Donald Trump-Putin Meet today: अलास्का हा अमेरिकेतील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांपैकी एक आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या येत्या काळात होणाऱ्या भेटीमुळे अलास्का प्रकाशझोतात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी ट्रम्प आणि पुतिन यांची इथे भेट होणार आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या समाप्तीसाठी यावेळी चर्चा होणार आहे. अलास्काचा इतिहास रशियाशी खोलवर जोडलेला आहे, कारण कधीकाळी अलास्का रशियाचाच भाग होतं; त्यामुळे भेटीसाठी अलास्का निवडण्याचे हे प्रमुख कारण आहे. जवळपास दोन शतकांपूर्वी हा विशाल प्रदेश रशियाच्या ताब्यात होता. मात्र कठीण हवामान, प्रशासकीय अडचणी आणि युद्धानंतरची आर्थिक घसरण, यामुळे त्याची देखरेख करणे रशियासाठी अवघड झाले होते. १८५३-१८५६ च्या क्रिमियन युद्धानंतर वाढलेल्या खर्चामुळे रशियाने अखेर अलास्का विकण्याचा निर्णय घेतला. आताच्या किमतीनुसार सुमारे ६३ कोटी रुपयांचा हा व्यवहार झाला होता.

ही ऐतिहासिक अलास्का खरेदी Seward’s Folly म्हणून ओळखली जाते. हा करार ३० मार्च १८६७ रोजी झाला. त्यावेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री विल्यम एच स्यूवर्ड यांनी रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करत ७.२ दशलक्ष डॉलर्स किमतीत अलास्का विकत घेतले. अमेरिकेतही अनेकांनी या व्यवहाराची खिल्ली उडवली आणि त्याला स्यूवर्डचा मूर्खपणा असे म्हटले. टीका करणाऱ्यांना असे वाटत होते की, हा भूभाग फायदेशीर नाही. मात्र, स्यूवर्ड यांना खात्री होती की हा प्रदेश धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या अमूल्य ठरणार आहे. १८ ऑक्टोबर १८६७ रोजी अलास्काचा अधिकृत ताबा अमेरिकेकडे आला. तो दिवस आता अलास्का डे म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरच्या काळात इथे सोनं, तेल आणि इतर संसाधनं सापडल्यावर अमेरिकेची संपत्ती आणि जागतिक प्रतिष्ठा वाढली.

अमेरिका आणि रशियामध्ये हा करार का झाला?

रशियाने अलास्का विकण्यामागे व्यावहारिक आणि धोरणात्मक अशी दोन कारणं होती. कडाक्याच्या थंडीमुळे आणि प्रचंड अंतरामुळे प्रशासकीय काम कठीण होते, तसंच आर्थिक संकटामुळे कायमस्वरूपी विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा करार कायदेशीर, बंधनकारक आणि भविष्यातील वाद टाळण्यासाठी निश्चित करण्यात आला. शीतयुद्धाच्या काळातही हा करार अबाधित राहिला.

अलास्काचे क्षेत्रफळ १७ लाख २३ हजार ३३७ चौरसकिमी एवढे आहे. ते अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य आहे. भारताच्या जवळपास निम्म्या आकाराचे आणि राजस्थानपेक्षा पाच पट मोठे आहे. तसं पाहिलं तर ते राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश एकत्रित मिळूनही खूप मोठे आहे.

आर्थिक आणि धोरणात्मक साठ्यामुळे अमेरिकेची भरभराट

अलास्काचे खरे महत्त्व हळूहळू जगासमोर येऊ लागले. १८९० च्या दशकातील क्लॉन्डाइक सुवर्णसाठा मोहिमेत जगभरातील हजारो सोन्याचे शोधक इथे आले आणि त्यांनी खोऱ्याने सोने मिळवले. १९६८ मध्ये प्रुधो बे इथे मोठ्या प्रमाणात तेलसाठा सापडल्याने अलास्का अमेरिकेच्या महत्त्वाच्या ऊर्जा केंद्रांपैकी एक बनला. ट्रान्स-अलास्का पाइपलाइनमुळे तेल वाहतूकही सोयीस्कर झाली.

तेल आणि गॅसव्यतिरिक्त अलास्कामध्ये तांबे, कोळसा, जस्त यांचे मोठे साठे आहेत. तसंच हे अमेरिकेतील सर्वात मोठ्या मत्स्य उद्योगांपैकी एक आहे. मोठ्या प्रमाणात साल्मन, खेकडे आणि इतर समुद्री खाद्य इथे उपलब्ध आहे. आशिया आणि रशियाच्या जवळील भौगोलिक स्थानामुळे अलास्का दुसऱ्या महायुद्धात आणि शीतयुद्धातही महत्त्वाचे ठरले आहे. अजूनही इथली लष्करी तळं अमेरिकेच्या पॅसिफिक संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

अलास्काच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचाही महत्त्वाचा वाटा आहे. हिमनद्या, वन्यजीव आणि राष्ट्रीय उद्याने पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक इथे येतात. तेलाच्या उत्पन्नातून स्थापन केलेल्या अलास्का परमनंट फंडमधून स्थानिक रहिवाशांना वार्षिक मदतही केली जाते.

हा करार ठरला होता अमेरिकेसाठी सुवर्णसंधी

सुरुवातीला मूर्खपणा मानला गेलेला हा व्यवहार आता अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात फायदेशीर भूखंड खरेदींपैकी एक मानला जातो. यामुळे अमेरिका केवळ आर्थिकदृष्ट्या श्रीमंत नाही झाली तर तिची जागतिक धोरणात्मक ताकदही मोठ्या प्रमाणात वाढली.