New York Hindu temple: न्यूयॉर्कमधील क्विन्स भागात एका लहानशा कारखान्याचे मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. त्या मंदिराच्या मध्यभागी असलेल्या प्रकाशझोताखाली देवीची एक मूर्ती ठेवण्यात आली आहे. दक्षिण भारतातील गावदेवी मरीअम्मनची ही मूर्ती. मरीअम्मन ही काली देवीचे स्वरूप मानली जाते. ही मूर्ती एक टन वजनाची आणि सहा फूट उंच आहे. काली ही काळ आणि मृत्यूची देवता मानली जाते.
आमचा धर्म हा खूप ग्रामीण आणि अस्सल
मंदिरात सिगारेटच्या धुरात आणि अगरबत्तीच्या सुवासात पूजा सुरू असते… वेदीवर फळांबरोबर रमच्या बाटल्याही ठेवलेल्या असतात. या मंदिरातील ३१ वर्षांची पुजारिण चांदनी कालू सांगते, “आमचा धर्म हा खूप ग्रामीण आहे, गावाकडचा आहे. तो अगदी मुळापासून अस्सल आहे.” या मंदिरात रविवारी होणारी पूजा अनेक हिंदूंनाही अपरिचित वाटू शकते. येथील बहुतांश भक्त हे इंडो-कॅरेबियन आहेत. “हे मंदिर उपचाराचे स्थान आहे,” असे शारदा रामसामी यांनी सांगितले. शारदा रामसामी या २००८ साली स्थापन झालेल्या या मंदिराच्या मूळ संस्थापकांपैकी एक आहेत. “शारीरिक किंवा आध्यात्मिक, कुठल्याही अडचणीत असलेले लोक शेवटी आमच्याकडेच येतात. त्यांना इथे त्या समस्येचं उत्तर मिळतं, जे इतरत्र कुठेच सापडत नाही. आई सर्व जाणते!” असं शारदा रामसामी सांगतात.
मंदिर सर्वांसाठी खुले
हे मंदिर सर्वांसाठी खुले आहे. इथल्या पुजाऱ्यांनी समलैंगिक जोडप्यांचे विवाहही लावले आहेत, इतर हिंदू मंदिरांमध्ये ते नाकारले होते. विशेष बाब म्हणजे इथले बहुतांश पुजारी, कर्मचारी आणि भक्त स्त्रिया आहेत. अनेक स्त्रिया येथे आधार शोधत येतात, काहीजणी घरगुती हिंसाचारातून पळ काढत मंदिरात येतात. मंदिरातील काही कर्मचारी त्यांना मदत करतात. कधी पैसे देतात, कधी मंदिराची चावी देऊन राहण्याची परवानगीही देतात.
मासिक पाळीच्या वेळेसही पूजेस हरकत नाही
इतर अनेक मंदिरांमध्ये मासिक पाळीमुळे स्त्रियांना मंदिराच्या बाहेर ठेवले जाते किंवा त्यांना वेदीजवळ जाऊ दिले जात नाही. “आम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही,” रामसामी म्हणाल्या. कारण, “आम्ही एका स्त्रीदेवतेची पूजा करतो.” “मुख्य प्रवाहातील हिंदू धर्मात अजूनही पुरुषसत्ताक मानसिकता प्रबळ आहे,” असे चांदनी कालू म्हणतात. “स्त्रियांना फारसे महत्त्व दिले जात नाही. स्वयंपाकघरात प्रसाद तयार करायचा अशीच मर्यादा असते. पण इथे मला पुजारिण होण्याची संधी देण्यात आली.”
मंदिराचा खर्च अधिक
आता मात्र हे मंदिर बंद होण्याच्या मार्गावर आहे. मंदिर चालू ठेवण्यासाठी १,५०,००० डॉलर खर्च करून जागेचे सुधारकाम करणे आवश्यक आहे, नाहीतर मालक आणि शहर प्रशासन मंदिर बंद करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत. “आईनेच आम्हाला इथे एकत्र आणले असावे, कारण आमचं आयुष्य खूप बदललं आहे,” असे हिल्डा थामेन म्हणतात. थामेन या रामसामी यांच्या मावशी आहेत आणि मंदिराच्या संस्थापकांपैकी एक आहेत. “आईने आमच्यासाठी खूप काही केलं. आता जे घडतंय, ते आमच्यासाठी खूप दु:खद आहे.”
कम्युनिटी स्पेस
२०१८ साली एका शेजाऱ्याने आवाजाबद्दल तक्रार केली होती, त्यामुळे बांधकाम विभागाने हस्तक्षेप केला आणि लहानसा दंडही आकारला. २०२४ साली त्याच शेजाऱ्याने पुन्हा तक्रार केल्यानंतर मंदिराने कायदेशीररीत्या ‘कम्युनिटी स्पेस’ म्हणून नोंदणी करावी असा निर्णय शहर प्रशासनाने घेतला. त्यासाठी वीज, पाणी, अग्निसुरक्षा आणि अपंगांसाठी सुविधा अशा अनेक गोष्टींमध्ये महागडे बदल आवश्यक आहेत.
ओ, डियाब्लो
ही इमारत मूळतः कारखान्यासाठी बांधलेली असल्याने दुसरी जागा भाड्याने घेणे शक्य असले तरी, “आम्ही दूर गेलो तर काही भक्त गमावू,” असे रामसामी म्हणाल्या. “बरेच वृद्ध लोक बस स्टॉपजवळूनच येतात. इथे चालत येणं त्यांच्यासाठी सोपं आहे.” त्या शेजाऱ्याने नवरात्रीत भजन आणि वादनाचा आवाज ऐकून त्रस्त होऊन तक्रार केली. त्याने मंदिराला मागच्या बाजूने बाहेर जाण्याचा रस्ता देण्यास नकार दिला आणि दोन ठिकाणी १२ फूट उंचीची भिंत उभी केली. “एकदा तो आला आणि गेटवर आमचं चिन्ह पाहून म्हणाला, ‘ओ, डियाब्लो, डियाब्लो’ म्हणजे सैतान,” असे रामसामी सांगतात. “ही भीतीतून आलेली प्रतिक्रिया आहे.”
कालीची मंदिरे बेसमेंटमध्ये
बहुतेक कालीची मंदिरे बेसमेंटमध्ये किंवा अंगणात लपवलेली असतात. “काली मातेची मूर्ती इतर देवतांपेक्षा खूप वेगळी आहे,” कालू सांगतात. “ती काळी आहे, विस्कटलेली आहे, ती नग्न आहे. तिच्या जिभेवरून रक्त ओघळत असते. यामुळे लोक अस्वस्थ होतात. रक्ताला अपशकुन मानले जाते, त्यामुळेच ही पूजा समाजात वर्ज्य झाली.”
कॅरेबियन शक्ती उपासनेचा जन्म
गयाना देशातसुद्धा “जर एखाद्याने सांगितलं की तो कालीच्या मंदिरात जातो, तर लोक वेगळ्या नजरेने पाहतात,” असे थामेन सांगतात. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी त्रिनिदाद, गयाना आणि सुरिनाममध्ये कंत्राटी भारतीय मजुरांना नेण्यात आले. त्यांच्याबरोबर दक्षिण भारतातील लोकसांस्कृतिक श्रद्धाही गेल्या. त्यातून कॅरेबियन शक्ती उपासनेचा जन्म झाला, तिथे ‘तुटक तमिळ’मध्ये पूजा पद्धती शिकवल्या गेल्या, ग्रंथ नव्हते, मंत्रांची पुस्तके नव्हती.
प्रत्येकाला प्रेम व सन्मान
क्विन्सच्या मंदिराच्या संस्थापकांनी या परंपरेला टिकवून ठेवले आहे. काहींचे पालक गयानामध्ये शक्ती मंदिरांचे पुजारी होते. दुसऱ्या पिढीतील न्यूयॉर्ककरांनी कारखाना तोडून तिथे स्वयंपाकघर बांधले, छप्पर दुरुस्त केले, आणि हे सर्व त्यांनी आपले रोजचे व्यवसाय सांभाळत केले. “श्री शक्ती मरीअम्मा मंदिराचा हेतू स्पष्ट होता,” मंदिराचे अध्यक्ष देव कुटैया सांगतात. “ही फक्त प्रार्थनेसाठी जागा नाही, हे तुमच्या ओळखीच्या लोकांना भेटण्यासाठीचं ठिकाण आहे.” “आमच्या मंदिरात आम्ही सर्वांना समान वागणूक देतो. कोणी महापौराचा सहकारी असो किंवा रात्री १२ वाजता डंकिन डोनट्समध्ये काम करणारा असो. प्रत्येकाला प्रेम आणि सन्मान हवा असतो.”
…तर देव रागावणार नाही!
हे मंदिर विविध कुटुंबांनी दिलेल्या देणग्यांवर चालते. पण कुटैया आणि त्यांच्या टीमने कधीही मंडळींकडे जबरदस्तीने पैसे मागितले नाहीत. “पूजा मोफत असावी, आरोग्य मोफत असावे आणि त्यातून आर्थिक फायदा घेऊ नये,” असे रामसामी सांगतात. “इथे येणाऱ्या ९० टक्के लोकांचे काम हे डिपार्टमेंट स्टोअर, फॅक्टरी किंवा JFK विमानतळावर असते,” कुटैया सांगतात. “आम्हाला फारसे पैसे देणारे लोक नाहीत. मी नेहमी म्हणतो, तुमचे बिल भरा, निवृत्तीवेतन सांभाळा, नंतर देवाची आठवण करा. काही देऊ शकत नसाल तरी देव रागावणार नाही.”
जूनपासून एक गोफंडमी मोहीम सुरू आहे, ज्याला Jahajee: Indo-Caribbeans for Gender Justice आणि Caribbean Equality Project सारख्या संस्थांनीही पाठिंबा दिला आहे. नोव्हेंबरमध्ये, न्यायालयात दंड भरण्याच्या तारखेला मंदिर आणखी वेळ मागणार आहे. रोहन नरीन, न्यूयॉर्कमधील Hindus for Human Rights संघटनेचे संयोजक, या मोहिमेत सक्रिय आहेत. त्यांनी अनेक वर्षे ‘ओम नाईट’ ओपन माईक कार्यक्रम मंदिरात घेतले आहेत.
नरीन स्वतःला ‘ऑर्थोडॉक्स हिंदू’ मानतात. त्यांनी पहिल्यांदा मंदिरात भेट दिली तेव्हा भक्त तोंडात मेंथॉलच्या क्युब्सने आग ठेवत होते आणि अंगावर गुलाबपाणी घेत होते, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. पण “इथे जी ऊर्जा आहे, ती इतर मंदिरांमध्ये अनुभवता येत नाही,” ते म्हणतात. “हे फक्त प्रसाद घेऊन घरी जाण्याचे ठिकाण नाही, इथे प्रत्येकजण सक्रिय सहभाग घेतो. हे जणू जिवंत, सहभागी होणारे नाट्य आहे.”
शक्तिपूजा खुलेपणाने स्वीकारा…
क्विन्समधील इंडो-कॅरेबियन समुदायात या प्रकारची शक्ती उपासना आता अधिक मुख्य प्रवाहात येत आहे. केवळ कुतूहलाने नव्हे, तर शक्ती भक्तांबरोबर श्रद्धेने पूजा करण्यासाठी लोक येत आहेत. “हिंदू धर्माच्या सर्व पैलूंना मोकळेपणाने आपली श्रद्धा व्यक्त करण्याचा अधिकार असावा,” नरीन म्हणतात. “आपण सोप्या पूजा पद्धतींशी जास्त सवयीचे आहोत, पण शक्ती पूजा जरा अधिक गुंतागुंतीची असते. पण त्याला घाबरायचं काही कारण नाही. आपण ती अधिक खुलेपणाने स्वीकारली पाहिजे.” आजवरच्या अनेक हिंदू मंदिरांपैकी हे मंदिर खरंच आगळंवेगळं असलं तरी आता मात्र त्याच्यावर बंदीची टांगती तलवार लटकते आहे!