मृत्यूचाही उल्लेख केला. अनास हे या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पाच पत्रकारांपैकी एक होते. “मी त्यांना गाझामध्ये सतत रिपोर्टिंग करताना पाहिले. उपासमार, संहार मोहीम व बॉम्बहल्ले सुरू असतानाही ते रिपोर्टिंग करीत होते. त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले,” असे नासर म्हणाले. इस्रायलवर गाझामध्ये नरसंहार करण्याचा आणि युद्धाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करण्याचा आरोप करण्यात आला आहे. इस्रायल हे आरोप नाकारतो; परंतु गाझामध्ये मारल्या गेलेल्या पत्रकारांच्या वाढत्या संख्येतून एक वेगळेच चित्र दिसून येते.

आंदोलन केल्यामुळे कामावरून काढले

नासर यांना यापूर्वी मायक्रोसॉफ्टविरोधात आंदोलन केल्यामुळे कामावरून काढण्यात आले होते. ‘No Azure for Apartheid’ गटाच्या काही सदस्यांनाही अनधिकृत कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कंपनीने कामावरून काढून टाकण्यात आले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अमेरिकन महाविद्यालयांना इस्रायलबरोबरचे संबंध तोडण्याचे आणि बीडीएस (BDS) चळवळ म्हणजेच ‘बहिष्कार, गुंतवणूक काढून घेणे आणि निर्बंध’ चळवळ स्वीकारण्याचे आवाहन केले होते. मायक्रोसॉफ्ट कर्मचारी निश्रीण जारादात यांनी एका निवेदनात म्हटले, “मायक्रोसॉफ्ट हा गाझामधील इस्रायली नरसंहारात सर्वांत जास्त सहभागी असलेला डिजिटल शस्त्रास्त्र निर्माता आहे.”

जारादात यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले, “प्रत्येक सेकंदाला पॅलेस्टाइनमधील परिस्थिती अधिकच खराब होत आहे. लोक उपाशी मरत आहेत. लोकांना बॉम्बहल्ल्याद्वारे मारले जात आहे आणि अपंग केले जात आहे. आता आपल्याला शक्य त्या मार्गाने आंदोलन तीव्र करण्याची वेळ आली आहे.” काही तज्ज्ञांनी इस्रायलवर गाझामध्ये नरसंहार केल्याचा आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्रांनी गाझामध्ये मोठ्या प्रमाणात उपासमार आणि रोगांचा धोका असल्याचा इशारा दिला आहे.

६२,००० पॅलेस्टिनींचा मृत्यू

गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने सुरू केलेल्या युद्धात किमान ६२,००० पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. आंदोलनाच्या काही तासांनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी खासगी मालमत्तेवर अतिक्रमण केल्याबद्दल अटक करण्याचा इशारा दिला. मे महिन्यात मायक्रोसॉफ्टने दावा केला होता, “मायक्रोसॉफ्टच्या अझूर आणि एआय तंत्रज्ञानाचा गाझामधील संघर्षात लोकांना लक्ष्य करण्यासाठी किंवा त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापर केला गेला असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.” परंतु, त्यानंतर मायक्रोसॉफ्टने स्वतंत्र तपासणी करण्यासाठी कॉव्हिंग्टन अँड बर्लिन या समितीची नेमणूक केली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांनी केलेली पूर्वीची आंदोलने

मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीला इस्रायलबरोबरच्या संबंधांबद्दल जाब विचारला आहे. मात्र, यापूर्वीही याच स्वरूपाची आंदोलने झाली आहेत. एप्रिलमध्ये भारतीय वंशाच्या अभियंता वानिया अग्रवाल यांनी वॉशिंग्टनमधील कंपनीच्या एका पार्टीमध्ये मायक्रोसॉफ्टच्या नेतृत्वाची निंदा केली. त्यावेळी मायक्रोसॉफ्ट कंपनी बिल गेट्स, स्टीव्ह बाल्मर व सत्या नडेला यांच्या उपस्थितीत आपला ५० वा वर्धापनदिन साजरा करीत होती. त्यावेळीही हे प्रकरण चांगलेच तापले होते.